मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर काहीवेळापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारा नंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ४ ते ५ राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं. प्राथमिक माहितीनुसार, वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर निर्मलनगर सिग्नलजवळ देवीच्या विसर्जनादरम्यान फटाके फोडले जात असतानाच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर यावेळी 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले होते. त्यावेळी एक गोळी त्यांच्या छातीत घुसली. यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून एक जण हा हरियाणाचा तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, तिसरा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यासोबतच त्यांचा एक सहकारीही जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे.
कोण आहे बाबा सिद्दीकी?
66 वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार असून, त्यांनी अद्याप काँग्रेस सोडण्याची घोषणा केलेली नाही. ते मुंबई युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते.
मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.