कादंबरी, कथा, समीक्षा, ललितबंध, संपादन अशा विविध प्रांतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारं आजच्या मराठी लेखकांच्या पिढीतील एक आघाडीचे नाव म्हणून प्रा. डॉ. रवींद्र केशवराव शोभणे यांचा उल्लेख करावा लागेल. खरसोलीसारख्या गाव खेड्यातून आलेला एक युवक साहित्यिक प्रवास करता करता वयाच्या एका टप्प्यावर ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो, हा प्रवास निश्चितच सोपा नसावा. पण ही झेप नवीन लेखकांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे, आनंद निर्माण करणारी आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांचा साहित्याचा प्रवास हा विद्यार्थिदशेपासून सुरू झाला. १५ मे १९५९ रोजी गाव खरसोली, ता. नरखेड, जि. नागपूर येथे या साहित्यिकाचा जन्म झाला. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी १९८३ झाली ‘प्रवाह’ ही कादंबरी लिहिली. निरनिराळ्या दिवाळी अंकांमधून, विशेषांकांमधून, नियतकालिकांमधून कथा, ललितलेख, समीक्षा लेख लिहिता लिहिता त्यांच्या नावावर आज पावतो ३०- ३५ पुस्तके आहेत. नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. सध्या ते विदर्भ साहित्य संघ नागपूर, येथे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. रवींद्र शोभणे हे आजच्या पिढीतील कथाकार, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक म्हणून आश्वासक नाव आहे. त्यांच्या कादंबरी, कथासंग्रह हे ग्रामीण नाळेशी जुळलेले आहेत. ग्रामीण जीवनातील कोवळे आणि अलवार अनुभव टिपण्याचा छंद या लेखकाच्या लेखणीला आहे हे प्रकर्षाने जाणवतं. त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे दारिद्र्य, शोषण, उपासमार याहीपेक्षा पार्थिव शरीराचे भोग त्यामुळे वाट्याला येणारी असाहाय्य कुतरओढ आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक ताण यांचे संमिश्रचित्र रेखाटतात. डॉ. शोभणे संवेदनशील लेखक म्हणून आपल्या परिसरातल्या वास्तवाने हेलावून जातात तेव्हा ते त्यांच्या लेखणीतून ‘पांढर’ सारखी कादंबरी लिहून मोकळे होतात. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच ग्लोबलायझेशनमुळे प्रगतीचा मुखवटा बेसूर असल्याची जाणीव झाली आणि त्याची झड कृषीव्यवस्थेला लागली. ग्लोबलायझेशनने गावगाड्याच्या नैसर्गिक जीवनाचा विनाश करून कृषीव्यवस्थेच्या आर्थिक नाड्यांमधले रक्तच शोषून घेतले. त्यामुळे कृषीवलाचंच जीवन उजाड झालं, तसंच भुईचंही सृजनशीलत्व नष्ट होऊ लागलं. कृषीवलांची ही अगतिकता अस्मानी संकटांनं ओढवली. सुन्न करणारं हे वास्तव ‘पांढर’ मधून मांडताना लेखक हळवा होतो. तेव्हा लक्षात येतं की लेखकाची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे.. गावापासून लेखक डॉ. शोभणे वेगळे होऊ शकत नाहीत. यावर्षी आलेली त्यांची ‘होळी’ ही कादंबरी असो किंवा कुठलाही कथासंग्रह असो, ललित असो, एकूणच त्यांच्या लेखनातून जाणवते ते हे की गाव हा त्यांचा आणि सोबतच त्यांच्या लेखणीचाही आत्मा आहे. अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित मूळ हिंदी लेखक विश्वनाथ प्रसाद तिवारी), अदृश्याच्या वाटा (कथासंग्रह), अश्वमेघ (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग), उत्तरायण ( महाभारताची मानवी पातळीवर मांडणी करणारी कादंबरी), ऐशा चौफेर टापूत (ललित बंध), ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह), कादंबरीकार श्री. ना. पेंडसे (समीक्षाग्रंथ), कोंडी (कादंबरी), गोत्र, चंद्रोत्सव (कथासंग्रह), चिरेबंद, जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा), तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी), पांढर (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता: परंपरा आणि दर्शन (संपादित), मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी), वर्तमान (कथासंग्रह), शहामृग (कथासंग्रह), सत्त्व शोधाच्या दिशा (कादंबरी), संदर्भासह ( साहित्य आणि समीक्षा), सव्वीस दिवस (कादंबरी) ही त्यांच्या विचारातून प्रकटलेली आजवरची साहित्यशिदोरी आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाचे वाङमय पुरस्कार, रणजित देसाई साहित्य पुरस्कार, नाथ माधव साहित्य पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, डॉ.अ. बा. बर्टी पुरस्कार, बा. कृ. चोरघडे पुरस्कार, शंकर पाटील पुरस्कार, घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा (अमेरिका) पुरस्कार, आणि डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार (अमेरिका) यांसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनातील सारे ताण-तणाव त्यांच्या लेखनातून व्यक्त होतात. त्याशिवाय मानवी नात्यातील गुंतागुंत, माणसामाणसातील बदलत्या नातेसंबंधाचा शोध, बाह्य वास्तवाच्या आक्रमणाने माणसाच्या भाव विश्वाची होणारी पडझड ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. जीवन वास्तवाचा सखोल आणि चिंतनशील पातळीवरील अव्याहत शोध हा त्यांच्या लेखनाचा मूलधर्म सांगता येईल. आयुष्य मुठीतून निसटून जातं आणि आपल्याला ते धरूनही ठेवता येत नाही. पण आपलं जगणं जर पाण्यासारखं प्रभावी असेल तर जगणं वाहू लागतं असे लेखकाला वाटते. डॉ. शोभणेंच्या लेखणीतून जीवनाचा अव्याहत शोध सुरूच आहे. पण तरीही जगणं कळलंच नाही असे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना जैविक पातळीवर आपली नाळ गावापासून तुटून या जगरहाटीत ढकलल्यासारखी वाटते. आणि त्यांनी नव्या नाळेशी जुळवून घेत स्वतःला शोधायचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.
