काळ्या मायचं सौंदर्य घेऊन येणारी विठ्ठल वाघांची कविता. सारं मराठीचं शिवार सुगंधित करते.
निःशब्द झालेली शिवारं शतकानुशतकांची तहानलेली. उन्हाच्या झळांनी रापलेली काळी माय. हिरव्या ज्वारीच्या कोंबाच्या पोटरीतून तरारून येणारं ज्वारीचं रसरशीत भरलेल्या दाण्याचं कणीस पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरीसारखीच राशींवर राशी भरभरून देणारी विठ्ठल वाघांची कविता :
झोळी झाडाला टांगून राबराबते माउली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
मातीत राबराबून जगणाऱ्या बळीराजाचं जीवन शिवारातून दिसणारं चित्र झाडाला झोळीच्या खोलीत झोपलेले लेकरू. मायच्या सावलीला कसं पारखं व्हतं, पण पारखेपणातली माया उरी भरून वहाताना दिसते. याच्या निसर्ग देवाचं पूजनही ऐन उन्हाच्या झळाळीत घामाच्या | धारांच्या अभिषेकांत होतं. अशा घामाच्या धारांच्या शिंपण्याने पिकही डोलतात, भजन करतात. शेतकऱ्याचं काळ्या मातीतलं हे जीवन शेतातली-शिवारीतली दैनंदिन वारी करता करता पिकातून जोंधळ्यातून डोलणारा विठ्ठल… भजन करणारा विठ्ठल… कष्टातूनही राबवणुकीतही एक समाधानाचं, समृद्धीचं जीवन कसा जगतो. वाघांची ही तिफण सत्यम्-शिवम्-सुंदरमचं काळ्या मातीतून बहरून येणारं वास्तवातल्या काट्याकुट्यातूनही जीवनाचं रसभरी दर्शन घडवतं.
चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला चाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो
काटा पायात रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं…
ज्वारीच्या दाण्याला वाफाळलेली वाफसा आलेली जमीन अलगद लोण्यासारखा मऊ गर्भात धारण करते आणि ज्या मूकपणे, निःशब्दपणे कोंब उगवतो. मुळं रुततात तशी वाघांची शब्दकळा सहज मनात रुजत जाते… उगवत जाते. या रुजव्यातून ‘हिरवं सपान… मनात डोलू लागतं. काळ्या मायला नुसता घामाचाच अभिषेक नाही घडतं तर रक्ताचीही शिंपण घडते. ऊन-पावसाच्या जीवनाच्या पाठशिवणीत उन्हाचे चटके आणि रक्तबंबाळ करणारे काटे शेतकऱ्याचं जीवन प्रतीत करतात.
काळ्या मातीत मातीत
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो नंदीबैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
‘तिफन’ कवितेने मराठी-ग्रामीण शेतकरी कष्टकरी समाजाचं खरंखुरं अस्तित्व दाखवलं. मराठी सारस्वताची मातीशी नाळ जोडणारी ही कविता वाघांना जसा सूर जुळवून देते, तशीच महाराष्ट्राला स्वतःची खरी ओळखही करून देते. वाघांची कविता गायनाची शैली पण आगळी-वेगळी आहे. खोल रुतत जाणारा नांगराचा फाळ जसा जसा काळी माय नांगरत जातो तशी कविता. आतन आलेल्या दीर्घ हुंकाररूपी आरोळीनं वाघांच्या शब्दांचा फाळ भसाभसा घुसत जातो आणि मन आसूसून साद देऊ लागतं… मोहरून जातं. तिफन-वृषभसूक्त पन्हाटी यांनी मराठी सारस्वताचा चेहरामोहराच बदलन टाकला. आधीचीच समद्ध असलेली ग्रामीण मराठी जोंधळ्याच्या पिकाप्रमाणे बहरू लागली. त्यात व-हाडी बोलीनं साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलं.
विळा घेऊन राबावा माझ्यामधील सावत्या
विठू रुखमाने शोधावा उभ्या पिकात डोलत्या
चंद्रभागेच्या पाण्याचा दांड शेतातून जावा
अन् बुक्क्याचा सुवास काळ्या मातीत भिनावा
पिवळ्या धानात फुलावे पंढरीचे अष्टगंध
आपल्या शिवारातच पांडुरंगाचे दर्शन पाहणारी ही कविता महाराष्ट्रीय माणसाचं अंतरंगच दर्शविते.
