पुरातत्व विभागाचे उत्खनन; सम्राट अशोकाच्या काळातील मडक्यांची खापरे, विहिरी आढळल्या
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध लागला असून उत्खननात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोककालीन मडक्यांची खापरे आढळून आली. सातवाहन राजवंशकालीन सहा विहिरीही आढळल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या गावात नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले असून त्यांनी उत्खनन सुरू केले आहे. (#Discovery of a three thousand year old settlement in Yavatmal district)
पाचखेड येथे २६ मार्च २०२५ पासून संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू आणि नागपूर विद्यापीठ सहसंचालक प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे. सन २०२५ मधील उत्खननामध्ये इसवी सन पूर्व १००० म्हणजेच आतापासून तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळातील महापाषाण, लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घरांचे पुरावे मिळाले आहे. महापाषाण, लोहयुगीन काळातील लोकवस्तीमधील घरे गोलाकार आकाराची असून कुडाची होती. महापाषाण लोहयुगीन काळा लोखंडाची अवजारे तसेच घरांमध्ये चुलीही आढळल्या आहेत. सासू-सुनेचे उखाडे आणि बरड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि पांढऱ्या मातीची टेकडी असलेल्या या परिसराला सध्या पाचखेड गावातील स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणले जाते. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू, प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. मोहन पारधी, डॉ. एकता धारकर, भदंत आनंद आणि ढोकणे यांचा उत्खनन चमूमध्ये समावेश आहे. हे उत्खनन आणखी १५ दिवस सुरू राहू शकते.
