केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येते. महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमाद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातो.
यावर्षी सप्टेंबर २०२२ हा महिना राष्ट्रीय पोषण म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे. या कार्यक्रमाला केवळ जन आंदोलनाचे स्वरूप न ठेवता लोकांचा सक्रिय सहभाग असण्याकरिता उपक्रमाचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सुचित केले आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित करायचे आहेत. जेणेकरून योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पूर्व शालेय शिक्षण आहार आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल.
सर्व विभागांमध्ये समन्वयक आवश्यक राष्ट्रीय पोषण महिन्यांमधील सर्व विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनाने सुचवलेल्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आयोजित करावयाचे आहेत. यामध्ये स्वस्थ बालक – बालिका स्पर्धेचा देखील समावेश असून केंद्र शासनाने या स्पर्धेची रूपरेषा पाठविलेली आहे.
सक्रीय सहभाग
सप्टेंबर २०२२ मध्ये पोषण महिनासाठी पोषण पंचायतींना सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतींना पोषण माह मधील उपक्रमाचा मुख्य आधार, कणा बनवून जनआंदोलनाचे लोकसहभागात रूपांतर करणे. तसेच ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समितीच्या माध्यमातून पोषणाकरिता लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याकरता पुढील चार प्रमुख संकल्पना केंद्र शासनामार्फत सुचविण्यात आलेल्या आहेत. या संकल्पनेद्वारे राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि स्वास्थ, पालक आणि शिक्षण पोषणाबरोबर शिक्षणादेखील, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ. या महिन्यात राष्ट्रीय पोषण महिना म्हणून योजनेच्या विविध लाभार्थ्यांमध्ये शिक्षण, आरोग्य व पोषण याबाबतची जागृती निर्माण करण्यात येणार आहे.
खेळा आणि शिकामधून जाणीव जागृती पोषण मेळाव्याच्या आयोजनातून बालकांमध्ये पोषणाविषयी जाणीवजागृती निर्माण करण्यात येणार आहे. खेळा आणि शिका या माध्यमातूनही शिक्षण देण्यात येणार आहे. घरांमध्ये खेळ आधारित शिक्षणाला प्रोत्साहान देण्यासाठी समुदाय केंद्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. खेळांद्वारे पोषणाबद्दल ५ व ६ वर्ष वयोगटातील मुले यांना शिकण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच कपोषण.। पोषण जागरुकता यावर निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलांमध्ये मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी प्राथमिक तपासणी करणे, शाळांमधून पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहिम, जेथे लागू व स्वीकार असेल तेथे घरामागील कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन युनिटसह पोषण वाटिका तसेच पोषण पंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहाय्यता बचत गटांचे सदस्य नामनिर्देशित करुन जागरुकता करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण महिन्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हे अभियान बालकांसाठी निश्चितच लाभदायी ठरेल.