प्रभू राम चंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरात पार पडली. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आपला देश ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग होता. राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात (22 Jan) पार पडला. आज मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती कृष्ण शिळेपासून तयार करण्यात आली आहे. कृष्ण शिळा म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊ.
कृष्ण शिळा दगड नेमका कसा सापडला ? अयोध्येतील राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. मूर्तीचं स्मित हास्य लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे. प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे ती कृष्ण शिळेपासून. कृष्ण शिळा नावाचा हा दगड कर्नाटकाताल्या मैसूर या ठिकाणी असलेल्या गाडादेवको या ठिकाणी सापडतो. या जागेला एचडी कोटे तालुका असंही म्हणतात. शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी याविषयी ‘ईटीव्ही भारत’ ला माहिती देताना सांगितलं की एच. डी. कोटे तालुक्यातल्या गुज्जेगौदनपुरा या ठिकाणी शेतजमिनीत हा दगड आढळून आला. या दगडातच प्रभू रामाची मूर्ती कोरण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कृष्ण शिळा हा दुर्मिळ दगड सापडला. अरुण योगीराज आणि त्यांची टीम रामाची मूर्ती घडवण्यासाठी दगड शोधत होते.
कृष्ण शिळेची वैशिष्ट्यं काय ? कृष्ण शिळा हा दगड निळा किंवा काळ्या रंगात आढळतो. त्यामुळे त्याला कृष्ण शिळा असं म्हटलं जातं. हा दगड अत्यंत गुळगुळीत असतो. तसंच कृष्ण शिळा या दगडावर अॅसिड, आग, धूळ यांचा काहीही परीणाम होत नाही. हा दगड वजनाला जड असतो आणि लोखंडाहून अधिक मजबूत असतो. उन वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर काहीही परिणाम होत नाही. हा दगड १ हजारांहून अधिक वर्षे जसाच्या तसा राहतो. त्यामुळे हा दगड मूर्तीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दगडाला बोलीभाषेत कल्लू असंही म्हटलं जातं.