इतवार ऊजयला होता. अज् वावरात अन् शायेत जा च बंड्याले कामं नोतं. इतवार म्हनजे पोट्यायच्या चंगळबाजीचा दिस. खानं – पीनं. हुंडारनं. देवळावर जानं. गोठानावर ऊगाचं चकरा मारनं. सामटायनं फिरनं. पांदनीत जावूनं झोपनं. कुत-यायच्या हेंडूकाले गोटे मारनं. मारक्या बोकळ्याले माथ्यावर तर हातानं दाबूनं हुलक देनं. फुलपाखरायले पकळनं. काजव्यायले पकळूनं डब्बीत भरनं अन् तेयच्या गांडीत दिवा कसा लागते एखांद्या चिकित्सका सारखं निरखूनं पाह्यनं. चिड्डयायच्या तंगळ्याने धागे बांधूनं ऊळवत मांग पयनं. इतवार असला तरी शायेच्या पटांगनात अन् पारावर फेरफटका मारनं. गावात जिकळे दिसनं तिकळचे शेनाचे पवटे ऊचलूनं आंगनात आननं. कोंबळ्यायले लसनं खावू घालूनं अन् कुत-याले तेलाची पोई देवूनसन्या कावरं करनं. कोनाच्या काकळ्या चोरं त कोनाच्या आंगनातल्या कुरळ्या त कोनाच्या घरावर बोरकुटासाठी वावू घातलेले बोरं चोरं. असे सारे कामं बंड्या आपल्या दोस्तायसंग करे. बाल्या, सुभ्या अन् आनंद्या हे चवघ जिगरी कलेज्याचे मैतर. लंगोटीतूनं चड्डीलोग आलेली मैतरी.
इतवार दिशी गावात आठवळी बझार भरत असे. दिवसभर सुनसान वाटनार् गांव सूर्य कलतीले लागला की, मीना बझाराचं रूप लेये. परगावातूनं सामायनं ईक्रीले आनना-या लोकायची घोळ्यावरून, खेचरावरून, गध्यावरून, बंड्या- शेकळ्यातूनं एकच गलका ऊळे. लाल, पिव्या, हिरव्या पालायचे दोरं खिव्यायनं आवळले जात होते . बाश्यायचा कनातीले अधार लागे. चंबार टायवरी चपला एका रांगीत लावाले लागला होता. ऊसाची बंडी ठुनीले ऊभी करूनं ऊस ऊभे केले होते. ऊसाचा पाला वा-यावर झेंडीगत झोके घेत होता. पंचायाचे ठन्न्न ढन्न् असे अवाज चाल्ले होते. बुंदा, शेव, चिवळा, फापळीचे ढिगार घुमटावानी सजले होते. बालुशाई, जिल्बी, कलाकंद, पेळा याच्यावर माश्या झु ऽऽऽ झु ऽऽ करत चवभवतालं फिरत होत्या. नागवेलीच्या पानाची टोपली घेवूनं पानोळी घेवूनं बसला होता. पानावर पानं मोठ्या सफाईनं पटपट लावत पानी शिपत होता. खळा मसाल्याचा अन् हयद, भुरका ऊली ऊली पालवात ढिगार करूनं मसालेवाला चम्पा फिरवत होता. तासक्या, गीलास्, वाट्या , चम्पे, सराटे भांडेवाला लावत होता. भाजी ईकनारा आलू, वांगे, टमाटे , पालक, मेथी, संबार, गांजर, रताय, पेवंदी बोरं, लसनं, अदरक, हिरव्या मिरच्या, तेंडली, कारले, गोबी बराबर रचत होता. शेजीचं एकांग बक-याचं मटन, कोंबडीचं मटन, आंडे, मासोया, पारध्यायनं धरूनं आनलेले तितरं, बाट्या, ससे अन् शेजीचं असलेल्या गळीवर डंग-याच मटनं. डंग-याच्या मटनात कवा गाय, कवा बैल, कवा म्हैस, कवा वगार त कवा हेला अस मटनं भेटे. हे मटनं लयचं सस्त ईस रूपये किलो भेटे. लाकळाचा टाल. सरपनाच्या मोया. पालायनं टेंभे पेटले गेले. पाला मानकागत चमकायले लागल्या होत्या . लोकायची गर्दी झोरे मनगटावर घेवूनसन्या नाचाले लागले होते. लोकायचा अन् ईकना-या लोकायचे अवाज बझारभर आयकाले येवू लागले होते. बझारभर अवाज् घुमत होते. रेतीतूनं गरमागरम पोंगे निंगत होते. पानबीळीवाला ईस्माईल चाचा मानीत पाटी अटकवूनं पानं बिळी ईकत बझारभर फिरत होता. चा वाला कॅटली घेवूनं कप वाजवत तलफीले जागवत फिरत होता. सामायनं लादूनं आनलेले जनावरं बझाराच्या एकांग बांधले होते.
