रायपूर (छत्तीसगड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवा रायपूर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्थेच्या ‘शांती शिखर अकॅडमी फॉर ए पीसफुल वर्ल्ड रिट्रीट सेंटर’ चे समाजाला समर्पण केले. यावेळी मोदींनी ध्यानगृहात काही काळ ध्यानही केले. विशाल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अध्यात्म, जागतिक शांतता, पर्यावरण संरक्षण, संस्कृती आणि ब्रह्माकुमारी संस्थेशी असलेले आपले अनुभव मनमोकळेपणाने सांगितले. #Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwa Vidyalaya
आपले भाषण “ॐ शांती” या अभिवादनाने सुरू करताना मोदी म्हणाले, “आपण केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण विश्व आणि सृष्टीसाठी शांततेचे प्रयत्न करता. ‘ॐ’ म्हणजे ब्रह्म आणि संपूर्ण ब्रह्मांड, तर ‘शांती’ म्हणजे शांतीच आमची कामना. म्हणूनच ब्रह्माकुमारींचे विचार प्रत्येकाच्या अंतर्मनावर खोल परिणाम करतात. आमचे अध्यात्म केवळ शांततेचा उपदेश देत नाही, तर शांततेचा मार्ग दाखवते. विश्वशांती ही भारताच्या मूलभूत विचारसरणीचा भाग आहे.”

“मी नेहमी पाहिले आहे, ब्रह्माकुमारी संस्थेत शब्दांपेक्षा सेवा अधिक आहे. ‘शांती शिखर’ या संकल्पनेत मला दादी जानकी यांच्या विचारांचे साकार रूप दिसते. राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास — या मंत्राने आम्ही विकसित भारताच्या अभियानात पुढे चाललो आहोत, आणि या प्रवासात ब्रह्माकुमारीसारख्या संस्थांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मी या आध्यात्मिक चळवळीला वटवृक्षासारखे वाढताना पाहिले आहे.”
मोदी म्हणाले, “आपल्या संस्कृतीत म्हटले आहे — आचार्य परम धर्मः, आचार्य परम तपः, आचार्य परम ज्ञानम् — म्हणजेच आचरण हाच सर्वोच्च धर्म, सर्वोच्च तप आणि सर्वोच्च ज्ञान आहे. खरा बदल तेव्हाच घडतो, जेव्हा आपण सांगतो ते आचरणात उतरवतो, आणि हाच ब्रह्माकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक शक्तीचा मूळ स्त्रोत आहे. येथे प्रत्येक बहिण स्वतः कठोर साधना करून मग समाजासाठी कार्य करते. समाज सशक्त करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका अनन्यसाधारण आहे.”
माझे भाग्य आहे की मी अनेक दशकांपासून या संस्थेशी जोडलेलो आहे. मी येथे पाहुणा नाही, मी तुमचाच आहे. या संस्थेशी माझे आत्मीय नाते आहे. विशेषतः जानकी दिदींचे प्रेम आणि राजयोगिनी दादी हृदयमोहिनीजींचे मार्गदर्शन — हे माझ्या आयुष्यातील विशेष आठवणी आहेत.
२०११ मध्ये अहमदाबादमधील ‘फ्यूचर ऑफ पॉवर’ कार्यक्रम असो, २०१२ मध्ये संस्थेची ७५ वर्षे, २०१३ मधील प्रयागराज कार्यक्रम किंवा माउंट आबू व गुजरातमधील सभा — हे सर्व माझ्या जीवनाचा एक भाग झाले आहेत. दिल्ली आल्यानंतर ‘आजादी का अमृत महोत्सव’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘जल जन अभियान’ या उपक्रमांमध्येही मला ब्रह्माकुमारींसोबत कार्य करण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान झाल्यानंतर मी जेथे जेथे गेलो, असा एकही देश नाही जिथे मला विमानतळावर किंवा कार्यक्रमस्थळी ब्रह्माकुमारी कुटुंबाचे सदस्य भेटले नाहीत. त्यांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत असतात. त्यातून मला आपलेपणा आणि प्रेरणेची ऊर्जा मिळते. तुमचे स्वप्न हे केवळ स्वप्न नाहीत — ते संकल्प आहेत, आणि मला खात्री आहे, ते संकल्प नक्कीच पूर्ण होतील.
आज छत्तीसगड राज्य स्थापनेची २५ वर्षे पूर्ण करत आहे. झारखंड आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांचेही स्थापनेचे २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी सर्व राज्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा दिवस विशेष आहे — ‘शांती शिखर’ सारख्या संस्था भारताच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देतील. येथून प्रसारित होणारी ऊर्जा जगभरातील लाखो लोकांना जागतिक शांततेच्या या भावनेशी जोडेल.
आत्मसंयमातून आत्मज्ञान, आत्मज्ञानातून आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कारातून आत्मशांती या मार्गाने चालत ‘शांती शिखर अकॅडमी’मधील साधक जागतिक शांततेचे माध्यम बनतील. जागतिक शांततेच्या ध्येयात विचारांइतकीच महत्त्वाची भूमिका व्यावहारिक धोरणे आणि कृतींची असते. भारत आज त्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे. जगात कुठेही संकट आले की भारत सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करतो — भारत ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ आहे.
आमच्या प्रत्येक धार्मिक विधीत विश्वकल्याणाची भावना अंतर्भूत असते. जीवमात्रात शिव पाहणे, आणि स्वतःचा विस्तार सर्वांपर्यंत करणे — हीच भारताची अध्यात्मिक चेतना आहे.
आज पर्यावरणविषयक आव्हानांच्या काळात भारत संपूर्ण जगात प्रकृती संरक्षणाचा प्रमुख आवाज बनला आहे. आपल्याला निसर्गाने दिलेले जतन करणे आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण निसर्गासोबत जगायला शिकू. आपल्या शास्त्रांनी आणि प्रजापितांनी आपल्याला शिकवले आहे — नद्या म्हणजे माता, जलात देवत्व, आणि वृक्षांत परमात्म्याचे दर्शन. निसर्गाकडून केवळ घेणे नव्हे, तर परत देण्याची वृत्ती हीच आजच्या जगासाठी सुरक्षित भविष्यातील गुरुकिल्ली आहे.
भारत ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड’ आणि ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर दिशा देत आहे.
अतिरिक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी जयंती दिदी म्हणाल्या “ब्रह्माकुमारी परिवाराच्या वतीने पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत. परमात्मा त्यांना उत्तम आरोग्य देवो, जेणेकरून भारताला ‘विश्वगुरु’ बनविण्याच्या त्यांच्या संकल्पाला सतत सकारात्मक ऊर्जा मिळत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत राहो.
