Devendra Fadnavis | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वीच पार पडल्या. मात्र, अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बाकी आहेत. 29 महानरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभर सध्या प्रशासकांच्या हातात आहे. मागील 4 ते 5 वर्षांपासून या निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुका कधी होतील, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
महापालिकांच्या निवडणुका कधी होतील, हे एआयसुद्धा सांगू शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना फडणवीस यांनी महापालिकांच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ‘महापालिकांच्या निवडणुका कधी होतील, हे एआयसुद्धा सांगू शकत नाही. आपल्या संविधानात सर्वोच्च न्यायालय हे एआयपेक्षा वरच्या स्थानावर आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवेल तेव्हा महापालिका निवडणुका होतील.’, असे फडणवीस म्हणाले.
‘त्या लवकर व्हाव्यात, असे आम्हालाही वाटते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आम्ही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही. येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेईल.’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे.