वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाचे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते, अशी धक्कादायक माहिती २८ सप्टेंबर या जागतिक रेबीज दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून उपलब्ध झाली आहे.
भटकी कुत्री व मानवांमध्ये केवळ आंशिक लसीकरण हा रोगाचा प्रमुख जोखीम घटक मानला जातो. या अनुषंगाने कुत्र्यांचे संख्या नियंत्रण आणि कुत्र्यांचे सक्तीचे लसीकरण यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मत मुंबई महापालिकेने व्यक्त केले आहे. दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून पाळण्यात
येतो. मुंबईकरांना विविध नागरी सेवासुविधांसह आरोग्य सुविधा देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही भटक्या कुत्र्यांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
पालिकेतर्फे यंदा ५ हजार भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका विविध प्राणीप्रेमी संस्थांचे सहकार्य घेणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशु वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे.
लस देणे बंधनकारक
ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे, असेही डॉ. पठाण यांनी आवर्जून नमूद केले आहे.
रेबीज हा संसर्गजन्य रोग रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग विशेषतः कुत्रे व मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येतो. हा रोग देशातील मृत्यू आणि विकृतीच्या प्रमुख कारणांपैकी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून हा रोग निश्चितपणे ओळखला जातो, अशी माहिती डॉ.पठाण यांनी दिली.