मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं.
मनोज जरांगेंनी आझाद मैदानातील उपोषणाची सांगता केल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आठ मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने जीआर काढण्यात येणार असल्याचा शब्द उपसमितीने दिला आहे.

उपसमितीने मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीने जीआर काढावा, जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला.
