‘अस्ताव्यस्त तारांबळ | उधळपट्टी आणि धावपळ |
यासि म्हणावें कार्य अमंगळ। खर्च निष्फळ पैशांचा ।।
लग्नाकरितां कर्ज करावें। जन्मभरि व्याज भरीत जावें ।
लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें । । ‘ – वं. रा. श्री तुकडोजी महाराज
(ग्रामगीता : २१ वा अध्याय ‘वैवाहिक जीवन’)
गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ शेतकरी नेते, तथा समाजसुधारक लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंडळाची विवाहविषयक २१ कलमी आचारसंहिता जाहीर झाली. १९२२ला त्याकाळचे समाजसुधारक स्मृतीशेष अॅड. नामदेवरावजी पोहरे (प्रकाश पोहरे यांचे आजोबा) ह्यांनी स्थापन केलेल्या विदर्भातील सगळ्यात जुन्या अशा मराठा मंडळाने समाजसुधारणेची परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही कायम ठेवलीय.. आपला भारत देश चंद्रावर पोहोचला, तरीही कष्टकरी, शेतकरी, सामान्य मध्यमवर्गीय समाज अद्याप सुधारला नाही, याबद्दल खंत व्यक्त करीत मराठा मंडळाने लग्न समारंभांमध्ये सध्या ज्या अनिष्ट प्रथा वाढीस लागल्या आहेत, त्यावर सांगोपांग चर्चा करून सर्वानुमते २१ कलमी आचारसंहिता निश्चित केलीय. #Maratha Mandal’s code of conduct and undesirable practices regarding marriage
आजकाल विवाह सोहळ्यांमध्ये मोठा हुंडा मागणे, व्हीआयपी व्हीव्हीआयपी पाहुणे बोलविणे, डीजे वाजवत, मद्यप्राशन करून तरुणांनी भर रस्त्यांत नाचणे, यांसारखे अनावश्यक कार्यक्रम करण्याचे वर्तन मराठासह बहुजन समाजात केले जाते. प्रकाश पोहरे समाजसुधारक या नात्याने, तसेच वडीलकीच्या हक्काने असे प्रकार करणाऱ्यांना ‘बिनडोक लोकांची फौज’ म्हणून संबोधतात. खरेतर त्याबद्दल राग बाळगण्याऐवजी आत्मपरीक्षण करून सुधारणा घडवून आणली पाहिजे.
आता अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा अशा भयंकर आहेत, त्याबद्दलदेखील चिंतन करायलाच हवे. लग्नविधीमध्ये नवरा-नवरी आणि वरमाय-वरबाप यांना समोर बसवून ब्राह्मण संस्कृतमध्ये किडमीड बोलत असतो. त्यात ‘राक्षसगण’ असा शब्द उच्चारला जातो. तो क्षत्रियांसाठी असतो. पूजा घालणारा ब्राह्मण हा सत्वगुणी (?) असल्याने स्वतःला भूतलावरील देव समजतो, तर क्षत्रियांना रजोगुणी राक्षस समजतो. चक्क राक्षस! माणूससुद्धा समजत नाही आम्हाला. अशी बेइज्जती केली तरी आम्ही त्याला गलेलठ्ठ दक्षिणा, ड्रायफ्रुट्स, महागडे कपड़े देतो. लग्नात गोत्र सांगितले जाते. शांडिल्य, अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, कश्यप, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती इत्यादी सांगितले जाते. हे सगळे ब्राह्मण समाजांचे गोत्र आहेत. क्षत्रिय मराठ्यांच्या घरात हे ब्राह्मण गोत्र आलेत कोठून? क्षत्रिय- मराठ्यांचे आद्यपुरुष तर भवानी माता, भगवान शिवशंकर- माता पार्वती, आई जिजाऊ हे आहेत !
हे झाले अंधश्रद्धेबद्दल.. आता मराठा मंडळाच्या विवाहविषयक आचारसंहितेतील मोजके मुद्दे याठिकाणी मांडतो.
१) लग्न ठरलेल्या वेळेत लागलेच पाहिजे, याकरिता उभय पक्षांनी दक्ष राहावे.
२) डीजे आणि मद्यपान केलेल्यांना वरातीमागे धिंगाणा घालू देऊ नये. मिरवणूक काढायचीच असेल तर, पारंपरिक वाद्यांच्या आवाजात शालिनतेने काढावी.
