Marathi books | मराठी पुस्तकविश्वात दर महिन्याला १०० नवीन पुस्तके येत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे. मराठी पुस्तकविश्वाची गाडी सध्या जोरात असून, रोज नव्या विषयांवरील पुस्तकांची भर पडत आहे. पुस्तकांच्या दुनियेत दरवर्षी राज्यात सुमारे ५ हजार नव्या पुस्तकांची निर्मिती होत असून, पुस्तक विक्रेते आणि ऑनलाईन पुस्तक विक्री यातून होणारी मराठी पुस्तकांची वार्षिक उलाढाल सुमारे २५ कोटींवर पोहोचली आहे. कथा, कादंबऱ्यांसह आता माहितीपर, व्यक्तिमत्त्व विकास, ऐतिहासिक, कला-संस्कृती अशा विषयांवरील पुस्तकांचा खप वाढला असून, पुस्तक निर्मितीही वाढली आहे.
मराठीला नुकताच अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद सगळीकडे आहे. मराठी पुस्तक विश्वही आनंदात आहे. कारण, मराठी पुस्तक व्यवसायाला आता गती मिळाली असून, राज्यभरात सुमारे ४५० प्रकाशकांकडून पुस्तकनिर्मिती केली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसह पुण्यात रोज किमान तीन ते चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. विशेष म्हणजे काळाप्रमाणे नवीन पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी संस्थांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पुस्तक विक्रीपासून ते प्रकाशनाच्या कार्यक्रमापर्यंतच्या माध्यमातून पुस्तकांची प्रसिद्धी केली जात आहे. त्याशिवाय पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी टीझर, व्हिडीओही तयार केले जात असून, संस्थांची सोशल मीडिया टीम त्यासाठी जोमाने काम करत आहे. नवीन पुस्तके छापून घेण्याबाबत अनेक लेखक प्रकाशकांकडे विचारणा करत असून, संस्थांकडे सध्या नव्या पुस्तकांसाठी मोठी वेटिंग लिस्ट आहे. याविषयी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, मराठी पुस्तकांचे विश्व सध्या तेजीत असून, मराठी पुस्तक व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. मुंबई, पुण्यासह आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुस्तक प्रदर्शन होत आहेत. त्यात राज्यभरातील प्रकाशक सहभागी होत असून, त्यातूनही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचून पुस्तकांची विक्री वाढली आहे. २०२४ मध्ये सुमारे साडेचार हजारांच्या आसपास नवीन पुस्तके प्रकाशित झाली, तर नवीन वर्षातही प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या नक्कीच वाढणार असल्याचे चित्र आहे. ऐतिहासिकसह व्यक्तिमत्त्व विकास आणि एखाद्या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या माहितीपर पुस्तकांना चांगला प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे, आता ‘प्रिंट ऑन डिमांड’ ही नवीन प्रक्रिया आल्यामुळे नवीन पुस्तक करायला कमी कालावधी लागत असल्याने नवीन पुस्तक निर्मितीही वाढली आहे.
