माणगाव ; रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या प्राचीन कुंभे घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या केळगण गावाच्या देवराईमध्ये ३४ वीरगळ, विष्णूमूर्ती आणि शिवमंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. त्यांची स्वच्छता व संवर्धन मोहीम टीम कुर्डुगड, स्थानिक केळगण ग्रामस्थ यांच्या संयुक्त उपस्थितीत झाली.
महाराष्ट्रातील आद्य पराक्रमी घराणे सातवाहन राजांच्या काळापासून चौल बंदर ते जुन्नर असा प्राचीन व्यापारी मार्ग अस्तित्वात होता. याच मार्गावरील निजामपूर – कुंभा घाटमार्गे व्यापाऱ्यांचे तांडे उपराजधानी जुन्नरकडे मालवाहतूक होत असे. कुंभा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केळगण गावच्या देवराईमध्ये असंख्य वीरगळ असल्याची प्राथमिक माहिती टीम कुर्डुगडचे सदस्य आकाश सिलीमकर यांना कळल्यानंतर लगेचच ग्रामस्थांच्या सहकार्याने वीरगळ संवर्धन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत ३४ वैविध्यपूर्ण वीरगळ, भग्न विष्णूमूर्ती, संदिग्ध देवतामूर्ती आढळून आल्या आहेत. मोहिमेदरम्यान इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी उपस्थितांना वीरगळांचे स्वरूप, महत्त्व आणि वाचन कसे करावे, याबद्दल विस्तृत माहिती सांगितली. देवराई परिसरात वरदायिनी देवीचे मंदिर असून काळभैरव, केळ जाई आणि शिवमंदिराचे फक्त कच्चे चौथरे दिसून येतात. इतक्या मोठ्या संख्येने वीरगळ सापडल्याने तसेच शैव मंदिरासोबतच वैष्णवपंथीय राजवटीचे पुरावे आढळल्याने केळगण गावचे प्राचीन स्थान अधोरेखित होत असल्याचे मत रामजी कदम यांनी मांडले. वीरगळ संवर्धन मोहिमेमध्ये टीम कुर्डुगडचे दिवेश कदम, आकाश सिलीमकर, सूरज जोरकर, प्रमोद पडवळ यांच्यासह इतर सदस्य, केळगण ग्रामस्थ उपस्थित होते.