१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. विक्रम गोखले, विनय आपटे, श्रीराम लागू, बाळ कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर. या सगळ्यांच्या सहया घेण्यासाठी प्रेक्षक जमले, तेव्हा विक्रम गोखले पुढे आले आणि म्हणाले, इथे अगोदर प्रत्येकाने पाच-पाच रुपये जमा करावेत, मगच सही मिळेल. हे पैसे नाट्यसंकुलासाठी वापरले जाणार आहेत. त्यासाठी जे पैसे देतील त्यांनाच सही मिळेल. आपली सामाजिक बांधिलकी सर्वांनी सांभाळावी, असे कलाकारांना आवाहन केले आणि बाजूला झाले. यावेळी आपल्यावर कोणी टीका करेल, आपला प्रेक्षक दुखावेल, अशी कसलीही भिडभाड त्यांनी बाळगली नव्हती. पण अगदी स्पष्टपणे ते बोलून गेले खरे; पण प्रेक्षकांनी तेवढ्याच आनंदाने पैसे देण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाही पैसे न देणाऱ्या रसिकाला त्यांनी सही दिली नव्हती.
त्या अगोदर दहा वर्षे सातारच्या शाहू कला मंदिरात पेइंग गेस्ट हे नाटक घेऊन ते आले होते. त्यावेळचा किस्साही तितकाच मजेशीर आहे. शाहू कला मंदिर तेव्हा खुला रंगमंच होता. बंदिस्त नाट्यगृहात त्याचे रुपांतर झालेले नव्हते. ३ फेब्रुवारी १९८१ ला हा प्रयोग खुल्या रंगमंचावर झाला. साताऱ्यात प्रचंड कडाक्याची थंडी पडली होती. प्रेक्षक कुडकुडत नाटक पाहत होतेच; पण रंगमंचावरही कलाकारांना थंडीने बोलताना त्रास होत होता. खल्या रंगमंचाचा पडदा हा सरकता नव्हता, तर वर जाणारा होता. नाटकाचा पडदा वर गेला आणि नाटक सुरू झाले; पण या पडद्याला माऊली प्रॉडक्शनचा बॅनर नाट्यसंस्थेने जोडलेला होता, त्यामुळे तो पडदा खाली लोंबत होता. त्यामुळे प्रेक्षकांना रंगमंचावरील नाटक दिसण्यात बाधा निर्माण झाली होती, म्हणून खालून प्रेक्षकांमधून अहो तुमचं थोडं वर करा…. अशी कमेंट आली. प्रेक्षकांत हशा पिकला. त्यावेळी विक्रम गोखले लव्हसीनमध्ये होते. तो सोडून समोर आले आणि म्हणाले, कृपया सर्वांनी लक्षात घ्या की, हे नाटक पुरेसे अश्लील आहे. त्यामुळे तुमच्या अश्लील कॉमेंट आता करू नका. पडदे ओढणाऱ्यांनी थोडी खबरदारी घेऊन हा पडदा आणखी वर सरकवा, असे सांगून नाटक पुढे सुरू केले. याचवेळी थंडीचा कडाका इतका वाढला की, नाटकात संवाद म्हणताना कलाकारांची बोबडी वळ लागली. तेव्हा संवाद म्हणता म्हणता विक्रम गोखले विंगेत जाऊन बॅगमधून आपली शाल घेऊन आले आणि सहजपणे ही रंगभूमीवरची हालचाल आहे, असे भासवत शाल गुंडाळून पुढचे नाटक केले. कसलीही भिडभाड न बाळगता त्यांचे वागणे अत्यंत बिनधास्त होते.
पण एकूणच त्यांचा रंगभूमीवरचा वावर, संवादफेक ही सहज आणि नैसर्गिक अशी असायची. नाटकात कलाकाराला संवादफेक केल्यावर टाळी मिळावी, ही अपेक्षा असते. काशिनाथ घाणेकर तर एन्ट्रीला टाळी घेणारे होते. एखादा कलाकार खूप मोठा डायलॉग म्हणून, स्वगत म्हणून प्रेक्षकांच्या टाळ्या घेतो; पण डायलॉग न घेता टाळी घेण्याची ताकद विक्रम गोखले यांच्यात होती, म्हणजे समोरचा अभिनेता डायलॉग म्हणायचा आणि त्याकडे फक्त एक पॉज घेऊन विक्रम गोखले यांनी पाहावे त्या पॉजलाही ते टाळी घेत होते. संकेत मिलनाचा या प्रयोगात त्यांचे पॉज इतके प्रचंड आणि लक्षात ठेवण्यासारखे आहेत की, आता हे काही बोलतील, मग काही बोलतील, म्हणून प्रेक्षक पिनड्रॉप सायलेन्समध्ये लक्ष देऊन बसलेले असताना यांचा तो पॉज. एखादा श्वास टाळी घेऊन जायचा.
जयवंत दळवींच्या बॅरिस्टर, महासागर या नाटकांतील त्यांचा अभिनय बघण्यासारखा होता. महासागरमध्ये नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांची जुगलबंदी होती. नाना सर्वसामान्य कुटुंबातला, तर विक्रम गोखले श्रीमंत. बायकोवर प्रचंड प्रेम करणारा; पण माणसाचं मन हे एक अजब रसायन असतं. महासागरासारखं. त्याचा अथांग कोणालाच लागत नाही, असा संवाद त्यांनी टाकल्यावर प्रचंड टाळ्या पडायच्या, कारण बायकोचा घसरलेला पाय आणि त्याला उद्देशून त्यांनी साधलेले टायमिंग हे अप्रतिम होते. रंगभूमीवरचा तो वावर केवढा सहज होता.
दुसरा सामना या नाटकात अशीच जुगलबंदी विक्रम गोखले आणि विनय आपटे यांच्यात पाहायला मिळायची. सामना या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वल अशी कल्पना करून आलेले हे सुंदर नाटक. साखर कारखानदारीवरील आणि तेथील राजकारण आणि अर्थकारणाचा विचार मांडणारे हे नाटक. या नाटकात कारखान्याचा चेअरमन आणि आमदार विनय आपटे, तर कलेक्टर म्हणून विक्रम गोखले. या दोघांमधील संघर्ष आणि जुगलबंदी अप्रतिम पर्वणी होती प्रेक्षकांना. चित्रपट आणि मालिकांमधून आपण विक्रम गोखलेंना पाहत होतोच; पण रंगभूमीवरचा त्यांचा वावर पाहणे हा एक मस्त अनुभव होता. त्या अनुभवाला आता मराठी प्रेक्षक मकला आहे. हे नक्की.
प्रफुल्ल फडके, ९१५२४४८०५५
phadke.prafulla@gmail.com