(३) निमंत्रित पाहुण्यांना परस्परांमध्ये बोलणे, विचारविनिमय, चर्चा करणे, सामाजिक अभिसरण सुलभ व्हावे म्हणून लग्न समारंभात आर्केस्ट्रा अजिबात लावू नये. त्याऐवजी सनई चौघडा लावावा. ४) फोटोग्राफर्सना मंचावर अवाजवी हस्तक्षेप करू देऊ नये.
(५) प्री वेडिंग शूटिंग शक्यतो टाळावे.
(६) लग्नाकरिता कर्ज काढून उगाच बडेजाव करू नये.
७) आहेर प्रथा बंद करावी, द्यायचीच असेल तर भेटवस्तू देण्याऐवजी पाकिटात रोख रक्कम द्यावी.
८) लग्नामध्ये अवाजवी मेकअप, डेकोरेशन आणि खर्च टाळावेत, रुखवंत प्रथा बंद करावी..
९) नवरा किंवा नवरदेव ह्यांना आतशबाजी करत आणि पर्यावरण दूषित करत, मंगल कार्यालयात आणू नये.
१०) लग्नात हुंडा देऊ – घेऊ नये.
११) जेवण्यात सॅलड, डाळभाजी, एक किंवा दोन मोकळ्या भाज्या, पोळ्या किंवा पुया, भात, एखादे नमकीन किंवा भजे, स्वीट, पाणीपुरी असे पदार्थ ठेवावे.
१२) पत्रिकेवर उगाच अवाजवी, अवास्तव खर्च करू नये, निमंत्रण शक्यतो व्हॉट्सअपवरच पाठवावे आणि शक्य असल्यास जमेल तेवढ्या पाहुण्यांना फोनवर संपर्क करून निमंत्रण द्यावे.
१३) स्वराज्य संस्थापक युगंधर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आरती म्हणण्याची प्रथा काही लग्नांमध्ये आजकाल सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे देव नव्हते, तर मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण करणारे महापराक्रमी योद्धा होते, आरती केल्याने त्यांचा पराक्रम झाकोळल्या जातो. त्याऐवजी लग्न समारंभांमध्ये त्यांचा पुतळा किंवा प्रतिमा ठेवून माल्यार्पण करून कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करणे किंवा पोवाडा लावणे.
१४) लग्नात मुलीच्या आईला मुलाकडील नातेवाईकांचे पाय धुणे, ही प्रथा बंद व्हायला पाहिजे.
१५) लग्नात नम्रपणे अक्षता घेण्याला नकार देऊन, फुल- पाकळ्या उधळणे.

२० मार्च २०२५ रोजी प्रकाश पोहरे यांचा ‘आधुनिक लग्न सोहळेः सामाजिक अभिसरण मातीत मिळविणारा बाजार!’ या विषयावर ‘प्रहार’ प्रकाशित झाला होता. तो आपण मिळवून वाचावा आणि त्यावर सामूहिक चिंतन करावे. खरेतर हा ‘प्रहार’ म्हणजे कुठल्याही भागवत सप्ताहात प्रवचन करण्यासाठी स्पेशल विषय ठेवला गेला पाहिजे. वं. रा. श्री तुकडोजी महाराज म्हणतात,
‘कांही ठिकाणीं विवाह करिती । वेड्यासारखा पैसा उधळिती ।
उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी।।’
हे प्रकार आता कुठेतरी थांबले पाहिजेत व अशी बहुजन समाजाची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल थांबली पाहिजे. म्हणूनच तुकडोजी महाराज पुन्हा म्हणतात,
“ऐशा ज्या ज्या वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहातीं ।
करावी पुन्हा नवीन निर्मिती | सांगितलेल्या समाजनियमांची ।।’
मराठा मंडळाने आचारसंहितेप्रमाणे जर प्रत्येक विवाह सोहळा पार पडला,तरआपली खरी संस्कृती आपण जपत आहोत, असे अधोरेखित होईल.
तुकडोजी महाराजांच्याच भाषेत,
‘विवाहाचा जो संस्कार । त्याचें महत्त्व सर्वांत थोर ।
त्या पायावरीलच समाजमंदिर। म्हणोनि सुंदर करा यासि ।।’
‘लोकनाथ काळमेघ
9096494894 loknathkalmegh@gmail.com