साहित्यविश्वात शोककळा; रसिकांचा लाडका ‘मिर्झा एक्सप्रेस’ काळाच्या पडद्याआड
अमरावती – मराठी काव्यक्षेत्रातील लोकप्रिय आणि बहुमाननीय नाव असलेले कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (वय ६८) यांचे आज अमरावती येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात तसेच रसिकवर्गात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. मिर्झा यांना ‘मिर्झा एक्सप्रेस’ या टोपणनावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. त्यांच्या अनोख्या सादरीकरणामुळे आणि विनोदी, हलक्याफुलक्या पण सामाजिक जाण असलेल्या कवितांमुळे त्यांनी कवी संमेलनांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मिर्झांच्या हास्यकवितांचे कार्यक्रम महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले होते. शब्दांची खुमारी, प्रसंगांचे खेळकर वर्णन आणि थोड्या मिश्कील अंदाजात केलेले सामाजिक भाष्य ही त्यांची खास शैली होती.
पत्रकारितेशीही त्यांचा जवळचा संबंध होता. ‘मिर्झाजी कहिन’ हा त्यांचा वर्तमानपत्रातील नियमित स्तंभ वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्यांच्या लेखनातून विनोदासोबत बुद्धिमत्ता, समाजाविषयीची संवेदनशीलता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश नेहमीच झळकत असे. त्यांच्या २० हून अधिक काव्यसंग्रहांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
मिर्झा एक्सप्रेस या नावाने त्यांनी अनेक रंगतदार किस्से, जीवनातील गंमतीजमती आणि वाचकांना पोट धरून हसवणाऱ्या कवितांची माळ रसिकांसमोर सादर केली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे.
डॉ. मिर्झांच्या निधनाची बातमी समजताच साहित्य क्षेत्रातील मान्यवर, कवी, लेखक आणि त्यांच्या चाहत्यांकडून शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
डॉ. मिर्झा बेग यांनी आपल्या कवितांमधून सदैव सकारात्मकता आणि एकतेचा संदेश दिला. त्यांच्या निधनामुळे मराठी रसिकवर्गाने केवळ एक कवी नाही तर एक हसरा, मनमिळावू आणि समाजमनाला स्पर्श करणारा कलाकार गमावला आहे.
