देशात भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलाला रोज सकाळी दुध पिण्यास देत असाल तर त्याला कॅन्सरचा धोका आहे.कारण देशात सध्या भेसळयुक्त दुध विकले जात असल्याचे एका अहवालातून समोर येत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे दुध विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळत नाही. त्यातच सरकारी अनास्थेमुळे शेतकरी आत्महत्या करू लागला आहे.
आपल्या जिवीतेसाठी तो स्वता:ची दुभती जनावरे विकु लागला आहे. त्यामुळे शहरात दुधच पोचत नाही. जे पोचतय ते खुपच कमी मात्रावर पोचत असल्याकारणाने शहरात भेसळ पसरवली जात आहे. मात्र या भेसळीमुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे.
देशात दुध भेसळीचा बाजार मांडला गेला आहे. त्यामुळे हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दूध आणि दुधाच्या पदार्थामधील वाढती भेसळ हा चिंतेचा विषय बनला आहे. सगळ्याच राज्यात दूध देणाऱ्या जनावरांची संख्या कमी होत असताना दुधाची मागणी मात्र वाढतच आहे. विशेष म्हणजे बाजारात दुधाची कमतरता अजिवात भासताना दिसत नाही. त्यामुळे ही गोष्टी स्पष्ट आहे की, ग्लुकोज पावडर, सोयाबीन तेलाच्या घट्ट मिश्रणासोबत भेसळ करताना जीवघेण्या औषधांचा वापर करण्यात येतो. नैसर्गिक दुधाचा दर्जा बदलून त्यात भेसळयुक्त व शरीरास अपायकारक तथा असुरक्षित पदार्थ मिसळून त्याचे फॅट व डिग्री वाढवून प्रचलित दराने दुधाची विक्री केली जाते.
देशभरात विकले जाणारे ६८.७ टक्के दूध आणि दुधाचे पदार्थ हे भेसळयुक्त असल्याचे अहवालात समोर आले आहे. अशा प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थामुळे देशातील ८७ टक्के नागरिकांना कॅन्सर होण्याचा दावा नुकताच डब्ल्यूएचओने केला आहे. अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ८९.२ टके उत्पादनांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे भेसळ केली जाते, ३१ मार्च २०१८ पर्यंत दरदिवशी १४.६८ कोटी लीटर दुधाच्या उत्पादनाची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचा खप दरदिवशी दरडोई ४८० ग्राम इतके होते. दक्षिणेतील राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतातील राज्यात भेसळीचे प्रमाण अधिक आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. या भेसळयुक्त दुधाच्या पदार्थांचे सेवन केल्याने २०२५ पर्यंत देशातील ८७ टक्के लोकांना कॅन्सर सारखे भयानक आजार जडण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
देशात पंजाबमध्ये दुग्धक्रांती झाली. पण, सध्या पंजाबसह हरियाणा आणि चंदीगडमध्ये दूध आणि दुधजन्य पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार चिंताग्रस्त झाले आहे. येथे जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त पनीरमध्ये टॉयलेट क्लीनरचा वापर करण्यात आला होता. तर, दुधात पाम ऑईल आणि डिटरजंट पावडरचा वापर झाल्याचे आढळले आहे.
भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, डिटर्जंट पावडर, युरिया असे पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात, दुधाचे माप वाढल्यामुळे त्यातील एनएसएफ ( घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच स्टार्च, मीठ, युरिया, स्किम्ड मिल्क ( दूध पावडर) मिसळले जाते. ग्रामीण भागात शक्यतो एकाच वेळी दूध संकलित केले जाते. ते टिकून राहण्यासाठी इतर पदार्थांची भेसळ केली जाते.
आयसीएमआरच्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने मूत्रपिंड, हृदय, यकृत निकामी होऊ शकते. कॉस्टिक सोड्यामुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर त्याचा परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते.भेसळयुक्त दुधामुळे पोटाचे विकार, आतड्यावर सूज तसेच फूड पॉयजनिंग होऊ शकते तसेच यकृताचे विकार तसेच हेपिटायटीससारखे आजार होण्याची शक्यता असते. अनेक वर्षानंतर कर्करोगही होऊ शकतो.
जगभरातील वाढत्या लोकसंख्येची दुधाची गरज पूर्ण करणे हे आव्हान आहे. २०२५ सालापर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे ७८० कोटी इतकी झाली असताना दुधाची गरज ९०० दशलक्ष असेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. जगाच्या एकूण १८ टक्के दुधाचे उत्पादन घेणाऱ्या भारतासाठी ही मोठी संधी असणार आहे. पण, त्यासाठी दुधाचा चांगला दर्जा राखणे खूप आवश्यक आहे. मुख्य म्हणजे दुधातील भेसळ रोखणे खूप गरजेचे आहे.
दूध भेसळीला आळा घालण्यासाठी सध्या अन्न सुरक्षा मानके कायदा आहे. या कायद्यातील तरतूदीनुसार दूध सबस्टॅण्डंड म्हणजे अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाल्यास दूध भेसळखोरांना ५ लाखांपर्यंतचा दंड आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात येते. तर दूधातील हानीकारक पदार्थांमुळे कुणाच्या जीवास धोका पोहोचला, कुणाचा मृत्यू झाला, तर त्यासाठी १ ते ७ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे… पशू पालकांना प्रोत्साहित करुन त्यांना मान सन्मान देण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी जोडघद्यांकडे वळतील, अन्न सुरक्षा मानदे व कायद्यामध्येही संशोधन करुन त्याला सशक्त केले जाईल. त्यामुळे भेसळखोरांविरोधात कडक कारवाई केली जाऊ शकते. दुधात भेसळ करणाऱ्यांवर बहिष्कार टाकून शेतकऱ्यांना दुधाची योग्य किंमत दिली पाहिजे. त्यामुळे ग्राहकापर्यंत शुद्ध दूधाचा पुरवठा होऊ शकेल.