श्रीनगर – देवबंदमध्ये ऑगस्ट १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी नजीर अहमद वानी याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 31 वर्षांनंतर ही अटक झाली आहे. वानीला एटीएस आणि पोलिसांच्या पथकाने श्रीनगरमधून अटक केली. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सागर जैन यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि देवबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी देवबंदमधील बॉम्बस्फोटातील आरोपीला जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. 1992 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या होत्या आणि त्यादरम्यान देवबंदमध्येही अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाला होता. Deoband bomb blasts

ऑगस्ट 1993 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी शहरात पोलिसांवर बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नजीर अहमदला अटक केली होती, मात्र 1994 मध्ये त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यापासून तो फरार झाला असून याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते. बॉम्बस्फोटानंतर आरोपी नजीर श्रीनगरमध्ये राहत होता आणि श्रीनगरमधील त्याच्या कारवायांचा तपास सुरू आहे.