भगतसिंग यांच्या शिक्षणाचा प्रारंभ गावच्या प्राथमिक शाळेत झाला आणि लवकरच अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी म्हणून तो शाळेत प्रसिद्ध झाला. भगतसिंग चौथीमध्ये असताना गुरुजींनी सर्वांना विचारले, तुम्ही मोठेपणी काय करणार? कोणी म्हणे मी नोकरी करणार, कोणी म्हणे शेती, तर कोणी म्हणे व्यापार करणार. भगतसिंग म्हणाला, मी इंग्रजांना देशाबाहेर हाकलणार. त्याच्या उत्तराने अचंबीत होऊन गुरुजींनी छोट्या भगतची पाठ थोपटली.
२८ सप्टेंबर १९०७ रोजी सकाळी ९ वाजता पंजाबमधील रायपूर जिल्ह्यातील बंगा गावी (सध्या पाकिस्तानात ) सरदार किशन सिंग आणि माता विद्यावतीच्या पोटी भगतसिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या दिवशीच काका सरदार अजित सिंग, वडील सरदार किशन सिंग आणि लहान काका सरदार स्वर्ण सिंग तुरुंगातून सुटले. म्हणून सर्वजण म्हणाले, हा भागोवाला (भाग्यवान आहे. घरातील तीन क्रांतिकारकांची तुरुंगातून सुटका आणि त्यातच या बालकाचा जन्म झाला. घरात आनंदी आनंद पसरला होता. म्हणून त्याच्या दादीने जयकौर यांनी या बालकाचे नाव ठेवले ‘भगतसिंग’.

भगतसिंगच्या शिक्षणाचा प्रारंभ गावच्या प्राथमिक शाळेत झाला आणि लवकरच अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी म्हणून तो शाळेत प्रसिद्ध झाला. भगतसिंग चौथीमध्ये असताना गुरुजींनी सर्वांना विचारले, तुम्ही मोठेपणी काय करणार? कोणी म्हणे मी नोकरी करणार, कोणी म्हणे शेती, तर कोणी म्हणे व्यापार करणार. भगतसिंग म्हणाला, मी इंग्रजांना देशाबाहेर हाकलणार. त्याच्या उत्तराने अचंबीत होऊन गुरुजींनी छोट्या भगतची पाठ थोपटली. गावात आजी-आजोबांकडे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आपल्या आईवडिलांजवळ भगतसिंग लाहोरला आला आणि आर्य समाजाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात गेला.
१३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथे अत्यंत भीषण असे जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगतसिंग शाळेत जायला म्हणून निघाला आणि सरळ अमृतसरला जाऊन पोहचला. त्याने अमृतसरला जालियनवाला बागेत जाऊन निरपराध्यांच्या रक्ताने माखलेली माती उचलली आणि थोडी माती छोट्या बाटलीत भरून तो परतला. त्यावेळी भगतसिंगाचे वय होते अवघे १२ वर्षे. अमृतसरमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती होती. अनेक प्रेते तशीच पडली होती. या स्थितीतही भगतसिंग त्या हुतात्म्यांना प्रणाम करायला जालियनवाला बागेत पोहचला होता. केवढी त्याची ही देशभक्ती!
१९२१ साली भगतसिंगाने असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी नववीतच शाळा सोडली. पुढे त्याने नॅशनल कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. त्याला संस्कृतची आवड होती. तसेच त्याने उर्दू व हिंदी भाषेतही बरेच लेखन केले. अभ्यासाबरोबर त्याला अभिनयाचीही आवड होती. तो एक उत्तम नेता, अभिनेता आणि प्रणेता होता. १९२४ साली भगतसिंगने ‘नौजवान भारत सभेची’ स्थापना केली.
२० ऑक्टोबर १९२८ रोजी पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथे सायमन कमिशन येऊन धडकले. या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवून ‘सायमन परत जा’च्या घोषणांनी त्यांचे स्वागत करायचे ठरले. या सर्व आयोजनाचे नेतृत्व नौजवान भारत सभा या युवक संघटनेकडे होते. या मिरवणुकीचे नेतृत्व वृद्ध लाला लजपतराय करीत होते. सायमन कमिशनला शहरात प्रवेश करणे अशक्य झाले. म्हणून सेंडर्सने लालाजींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या हजारो निदर्शकांवर बेछूट लाठीमार केला. लालाजींच्या डोक्यावर जोरात लाठीचा प्रहार त्याने केला. या प्राणघातक हल्ल्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचा मृत्यू झाला. लालाजींच्या वधाचा सूड घेण्याचा प्रस्ताव भगतसिंगाने मांडला व तो संमतही झाला. त्यानंतर बरोबर एका महिन्याने म्हणजेच १७ डिसेंबर १९२८ हा दिवस सँडर्स वधासाठी निश्चित करण्यात आला. भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद या तिघांनी मिळून ती कामगिरी पार पाडली. या घटनेनंतर लाहोरमध्ये राहणे सुरक्षित नसल्याने ते तिघेही लाहोरबाहेर पडले आणि भगतसिंग कोलकात्याला पोहचले.

