सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सातारा येथील शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे.
महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्र येथील संघटनांकडून अध्यक्षपदासाठी नावे दिली जातात. सर्वच संस्थांकडून विश्वास पाटील यांच्या नावाला पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे एकमताने त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुणे, मराठवाड्यासह काही साहित्य संस्थांकडून विश्वास पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर मुंबई साहित्य संघाकडून पुन्हा एकदा प्रविण दवणे यांचे नाव पुढे करण्यात येईल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विश्वास पाटील यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज (रविवार) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य महामंडळाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुढील वर्षी जानेवारीतील पहिल्या आठवड्यात सातारा येथे होणार आहे.
साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांकडून अध्यक्षपदासाठी नावे सुचवली जातात. त्यातील एका नावावर चर्चा होऊन संबंधित व्यक्तीची बहुमताने निवड केली जाते. मराठवाडा आणि पुणे साहित्य मंडळाने माजी सनदी अधिकारी तथा लेखक विश्वास पाटील यांचे नाव सुचवले. त्यानंतर एकमताने विश्वास पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.

यंदा अनुवादक संघाकडून नाव सुचवले जाण्याची शक्यता होती. आतापर्यंत एकाही अनुवादकाला साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही. चंद्रकांत भोंजाळ यांच्या नावाची यासाठी चर्चा होती.
विश्वास पाटील हे माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कादंबरीकार आहेत. ‘पानीपत’ ही त्यांची सर्वाधिक प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही कादंबरी आहे.
विश्वास पाटील यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1959 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नेरले येथे झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम. ए. पदवी घेतली तसेच कायद्याचेही शिक्षण घेतले. भारतीय प्रशासन सेवेतून (आयएएस) आता ते निवृत्त आहेत. भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर तसेच चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. संशोधनावर आधारित लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.
‘पानिपत’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कादंबरी आहे. याशिवाय ‘झाडाझडती’, ‘महानायक’, ‘संभाजी’, ‘चंद्रमुखी’, ‘पांगिरा’, ‘लस्ट फॉर लालबाग’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
विश्वास पाटील यांना साहित्य अकादमीसह विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ‘झाडाझडती’ या कादंबरीसाठी त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. धरणग्रस्तांवरील, त्यांच्या विस्थापनावर आधारित ही कादंबरी आहे. याच पुस्तकासाठी त्यांना प्रियदर्शिनी राष्ट्रीय पुरस्कार 1990 मध्ये मिळाला. याआधी त्यांना ‘पानीपत’साठी नाथ माधव पुरस्कार 1989 मध्ये मिळाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ‘महानायक’ कादंबरीसाठी 1998 मध्ये विश्वास पाटील यांना गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. ‘साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि ९९ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
