महाराष्ट्रात बाजारात विकले जाणारे ७० ते ७५ टक्के पनीर हे भेसळ असलेले म्हणजे चीज ॲनालॉगपासून बनलेले असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज विधानसभेत केली.
बाजारातील अवघे २५ ते ३० टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार केलेले असते. उर्वरित चीज ॲनालॉगपासून बनविलेले असते. यात ‘व्हेजिटेबल फॅट’ किंवा वनस्पती तुपाचा (पाम तेल) वापर केला जातो. असे कृत्रिम पनीर विकण्याकरिता शासनाची परवानगी मिळते. परंतु शुद्ध पनीरच्या नावाखाली याच कृत्रिम पनीरची विक्री करून ग्राहकांची दिशाभूल होते. त्यामुळे याला प्रतिबंध करण्याची मागणी पाचपुते यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मान्य केले. हा लोकांच्या जिवाशी खेळ असून तपासणीकरिता प्रयोगशाळा उभारण्यासाठी लागेल तेवढा निधी – देण्यात येईल. नियम कडक करण्यात येतील. केंद्राशी संपर्क साधून पुढील कारवाई करू. या अधिवेशनापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडे पाचपुते यांनी बनावट पनीरही दिले. आपल्या लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे, हे तेलाचे गोळे आहेत, असे म्हणत विक्रमसिंह पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. मी प्रश्न मांडला तर कारवाई करण्यात आली. पुणे तसेच चंद्रपूरमध्ये तब्बल 15 लाखांचे पनीर सापडले. ही बाब गंभीर आहे. याविरोधात कोणताही कठोर कायदा नाही. हा माझ्या एकट्याच्या मतदारसंघाचा प्रश्न नाही, तुम्ही पनीर खाऊन पाहा.. अशा शब्दात विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली.

चीज ॲनालॉग म्हणजे काय…
हे हुबेहूब पनीरसारखे पांढरेशुभ्र दिसते. चीज ॲनालॉग पनीरपेक्षा अर्ध्या किमतीत मिळते. या दोन्ही पदार्थांमधील फरक लक्षात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. पनीर हे शुद्ध दूध नासवून केले जाते. त्यामुळे दोन लिटर दुधापासून जेमतेम पाव किलो पनीर मिळू शकते. चीज अॅनालॉगमध्ये दुधाची पावडर आणि वनस्पती तेलाचा वापर करण्यात येतो.
तज्ज्ञांच्या मते, वनस्पती तेल आणि दूध वा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज अॅनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केल्यास मेद वाढणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे, या पदार्थांचा वापर पनीरऐवजी होत असेल, तर सामान्यांच्या आरोग्याचाही विचार व्हायला हवा. गुणवत्तापूर्ण पनीर चवीला उत्तम, मऊसूत आणि प्रथिनांचा पुरेपूर साठा असणारे असते. तर चीज अॅनालॉग हे चिवट, बेचव आणि अत्यल्प पोषणमात्रा असणारे असते. पर्यायी पदार्थ म्हणून ते वापरणे, ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे. लहान मुलांना पनीर अतिशय आवडत असल्याने त्यांच्या व इतरांच्याही आरोग्याशी हा खेळच आहे.
ग्राहकांनी काय करावे?
दुकानांमध्ये प्रतिष्ठित ब्रॅण्डचे जे पनीर विकत मिळते, त्या तुलनेत डेअरीमध्ये पनीरऐवजी चीज अॅनालॉग विकण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, ग्राहकांनी पनीर विकत घेताना किंमत, गुणवत्ता आणि हा पदार्थ नेमका पनीरच आहेना, याची खातरजमा करायला हवी. त्या संदर्भात दुकानदारांना, विक्रेत्यांना प्रश्न विचारायला हवेत. चवीत फरक जाणवला, तर संबधित डेअरी मालकांना खडसावून विचारणा करायला हवी. बिल मागून त्यावर विक्रेत्याने पनीरचा स्पष्ट उल्लेख केला आहे किंवा नाही, याचीही पडताळणी करायला हवी.