डॉ. रवींद्र शोभणे समीक्षक म्हणूनही प्रतिभेचा खोल आवाका असलेले जाणवतात. त्यांची समीक्षेप्रती असलेली निरामयता, विश्लेषणातला समतोलपणा, वाङमयाकडे पाहण्याचा संवेदनधर्म कुठेच ढळलेला दिसत नाही. आशय सूत्रांना धक्का न पोहचता सांभाळलेली मानवी तरल संवेदनक्षमता त्यांच्या समीक्षात्मक लेखातून सुद्धा दिसून येते. विदर्भातील डोंगरांना आणि माणसांना उंची नाही अशा शब्दांत अनेकदा वैदर्भियांचा अवमान केला जातो; परंतु हा समज चुकीचा आहे. मराठी साहित्याच्या प्रांगणात अनेक दिग्गज प्रतिभावंत या विदर्भभूमीतच निर्माण झालेत. ग. त्र्यं. माडखोलकर, म. म. बाळशास्त्री हरदास, वा. ना. देशपांडे, डॉ. य. खु. देशपांडे, कवी अनिल, लोकनायक अणे, कवी सुरेश भट, विदर्भ वागीश ब. ना. एकबोटे, डॉ. मा. गो. देशमुख, बालशंकर देशपांडे, प्रा. राम शेवाळकर असे कितीतरी प्रतिभावंत नावं सांगता येतील. या दिग्गज, प्रतिभावंतांच्या पंक्तीत डॉ. रवींद्र शोभणे हे नाव समाविष्ट झाले यात शंका नाही.
नव्वदीच्या कालखंडातील कादंबरी खूप वेगळ्या वाटेने जाऊ पाहते आहे. अनेक विषय ती आपल्या अंगाखांद्यावर खेळवू लागली आहे. विविध विषयांना भिडण्याचा यशस्वी प्रयत्न करू लागली आहे. रंगनाथ पठारे (रथ, चक्रव्यूह, टोकदार, सावलीचे वर्तमान, ताम्रपट, दुःखाचे श्वापद, कुंठेचा लेखक), भारत सासणे (दोन मित्र, राहीच्या स्वप्नांचा उलगडा ), विश्वास पाटील (पानिपत, झाडाझडती, महानायक, चंद्रमुखी, पांगिरा), राजन गवस (चौंडक, भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट), सदानंद देशमुख (तहान, बारोमास), राजन खान (शरीयत, वळू बनातील कामधेनु, सत् ना गत, यतीम, काफर), रवींद्र ठाकूर (महात्मा, धर्मयुद्ध), नामदेव कांबळे (राघवेळ), श्याम मनोहर (कळ, हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव), सुरेश द्वादशीवार (तांदळा, हा कुमी, अलकनंदा, वर्तमान) बाबा भांड (दशक्रिया, तंट्या), मेघना पेठे (नातिचरामी), कविता महाजन (ब्र, भिन्न) इत्यादी कादंबरीकार या कालखंडात आपआपल्या परीने विविध विषयांना भिडण्याचा आणि त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत, दिसत आहेत. कादंबरीच्या बाबतीत वेगळ्या वाटेने जाणाऱ्या या मांदियाळीत डॉ. रवींद्र शोभणे हे नाव समाविष्ट करावेच लागेल. डॉ. शोभणे यांची प्रत्येक कादंबरी वेगळ्या वाटेने जाणारी आहे. त्यांच्या साहित्यात जिवंतपणा आहे. जीवनाच्या तळाशी जाऊन सर्वार्थाने जीवनदर्शन घडविणारी त्यांची प्रत्येक साहित्यकृती आहे.
अमळनेर येथे २०२४ ला होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष हा मान डॉ. रवींद्र शोभणे या साहित्यिकाला मिळाला याचा खूप आनंद आहे. ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी. विदर्भाच्या पदरात अनेक साहित्यिक हिरे आहेत. ती ही परंपरा चालवत आलेले आहेत आणि पुढेही चालवत राहतील यात शंका नाही. साहित्यकार डॉ. रवींद्र शोभणे यांचे संमेलनाध्यक्ष निवडीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
वर्षा पतके