अकोला : प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित न्यू ईरा हायस्कूल, दामले चौक, रामदासपेठ येथे पुन्हा एकदा शाळेची घंटा ध्वनित होणार आहे. 1942 साली स्थापन झालेल्या या शाळेतील 1953 पासूनचे हजारो माजी विद्यार्थी येत्या २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित भव्य स्नेहमिलनासाठी एकत्र येणार आहेत. सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत भरविण्यात येणारा हा सोहळा विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल करणारा ऐतिहासिक उपक्रम ठरत आहे.

आजवर शाळेत अनेक माजी विद्यार्थी मेळावे झाले असले तरी १९६० ते २०१५ दरम्यान शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित स्नेहमिलन होत आहे. २५ ते ८६ वयोगटातील विद्यार्थी—अकोला, जिल्ह्यातील विविध भागातून, राज्यातील विविध शहरांतून तसेच परदेशातून—उत्साहाने सहभागी होत असून ७०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.#NewEraHighSchool#PragatikShikshanPrasarakMandal#Akola
या स्नेहमिलनात एकाच शाळेत शिकलेले भाऊ–बहिण, आई–वडीलही विद्यार्थी म्हणून जुन्या आठवणींना पुनश्च उजाळा देणार आहेत. जुन्या वर्गखोल्या, शाळेची इमारत आणि प्रिय शिक्षक-शिक्षिकांसोबत गाठीभेटी घडणार असल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रम दरम्यान चहा, नाश्ता, जेवण तसेच हाय टी यांची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली असून उपस्थित सर्वांना उत्तम आदरातिथ्याचा अनुभव मिळणार आहे.
स्नेहमिलन यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. स्वागत, नोंदणी, सांस्कृतिक, खाद्यव्यवस्था, प्रसारमाध्यम, निवास-व्यवस्था, मंच संचालन, सजावट, स्मरणिका आदी स्वतंत्र समित्या कार्यरत असून प्रत्येक समितीने नियोजनाची तयारी सुरू केली आहे.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी Google Form चा वापर करण्यात आला असून, सर्वांनी आपल्या वर्गमित्र-मैत्रिणींसह लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, ३० नोव्हेंबर रोजी शाळा परिसरात बैठक पार पडली. प्रा. विश्वनाथ भार्गव गद्रे (अध्यक्ष, प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ) म्हणाले, “जुन्या आठवणींना उजाळा देण्याची ही सुवर्णसंधी माजी विद्यार्थ्यांना अपार आनंद देत आहे. परदेशात राहणारे अनेक विद्यार्थीही सहभागी होणार असल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरणार आहे.”
बैठकीस जयंत मधुकर मराठे (उपाध्यक्ष, प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ व कार्यक्रम समिती अध्यक्ष), मुख्याध्यापक श्री. महेश मोरेश्वर ठोके तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
