वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
आपल्या घरात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, कथासंग्रह, कादंबऱ्या, मासिके, दिवाळी अंक असू शकतात. घराची श्रीमंती ही पाश्चिमात्य देशांप्रमाणे तिजोरीतील पैशांवरून नाही, तर पुस्तकांच्या स्थानावरून ठरवली जाते. तो दृष्टिकोन आपणही बाळगला पाहिजे आणि पुस्तकांचे जतन नीट करून घराचे सौंदर्य आणि ज्ञान वाढवले पाहिजे. एखाद्या समारंभात छानसा बुफे मांडलेला असतो, तेव्हा आपसूक खाण्याची इच्छा होते. समोर तबला-पेटी दिसल्यावर गवयाला गायची इच्छा होते. त्याप्रमाणे पुस्तके पाहिल्यावर वाचायची इच्छा झाली पाहिजे.
आवरण घालून विषयवार त्याचे वर्गीकरण करून त्यांची मांडणी करावी. एका विषयाची, एका भाषेची, असे वर्गीकरण करून त्यांची रचना करावी. धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ, पोथ्या जर कापडात गुंडाळल्या असतील, तर त्या देवघरात किंवा अन्यत्र धूळ खात पडण्यापेक्षा चांगल्या कापडात बांधून त्यांची योग्य ठिकाणी शोकेसमध्ये स्थापना करावी. दर काही दिवसांनी त्यांची कापडी आवरणे बदलून पाहावीत. आपण कपडे बदलून फ्रेश होतो, तसेच पुस्तकांची कव्हरे आणि पोथ्यांचे आभ्रे बदलून शोकेसमध्येही नावीन्य आणि चैतन्य निर्माण करावे. पुस्तके आणि त्यांची नावे सतत समोर दिसल्याने वाचनाची प्रेरणा मिळते. ज्या वास्तूतील, घरातील माणसे जास्तीत जास्त वाचन करतात आणि पुस्तकांचे जतन करून त्यांचा आदर करतात, त्या घरात एकोपा राहतो.