इंग्रज सरकार केंद्रीय विधिमंडळात दोन अत्याचारी बिले मांडणार होते. एक पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरे ट्रेड डिस्प्यूट बिल. यातील पहिल्या कायद्यामुळे युवक आंदोलनावर मर्यादा आणणे, बंदी घालणे शक्य होणार होते, तर दुसऱ्या कायद्याने कामगारांना हरताळ, संप या त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणे शक्य होणार होते. ही बिले पास होणे म्हणजे सरळ सरळ भारतीय जनतेचा अपमान होता. म्हणूनच व्हॉइसराय जेव्हा हे कायदे संमत करतील तेव्हा केंद्रीय विधिमंडळात बॉम्बस्फोट करायचे आणि आपली भूमिका स्पष्ट करणारी पत्रके फेकायची अशी योजना क्रांतिकारकांनी आखली.
८ एप्रिल १९२९ रोजी दोन्ही बिले व्हॉईसराय यांच्या संमतीने कायद्यात रूपांतरित करण्यात येत असल्याची घोषणा होताच भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी आपल्या जागेवर राहू हातातील बॉम्ब सरकारी बाकड्यांच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेवर लाकडी भिंतीवर फेकला. बॉम्बस्फोट होताच प्रचंड गोंधळ सुरू झाला आणि लोकांना काही कळण्यापूर्वीच भगतसिंगने दुसरा बॉम्ब फेकला. भगतसिंग व दत्त यांना हवी तेवढी संधी व भरपूर साधने असतानाही पळून न जाता त्यांनी आपल्या जागेवरून तारस्वरात घोषणा दिल्या….. इन्कलाब झिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद!
भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोघांनाही आत्मसमर्पण करून आपल्या न्यायालयीन वक्तव्यांद्वारे परतंत्र भारताची परिस्थिती जगासमोर आणावयाची होती. त्यामुळे ते दोघे तसेच आपल्या जागेवर गोंधळाची मजा पाहत हसत उभे होते. काही वेळाने एक सार्जंटांचे पथक तेथे आले आणि भगतसिंगाने डोळ्यांनीच स्वतःला पकडण्याविषयी खुणावले. पुढे दोघांवर खटला चालून त्या दोघांनाही जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली.
जय गोपाळ आणि हंसराज बोहरा यांच्या साक्षीवरून सँडर्सचे वधक म्हणून सरदार भगतसिंगचे नाव पोलीस अधिकाऱ्यांना कळले होते. दत्त व भगतसिंगवर दिल्ली असेम्ब्ली प्रकरणासंबंधी अभियोग चालू असतानाच त्यांना तेथून आणून या खटल्यात आरोपी म्हणून उभे करण्यात आले. ७ ऑक्टोबर १९३० रोजी बोस्टन जेलमध्ये लाहोर कट या ऐतिहासिक महत्त्वाच्या खटल्याचा निर्णय जाहीर केला व त्यानुसार भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या काळकोठडीच्या काळात भगतसिंगने ‘आत्मकथा’, ‘मृत्यूच्या दारात’, ‘आयडियल ऑफ सोशालिझम’ आणि ‘स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पंजाबचा पहिला उठाव’ ही चार पुस्तके लिहिली.
२४ मार्च १९३१ हा फाशीचा दिवस निश्चित केला होता. वधस्तंभाजवळ जाताच भगतसिंग तेथील संबंधित अधिकाऱ्यांकडे पाहून म्हणाला, तुमचे भाग्य अतिशय चांगले आहे. कारण आज स्वातंत्र्ययुद्धातील शूर सैनिक मृत्यूला किती निर्भयपणे आलिंगन देतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्हाला फक्त दोन मिनिटे अधिक वेळ द्या. कारण आम्हाला आमच्या काही घोषणा द्यायच्या आहेत आणि मग तिघांनी तारस्वरात घोषणा दिल्या, क्रांती चिरायू होवो, साम्राज्यवादाचा नाश होवो, वंदे मातरम. नंतर तिघांनी आपण होऊन फाशीचा दोर आपल्या गळ्याभोवती टाकला. बरोबर ७ वाजून २३ मिनिटांनी या तिन्ही शूर भारतवीरांना फाशी देण्यात आली. ‘आझादी और जिंदगी एक बात है। गुलामी और मौत एक बात है। हा अंतिम संदेश आपल्या देशबांधवांसाठी देऊन भारतमातेच्या या सुपुत्रांनी देहाचा परित्याग केला.
पुष्पा गोटखिंडीकर
लेखिका इतिहास अभ्यासक आहेत.