३५ हजार ओव्या अन् ४५ हजार शब्द; परभणीच्या डॉ. साहेबराव खंदारे यांचे संकलन
लातूर : भाषा समृद्धीसाठी शब्द महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शब्दाला संस्कृती असते शब्द जपले, जोपासले तर ती संस्कृती टिकते, अन्यथा शब्दांसमवेत तीही लुप्त होते. मराठी भाषा नानाविध अर्थवाही शब्दांनी समृद्ध झाली आहे. तथापि आजघडीस या भाषेतील हजारो शब्द आज वापराअभावी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे शब्दवैभव कायम राहावे यासाठी परभणीचे मराठी भाषा संशोधक डॉ. साहेबराव खंदारे यांनी तब्बल दोन तप महाराष्ट्रातील गाव खेड्यांत भटकंती करून हजारो शब्द, ओव्या व शिव्यांचे संकलन केले असून ते कोशबद्ध व्हावे यासाठी ते सरकारला आर्जव करीत आहेत.
डॉ. खंदारे यांचा हा संकल्प एका अनुभवातून आकारला आहे. त्यांच्या आई ओव्या गात. एके दिवशी त्यांनी आमच्या माघारी या ओव्या राहणार नाहीत तू त्याचे पुस्तक काढ अशी इच्छा व्यक्त केली आणि डॉ. खंदारे यांनी त्यावर काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी अनेक मराठी मित्र शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार व परिचितांना कळवले. पदरमोड करून सुट्टीचे दिवस ते गावे, वाडी-वस्त्यांवर जाऊन तेथील गावकरी, ज्येष्ठ महिला, शेतकरी, गुराखी यांच्याशी मनमोकळा संवाद साधू लागले व या संवादातून येणारे शब्द कागदावर उतरवू लागले. याच काळात त्यांनी शिव्याही ऐकल्या अन् त्याही संकलित केल्या यातून शिवी कोशाची तर ओव्यांतून ओवी कोशाची संकल्पना पुढे आल्याचे डॉ. खंदारे यांनी सांगितले. आजघडीस त्यांच्याकडे लोकभाषेतील ४५ हजार शब्दांचे, साडेतीन हजार शिव्यांचे अन् ३५ हजार ओव्यांचे संकलन झाले असून त्यांच्या घरातील दोन खोल्या (३५ कपाटे) बाडाने भरल्या आहेत. ते कोशरूपात प्रकाशित व्हावे यासाठी ते सरकार दरबारी १९८५ पासून प्रयत्न करीत आहेत, पण अद्याप त्यावर कसलीच कार्यवाही झाली नाही. आता हे बाड कुजत आहे. कागदावरील शब्द धूसर होत आहेत. मूळ शब्द, त्याचा अर्थ कोणत्या भागात कशासाठी तो वापरला जात होता अशा रूपात शब्दकोश तर ओवी व शिवी कोश ही अर्थासह साकारायचे आहेत यासाठी साधने व मनुष्यबळ गरजेचे आहे. संकलनाचे शिवधनुष्य सरांनी पेलले आहे. आता पुढचा भार सरकारने उचलायचा आहे. त्यासाठी किमान एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तो सरकारने केला तर बोलीभाषेतील माय मराठीची ही समृद्धी अबाधित राहणार आहे नव्या पिढीलाही ती मिळणार आहे.
केवळ उत्सवाने माय मराठीचा अभिजातपणा अबाधित राहणार नाही. त्यासाठी भाषेची मूळं ज्या शब्दरूपात आहेत त्याचे संकलन उपयोजन आणि पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेत ‘खळे’ या शब्दाच्या संदर्भाने येणाऱ्या अन्य शब्दांची संख्या सुमारे २० आहे. आता धान्याच्या राशी करण्यासाठी मळणीयंत्र आल्याने खळे आणि त्या संबंधाने येणारे शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीला तर ते कळणारही नाहीत. लोकभाषेतील अशा अनेक शब्दांची अवस्था हीच आहे. -डॉ. साहेबराव खंदारे