बंड्या अन् सुभ्या बझारात झोरा घेवून आले होते. बंड्याच्या मायनं दा रूपयाची नोट बंड्याच्या हातावर ठुयली अन् दा चा काय काय बझार घ्याचा थे सांगलं होतं.
बंड्या सुभ्याले म्हनला..
” सुभ्या भूक लागली लेका चल एक एक आलूबोंडा खावू. “
” अबे पन् माह्याजौळ पैसाअदला नाह्यी. एक खळकू काय कवळी ही नाह्यी. “
” मी हावं ना त्वाला दोस्त. तू काहाले कायजी करतं. हा पाह्य बंदा रूपया. शौकत चाचाच्या वावरात गेल्तो निंदाले त्याचा हा रूपया. चलं आपूनं आलूबोंडा खावू. पन् मायले नोको सांगजो. नाह्यी त बदकाळीनं थे मले. “
” मी काहाले सांगतो बापा. मले काय कावरं कुतरं चावलं.”
” चल मंग पटकन आपूनं आलूबोंडा खावू अन् मंग बझार करू. “
बंड्या अन् सुभ्या हलवायाच्या हटेलीत जातात. रस्यातले आलूबोंडे खातात. माठातलं थंन्डगार पानी जल्मरीच्या गिलासानं पेतात अन् निंगतात बझार कराले. बझारातला कलोय पाहूनं दोघही हरकिजतात. बंड्या सुभ्याले यादी याद करूनं सांगते.
” हे पाह्य सुभ्या लेका आपल्याले कानी आठान्याचे वांगे, आठान्याचे आलू, चारान्याचा पालक, मायले हप्पताभर पुरनं येवळे नागीलीचे पानं, कच्ची सुपारी, बरमपुरी कात, चुनावू, चा गायाची चायनी , मुरमुरे- फुटान्याचं भातकं इतकं सामायनं बसवा लागते गळ्या दा रूपयात. ” बंड्या बोलला…
” हावनं ना बाप्पा लगे. दा रूपयात त निरेपुरे होते. “
दोघही बझारात घुसले. एक एक जिनस घ्याले लागले. आलूवर संभार फुकट, वांग्यावर दा बारा काळ्या मेथीच्या फुकट, पालकावर पातीचे चार कांदे फुकट अस् करत करत सोप, सुपारी, खा चे पानं, चुनावू, भातक हे घेनं झालं. आता बंड्याच्या हातात आठाने ऊरले होते. बंड्या सुभ्याले म्हनला…
” चल लेका सुभ्या आपूनं हिरोच्या फटूचा पिच्चर पावू. ” दोघही पिच्चरवाल्या जौळ आले. चारान्यात एक झन अन् पाच मिन्टाचा शो. असा थो पिच्चरवाला अळ्ळावूनं लोकायले सांगत होता. बाल्यानं घासाघीस करत चारान्यात दोघायले पाहाचा बोला केला. दोघायनं गोल झाकनं खोल्ले. हिरो अन् हिरोयन्याचे फटू पाह्यले. दोघही लय हरकिजले. बंड्याले अन् सुभ्याले दोघायले मूतू लागली होती. बजाराच्या एकांग झोरा ठुयला गेला. दोघही अंधारात मुताले गेले. वापीस येवूनं पाह्यतात त काय? झोरा गायब. दोघही पिसायले सारखे बझारभर झोरा पाह्यत फिरतात पन् झोरा काह्यी केल्या दिसत नाह्यी. सुभ्या बाल्याले म्हनते कसा…
” चोरला लेका भरेल झोरा कोनं. “
” माय घरी गेल्यावर कुताळले लेका. आता कस काय कराव बे. “
” चल घरी. आता जे व्होयनं थे पाहू. आलीया भोकाशी असावे सादर. “
” काय लेका म्हन त सुधी म्हनं… आलीया भोगाशी असावे सादर. “
दोघही खाली माना घालूनं घरी येतात. अन् मुक्या बैलासारखे आंगनात ऊभे राह्यतात.
त असा होता बंड्याच्या वाळेगावचा बझार. लेखक – सु. पुं.अढाऊकर, अकोला. ९७६९२०२५९७