वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे जतन संशोधन करण्याच्या उद्देशाने समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे १०० ते ८०० वर्षांचे हजारो दुर्मिळ कागदपत्रे आहे. पारतंत्र्याच्या काळात शंकर श्रीकृष्ण देवांनी राष्ट्र आणि समर्थ भक्तीने सन १८९३ मध्ये सत्कार्योतेजक सभा स्थापन केली आणि वि. का. राजवाडे संशोधन मंडळ १९२७ मध्ये स्थापन झाले. १९३२ मध्ये नानासाहेब देव यांनी समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेची स्थापना केली.
महाराष्ट्र राज्य विविध संस्कृतीने, निसर्गाने, विविध अभ्यासाने, विविध कलागुणांनी नटलेले आहे. या राज्याला एक परंपरा आहे. सांस्कृतिक परंपरा आहे. राज्यात ३६ जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात थोर व्यक्ती होऊन गेल्यात. त्यांचे कार्य, त्यांचे वर्णन आदी गोष्टींमुळे तो जिल्हा त्यामुळे एक वैभवशाली ठरला. वैभवशाली ओळख झाली. तसेच २ महान, अभ्यासपूर्ण आणि भूषण असलेल्या दोन संस्था धुळे येथे कार्यरत आहेत. त्या संस्थेच्या नावांमुळे या धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले आहे. त्याम्हणजे धुळे मालेगाव रोडवरील श्री समर्थ वाग्देवता मंदिर आणि मुख्य डाक घरासमोर असलेली वि. का. राजवाडे संशोधन मंडळ.
धुळे मालेगाव रोडवर भव्य दगडी इमारतीत वसलेले श्री समर्थ वाग्देवता मंदिराची वास्तू पाहिली की, मन प्रसन्न होते. समर्थ वाग्देवता मंदिर म्हणजेच श्री नानासाहेब शंकर श्रीकृष्ण देव होय. सुंदर हस्तांक्षर, विविध विषयांचे अवांतर वाचन, अलौकिक बुद्धिमत्ता आणि सहिष्णू वृत्ती या अत्यंत उत्तम आणि प्रतिभाशाली गुणांमुळे धुळे येथे दि. १९ मे १८९३ रोजी सत्कार्येतिजक सभेची स्थापना देव यांनी केली. सन १८७१ ते १९५८-८७ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या देवांनी समर्थाचे फार मोठे कार्य येथे केले. त्यांनी राष्ट्रकारण आणि देशकारणाबरोबर श्री समर्थ संशोधन कार्यास प्रारंभ केला होता.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची भेट देवांसमवेत झाल्यावर स्वातंत्र्याने भारावलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या समवेत देवांचे जवळचे स्नेहांचे, प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. राष्ट्रीय चळवळीत तर त्यांचा मोठा स्नेहाचा वाटा होताच. समर्थाचे संशोधनाचे कार्य झाले पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटत असत.
समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे जतन संशोधन करण्याच्या उद्देशाने समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे १०० ते ८०० वर्षांचे हजारो दुर्मिळ कागदपत्रे आहे. पारतंत्र्याच्या काळात शंकर श्रीकृष्ण देवांनी राष्ट्र आणि समर्थ भक्तीने सन १८९३ मध्ये सत्कार्योतेजक सभा स्थापन केली आणि वि. का. राजवाडे संशोधन मंडळ १९२७ मध्ये स्थापन झाले. १९३२ मध्ये नानासाहेब देव यांनी समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत अस्सल कागदपत्राचा खजिनाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची हस्ताक्षरित अस्सल नाममुद्रा असलेले १६ पत्रे आहेत. चाफळच्या समर्थ मठाला बहाल केलेली सनदेची पत्रे येथे आहेत. समर्थांनी वयाच्या १४ व्या वर्षी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाची मूळ प्रत येथे आहे.
नानासाहेब देव यांनी संत साहित्य आणि वास्तू यांचा प्रचंड संग्रह या ठिकाणी ‘श्री करून ठेवला आहे. त्यात श्री शिव छत्रपतीचे हस्ताक्षराबरोबर, समर्थ रामदास स्वामीची लिखित पोथी आहे. जयदेव रचित गीत गोविंद काव्य, मनाचे श्लोक, विविध भाषेतील ग्रंथराज दासबोध, विद्यावाचस्पती पदवीसाठी तयार केलेले प्रबंध, अध्यात्मिक ग्रंथाची मांदियाळी, ५००० ग्रंथसंचित समर्थाची पवित्र वस्तू, रोहिड खोऱ्यातील देशमुखांचे पत्र, छत्रपतींचा सरदार यांच्या समवेत झालेला पत्रव्यवहार, राजाराम महाराज यांचे पत्र मोरोपंत पिंगळे यांचे पत्र, रामचंद्र नीळकंठ यांचे पत्र, अनेक बखरी, समग्र समर्थ वाडमय, इ. स. १६६२ मध्ये लिहिलेली वाल्मिकी रामायणाची मूळ प्रत, समर्थाचे मोडीतील गद्यपत्र, कल्याणस्वामी यांची दास बोधाची प्रत, मनाचे श्लोक, कल्याणस्वामी, उद्धवस्वामीच्या पोथ्या आणि शिवथरगळ येथील दिवाकर लिखित अनुभवास अमृताची पोथी हे तर मूळ दस्तऐवज येथे पाहावयास अभ्यासास मिळतात. पण याचबरोबर आणखी विशेष म्हणजे एकनाथी भागवताची समर्थ पूर्वकालीन प्रत समर्थ काव्याची पोथी, पंचरत्न गीता, कल्याणस्वामींचे पत्र, हनुमंताचे चित्र, १८२० मध्ये प्रतापगडावरील देवीचा कागद, २ ताम्रपट, ४ ताडपत्र, ६० ते ७० यंत्रे, २०५ मनाचे श्लोक, बखरी, तुलसी रामायण, छत्रपतीचे निवाडे, सनदा, मजहर, वेष्णाबाईची कीर्तने, समर्थाचे स्वहस्ताक्षरातील पत्र व शिक्के आणि टाकळी मठांतील ५० बाडे ही सर्व मन थक्क करणारी अतिशय अमूल्य अशी ग्रंथ सामग्री, वस्तुभांडार या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. सत्कार्योत्तेजक सभेला आज १२९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. १९३५ साली स्थापन झालेला श्री समर्थ वाग्देवता मंदिराचा अमृत महोत्सव वर्षे साजरा झाला. देव यांनी संकलित केलेल्या ५००० संत साहित्याच्या बाडांच्या सहाय्याने श्री समर्थ वाग्देवता मंदिराच्या रुपाने आणि १९७९ साली स्थापन झालेल्या स्व. जानकीबाई देशपांडे वाचनालय, १९९३ साली भारतीय विद्या संशोधन केंद्र असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. या संस्थेत ऐतिहासिक घटनांवरील सुमारे पाच हजार कागदपत्रांची जपवणूक केलेली आहे. संस्थेने ३६ हजार बांडाचे सूचीकरण केले आहे. सुमारे ११० ग्रंथांचे प्रकाशन या संस्थेने केले आहे. ‘रामदास आणि रामदासी’ हे मासिकही ही संस्था नियमित प्रकाशित करीत आहे.
-प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर (लेखक वि. का. राजवाडे संशोधन मंडळचे क्युरेटर आहेत)