९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू स्टेडियम येथे होणार असून साहित्य अकादमी सन्मान विजेते विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. गुरुवार १ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण तर डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दुपारच्या सत्रात कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडीचे आयोजन आहे.
औपचारिक उद्घाटन समारंभ शुक्रवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, पूर्वाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, उद्घाटक डॉ. मृदुला गर्ग यांच्या उपस्थितीत होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात कविसंमेलन, संवाद बाल-कुमार वाचकांशी, परिचर्चा आणि परिसंवाद होणार असून रात्री आठ वाजता प्रशांत दामले यांचे ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक सादर केले जाणार आहे. शनिवारी ३ जानेवारी रोजी कथाकथन, मुलाखत, ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार, पुस्तक चर्चा, परिसंवाद होणार असून रात्री ‘हास्यजत्रा’ हा विशेष कार्यक्रम होईल.
समारोप कार्यक्रमाला रघुवीर चौधरींची उपस्थिती
• रविवार ४ जानेवारीला पुस्तकचर्चा अंतर्गत ‘शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘ यावर चर्चा होणार असून त्यापाठोपाठ मुलाखत, कविसंमेलन, परिसंवाद आणि कादंबरीकारांशी संवाद लक्षवेधी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप कार्यक्रमाला ज्ञानपीठ विजेते रघुवीर चौधरी प्रमुख पाहुणे राहणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, भरत गोगावले, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
