द दून स्कूलचा ७२ एकर विस्तार असलेला कॅम्पस आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील इमारतींमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालये आहेत. शाळा पारंपरिक विषयांसोबत २१व्या शतकातील आधुनिक अभ्यासक्रम प्रदान करते. ही स्कूल फक्त मुलांनाच प्रवेश देते. फक्त बॉईज स्टुडन्टसाठी ही निवासी शाळा आहे. द दून स्कूलमध्ये पाच मुख्य हाऊस आहेत. सर्व विद्यार्थी या पाच हाऊसमध्ये विभागले आहेत. ओबेरॉय, जयपूर, टाटा, काश्मीर, आणि हैदराबाद. ह्या हाऊसमध्ये विद्यार्थी राहतात. तसेच शाळेच्या सर्व स्पर्धा आणि विद्यार्थ्यांची शिस्त व सर्वांगीण विकासाची काळजी घेतली जाते. जगात जेवढे खेळ शिकवले जातात त्या सर्व खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या सोयीसुविधा या शाळेत आहेत. द दून स्कूलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोहणे, अॅथलेटिक्स, टेनिस, स्क्वॅश आणि बॅडमिंटन अशा अनेक खेळांच्या सुविधा आहेत. स्कूल विद्यार्थ्यांच्या खेळांसोबत कला आणि संस्कृतीसुद्धा विकसित करते. शाळेने कला आणि सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी विविध क्लब आणि संघटनांचा समावेश
आहे. यासाठी प्रत्येक उपक्रम हा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. एवढे होऊन येथील विद्यार्थी शैक्षणिक उत्कृष्टतेमध्ये जागतिक स्तरावर अव्वल आहेत. द दून स्कूलचा शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो. या शाळेचा उद्देशच जगामध्ये वर्ल्ड लीडर बनवणे हाच आहे आणि इथे प्रवेश घेणारे पालकसुद्धा जागतिक व्यावसायिक कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे या स्कूलच्या अभ्यासक्रमात समस्या सोडवण्याच्या कौशल्यावर अधिक भर दिला जातो.
इथे कोणीही अगदी सहज शिक्षक म्हणून शिकवायला येऊ शकत नाही. येथील प्रत्येक शिक्षक हा जागतिक स्तरावरील सर्वात उत्तम शिक्षक असतो. शाळेतील शिक्षक त्या त्या विषयातील तज्ज्ञ असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासाला प्रोत्साहित करतात. स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची नावे ऐकली की समजते येथील शिक्षक किती तज्ज्ञ व्यक्ती असतील.
द दून स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, सिव्हिल एव्हिएशन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्यवसाय आणि उद्योगात हिरो एंटरप्राईजचे अध्यक्ष सुनील कांत मुंजल, बॉम्बे डाईंगचे मालक नेस वाडिया तर मीडिया आणि पत्रकारिता क्षेत्रातील एनडीटीव्हीचे सह-संस्थापक प्रणॉय रॉय, प्रसिद्ध पत्रकार करण थापर. साहित्य आणि कला क्षेत्रामधील ख्यातनाम लेखक अमिताव घोष, इतिहासकार रामचंद्र गुहा, स्पोर्ट्स फील्डमधील खेळ प्रशासक मुकुल मुडगाळ तर सैन्यात लेफ्टनंट जनरल जोरावर चंद बक्षी, विज्ञान आणि तंत्रज्ञानात हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन. आत्ताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीसुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहेत. ही सर्व नावे वाचल्यानंतर स्कूल आणि स्कूलचे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय मेहनत घेत असतील हे आपल्या लक्षात येतच असेल. ही निवासी शाळा असून या शाळेची फी भारतातात सर्वात जास्त आहे. साधारण वर्षाला या शाळेची फी १८ ते २० लाख रुपये आहे. त्यामुळे इथे येणारे पालक हे श्रीमंत वर्गातीलच असतात, पण सर्व श्रीमंत पालकांना येथे प्रवेश नसतो. शक्यतो भारतातील उच्च अधिकारी, टॉपच्या कंपन्यांचे मालक, राष्ट्रीय राजकारणी यांचीच मुलं येथे असतात. श्रीमंत घरातील मुलांचे नेतृत्व गुण आणि शिक्षण याची काळजी घेणारी ही शाळा आहे.
