मुंबई, 15 सप्टेंबर : जगात कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊन आता तीन वर्ष झाली आहेत. या तीन वर्षात जगात मोठे बदल झाले. संपूर्ण जग काही काळ बंद पडलं होतं. लाखो लोकांचा मृत्यू झाला. हजारो कोटींचे नुकसान झाले. जगातील प्रत्येक देशाला वेठीस धरणारी करोना व्हायरसची महामारी आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना संपण्याच्या दृष्टीनं याआधी अशी सकारात्मक स्थिती दिसून आली नव्हती. परंतु आजवर जगभरात 65 लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनाच्या या विषाणूशी दोन हात करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न सुरू ठेवण्याचा आग्रह डब्ल्युएचओचे प्रमुख डॉ. ट्रेड्रोस घेब्रेसस यांनी केलाय.
वृत्तसंस्था एएफपीनुसार, डॉ. घेब्रेसस यांनी बुधवारी (14 सप्टेंबर 22) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती (Positive Sign) आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. आपण संधीचा फायदा घेतला नाही तर आपणाला आणखी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा (Variant) सामना करावा लागू शकतो. यातून मृत्युंचा आकडा वाढू शकतो, आणखी अडथळे येतील आणि अधिक अनिश्चिततेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जगभरात सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्यविषयक संस्थेच्या प्रमुखांनी केलेलं वक्तव्य सर्वांत सकारात्मक मानलं जात आहे. विषाणू हद्दपार होण्याच्या दृष्टीनं त्यांचं मत आशावादी असल्याचंही म्हटलं जात आहे. मागील आठवड्यातील जागतिक रिपोर्टमधील (Weekly Report) कोरोना रुग्णसंख्येचे आकडे पाहता ते मार्च 2020 नंतर सर्वांत नीचांकावर असल्याचंही घेब्रेसस यांनी म्हटलं होतं.
11 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओनं एक नवीन अहवाल जारी केलाय. या आठवड्यात जगभरात कोरोनाचे रुग्ण 28 टक्क्यांनी घटून 31 लाखांवर पोहोचले आहेत. याच्या एक आठवड्यापूर्वी यात 12 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेल्याचं एएफपीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Corona Virus पासून दूर राहायचंय? मग फ्रीजरमधले हे अन्नपदार्थ आत्ताच फेकून द्या
दरम्यान, 2019 च्या शेवटी चीनमध्ये कोरोनाचा प्रसार व्हायला सुरूवात झाली तेव्हा जगभरातील देशांना याची धडकी भरली. भारतातही 2020 च्या सुरूवातीलाच कोरोनाचा शिरकाव झाला. सर्वांत आधी केरळ (Kerala) व नंतर इतर राज्यांत याचा लोकांमध्ये संसर्ग वाढत गेला. कोरोनाच्या पहिल्या आणि विशेषत: दुसऱ्या लाटेत कोरोनाचे घातक व्हेरियंट समोर आले अन् मृतांची संख्या झपाट्याने वाढत गेली. लसीकरण (Vaccination) वेगानं झाल्यामुळे कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाला आणि रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. आजही महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मृतांचा आकडाही झपाट्याने घटलेला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं सर्व निर्बंधही हटवण्यात आले आहेत. सगळेजण निर्बंधमुक्त जीवन (New Normal Life) जगत आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू ठेवल्यास लवकरच कोरोना हद्दपार होऊ शकतो, अशी आशा आता निर्माण झाली आहे.