अशी घामाची पुण्याई मोक्ष अवतरे शेता
पिकातून डोलणारा स्वर्ग खुणावतो हाता
सोहळा हा पंढरीचा जणू पिकांचा उत्सव
नवा अध्याय लिहून सुखावतो ज्ञानदेव
भुईवर साकारते माझ्या तुक्याचे वैकुंठ
दिव्य दैवताच्या पायी काळ्या ढेकराची वीट असा रोमारोमात भिनणारा हा विठू. व-हाडी दिंड्या पताकांनी काळ्या मातीशी इतका एकरूप झालाय. सारं वैकुंठच शिवारात साकारते आणि सावळ्या विठ्ठलाला काळ्या ढेकळांच्या वीटेवर उभं करते. ज्ञानदेवापासून तुकोबापर्यंत चालत आलेल्या पंढरीच्या मराठीचा हा अखंड प्रवाह मनाला मोहित करतो. विठ्ठल वाघांनी मराठी सारस्वतांची भिंत चालवून आधुनिक शिक्षणाने कोरडी पडत चाललेली इंद्रायणी-चंद्रभागा गावागावांतील शिवारातून दुथडी भरून वाहू लागली. विठ्ठल वाघांची हा विठ्ठल काळ्या ढेकळातून गोन्या कुंभारासारखा, सावता माळयासारखा दंग होऊन नाचू लागला. अभंग ओवीचं वाघांचं नातं ‘वृषभसुक्ता’च्या रूपानं उपनिषदांच्या चिरंतन शाश्वत अनादी शब्दरूपांशी एकरूप होऊन शिवारातल्या विश्वदर्शनानं आपल्याला स्तिमित करतं!
ज्याचे जगणे मातीचे
त्याने आभाळ झेलावे
रंग मेघातील सारे
शिवारात फुलवावे
भोवतीच्या काळोखाला
आत सामावून घ्यावे
सूर्यफुलांचे आभाळी
द्यावे भिरकावून थवे…
व्वा. असं मातीचं जगणं की सारं आभाळ तोलणारं, सारा समाज जागवणारं, सारं विश्व फुलविणारं, समाजातलं द्वैत भिरभिरणारं…!
विठ्ठल वाघांची कविता मनाला भुरळ घालणारी. अज्ञाताचा शोध घेत वास्तवाची वाट चालणारी. बहिणाबाईची सहजता, ज्ञानोबाची तरलता आणि तुकोबांच्या वास्तवतेचं अनोखं दर्शन घडविता घडविता स्वतःची स्वतंत्र वाट शोधणारी माणसातील माणूसपण शोधताना मातीचा रस गंध घेऊन मातीशीच नाळ जोडणारी विठ्ठल वाघांची कविता.
मातीशी नातं जोडताना वृक्ष आणि मातीच नातं एक अतूट असं नातं. काळी माय आपल्या उदरात बीज धारण करते. फळ येईपर्यंत त्याची जोपासना करते. पुढच्या सर्व पिढ्यांना आपली कूस देते. अशी अरण्य संस्कृती रण नसणारी. समतेची बज राखणारी, समरसतेची छाया धरणारी, मातीशी रक्ताची शिंपण करून बहरणारी कविता.
नोका म्हणू पन्हाटीले होते बोंड्याईंचा भार
लेकुरवाईच्या त्या लेकी खेती अंगाखांद्यावर
विदर्भातली कापसाची शेती… कापसाच्या बोंडाचा भार कसा होईल पहाटीला. जसा आईला लेकींचा भार नाही होत. जाता जाता कवी जीवनाचं सारंही सांगून जातात. तर हा कापूस चंद्रालाही आपल्या धवलतेने लाजवितो आणि कापूस पिकविणारी काळ्या मायची लेक मात्र उघडीच आहे.
‘तरी मायमाउलीची मांडी उधळीच आहे…’ ही व्यथा त्यांचं मातीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं वेदनेची आभाळभर छाया धरून राहतं.
आज साहित्याचं रान माजलंय. फेसबुक-व्हॉटस्अॅपच्या युगात जिकडे तिकडे चिखल चिखल दिसत असताना शांत समईसारखा अंधार उजळत कवी स्वतः मात्र…
घेते आरती समई
त्यात पेटवते वातं
मूक मूक जळायचे
असं दोघीतलं नातं.
अशी मराठी माती फुलविणारी कविता. नाती जपणारी कविता. मूक… निःशब्द अंधार उजळणारी कविता…
पद्मश्री गिरीश प्रभुणे
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व यमगरवाडी प्रकल्पाचे जनक आहेत) ९७६६३२५०८२