भारतातील अनेक श्रीमंत कुटुंबे त्यांच्या मुलांना देहरादूनच्या द दून स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. द दून स्कूलचे मुख्य उद्दिष्ट भविष्यातील नेते तयार करणे हे आहे. हे स्कूल विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वाची आणि सामाजिक जबाबदारीची जाण निर्माण करते. हेल्थकेअर क्षेत्रातील उद्योगपती लविंदर सिंह यांचे म्हणणे आहे की, द दून स्कूलमधील शिक्षणाने त्यांच्या जीवनाला दिशा दिली. सिंह यांच्या परिवारातील अनेक सदस्य या शाळेत शिकले आहेत. द दून स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमुळे अनेक उद्योगपतींना व्यवसायात यश मिळाले आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मंडळाच्या अध्यक्षस्थानावर गौतम थापर आहेत. ते सर्व माजी विद्यार्थ्यांच्या समूहाचे नेतृत्व करतात. हे स्कूल इंग्लंडच्या ईटन कॉलेजवर आधारित आहे. वकील सतीश रंजन दास यांनी हे स्कूल सुरू करताना इंग्लंडच्या ईटन कॉलेजकडून प्रेरणा घेतली. ईटन कॉलेज, इंग्लंडमधील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. ती १४४० मध्ये स्थापन झाली. हे स्कूल ब्रिटिश राजघराण्यातील आणि समाजातील उच्च वर्गातील मुलांसाठी शिक्षण देते. ईटनचे विद्यार्थी, ज्यांना ‘इटनियन्स’ म्हटले जाते, ते उच्च शिक्षण, राजकारण, आणि विविध क्षेत्रात अग्रगण्य आहेत. ईटन कॉलेजची विशेषत: म्हणजे त्याचे कठोर शैक्षणिक मानदंड, विस्तृत सहशालेय क्रियाकलाप आणि विद्यार्थी-शिक्षकांचे घनिष्ठ नाते.
द दून स्कूलची स्थापना ईटन कॉलेजच्या धरतीवर करण्यात आली होती. पहिले मुख्याध्यापक आर्थर ई. फुट हे ईटन कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. स्कूलचे वर्तमान मुख्याध्यापक डॉ. जगप्रीत सिंह आहेत. स्कूलमध्ये विविध सामाजिक सेवा प्रकल्प राबवले जातात. काही प्रकल्प शाळेच्या स्तरावर असतात तर काही स्टुडन्ट हाऊसच्या माध्यमातून चालवले जातात. विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमांमध्ये विना-नशा गावांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये जागरूकता मोहीमा, सूक्ष्म वित्त प्रकल्प, स्वच्छ पाणी निर्मिती, आणि स्वस्त वीट निर्मिती प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प केवळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नव्हे तर गरिबांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी असतात. शाळा आपल्या संसाधनांचा उपयोग करून गावांतील आणि झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी विविध शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रम राबवते. शाळेने स्लम आणि गावातील शाळांच्या विकासासाठी आर्थिक मदतही केली आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प त्यांच्या स्वतःच्या निधीच्या माध्यमातून चालवले आहेत, जेणेकरून त्यांना व्यवसाय तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी मोठेपणी मोठमोठ्या कंपन्यांचे मालक होणार असल्यामुळे त्या कंपन्या चालवताना त्यांना सामाजिक भान असावे, म्हणून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून अनेक सामाजिक उपक्रम करून घेतले जातात. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या तत्त्वांचा प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे त्यांच्यात दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्याची क्षमता निर्माण होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हे प्रकल्प चालवतात, ज्यामुळे त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित होते आणि सामाजसेवेची जाणीव होते. अनुभवात्मक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्य यांचा विकास होतो. * लेखक शिक्षण अभ्यासक आणि इस्पॅलिअर स्कूलचे संचालक आहेत.
देहरादून, उत्तराखंड येथे स्थित द दून स्कूल, भारतातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. १९३५ मध्ये कोलकाताच्या वकील सतीश रंजन दास यांनी ही स्थापन केली. पहिले ही स्कूल ब्रिटिश पब्लिक स्कूल सिस्टीमवर आधारित होती. गेल्या ७५ वर्षांपासून ही उत्कृष्ट शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. ‘नॉलेज अवर लाईट’ या बोधवाक्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि सर्वांगीण विकासाची ग्वाही इथे दिली जाते. ही शाळा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि याचा पूर्ण पाया हा ब्रिटिश शिक्षण पद्धतीवर होता. स्कूलच्या पायाभरणीचा दगड तत्कालीन वायसरॉय लार्ड विलिंग्डन यांनी ठेवला होता. सुरुवातीपासूनच द दून स्कूलने शैक्षणिक उत्कृष्टता, चरित्र घडवणे आणि नेतृत्व कौशल्ये यावर भर दिला आहे.
सचिन जोशी