वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
एकाच काळात मोठ्या प्रमाणावर वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर हवा आणि वायू प्रदूषण होते. नायट्रोजन आणि सल्फर हे हानीकारक वायू या फटाक्यांतून तयार होतात. त्यामुळे अनेक जण हल्ली फटाकेमुक्त दिवाळीचा आग्रह धरत असतात. याला हरित फटाके हा एक पर्याय समोर आला आहे. हरित फटाके म्हणजे ज्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होते, तसेच जे पर्यावरणपूरक आहेत ते फटाके. या फटाक्यांना डिसेंबर २०२० मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी)ने या हरित फटाक्यांचा शोध लावला आहे. या फटाक्यांत असते काय? __ या फटाक्यांत अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बन या पदार्थांचा वापर केला जात नाही. वापरले तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प असते.
कसे असतात हे फटाके?
१.पाण्याचे कण तयार कराणारे फटाके – यात नायट्रोजन आणि सल्फर वायू मिसळले जातात. नीरीने याला सेफ वॉटर रिलिजर असे नाव दिले आहे.
२.सल्फर आणि नायट्रोजन कमी करणारे फटाके – नीरीने या फटाक्यांना स्टार फटाके असे नाव दिले आहे. यामध्ये
ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला जातो. ते जाळल्यानंतर कमी प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर तयार होतो.
३. कमी अॅल्युमिनियमचा वापर – यात अॅल्युमिनियम ५० ते ६० टक्के कमी वापरले जाते. याला सफल असे नाव दिले आहे.
४. सुगंधी फटाके – हे फटाके फोडल्यानंतर सुगंध येतो.
यामुळे प्रदूषण होतच नाही का?
फटाके कोणतेही फोडले तरी त्यामुळे प्रदूषण होतेच. हरित फटाक्यांमधूनही धूर निघतो; पण त्याचे प्रमाण कमी असते. म्हणूनच त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. सामान्य फटाक्यांपेक्षा हरित फटाक्यांतून तुलनेने ४० ते ५० टक्के कमी हानीकारक वायू निर्माण होतात.