वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
वीज ही अगदी वाड्या-वस्तीपासून आलिशान टॉवर्सपर्यंत पोहोचलेली अत्यावश्यक सेवा आहे. म्हणजेच विजेचा वापर हा समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी जणू जीवनाचे अविभाज्य अंगच बनला आहे. आज वीज ग्राहकांची संख्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना दिसते.
ग्राहक हे कुणी परके नसून आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांची सेवा करून आम्ही त्यांच्यावर उपकार करीत नाही, तर सेवा करण्याची संधी देऊन तेच आम्हाला उपकृत करीत आहेत. महात्मा गांधींचा हा संदेश महावितरणच्या ग्राहकसेवेचा गाभा आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्राहक हा मध्यवर्ती आहे. ग्राहकाला दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक ग्राहकास आपले तक्रार अथवा गा-हाणे मांडण्याचा अधिकार आहे. ही न्यायाची प्रक्रिया सोपी स्वस्त व जलद असली पाहिजे. तसे झाले तरच ती परिणामकारक ठरते. हाच उद्देश नजरेसमोर ठेवून विद्युत कायदा २००३ मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्युत ग्राहकाच्या हिताचे रक्षण करणे व त्याच्या गाऱ्हाणे निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची व्यवस्था उभी करणे, हा हेतू समोर ठेवून ही यंत्रणा तयार करण्यात आली.
परिमंडल स्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच. (आपल्या कोल्हापूर परिमंडलात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विद्युत ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे.)
या यंत्रणेच्या कारभाराची वैशिष्ट्ये
१) ही यंत्रणा नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वानुसार काम. २) ग्राहक हिताचे रक्षण करणे. ३) ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती देणे. ४) ग्राहक तक्रारीचे निवारण सुलभरीत्या व त्वरेने करणे.
ग्राहक तक्रार निवारण मंच हा तीन सदस्यीय असतो. या मंचाकडे तक्रार कशी दाखल करावी? तक्रारीचे स्वरूप काय असावे?
महावितरणने ग्राहकांना तक्रार मांडण्यासाठी मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या माध्यमातून टोल फ्री क्रमांकांची सोय केली आहे. हे क्रमांक १८००-१०२-३४३५ व १८००-२३३-३४३५ असे आहेत. तसेच महावितरणचे www.mahadiscom.in हे अधिकृत संकेतस्थळ व त्यावरील ग्राहक हे पोर्टल उपलब्ध आहेत.
मंचाच्या कामकाजातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ग्राहक स्वतः अथवा प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो. तथापि, प्रतिनिधी म्हणून वकिलांना नेमता येत नाही. तक्रार अथवा गाऱ्हाणे दाखल करताना कोणतीही रक्कम अथवा फी आकारली जात नाही.
या मंचाकडे कुठल्या प्रकारची तक्रार करता येते?
१) वीजपुरवठा न करणे,
२) सुरू असलेला वीजपुरवठा खंडित केला जाणे,
३. नवीन जोडणी ( कनेक्शन),
४) मीटरसंबंधित बाबी,
५) वीज बिलाशी संबंधित बाबी.
या मंचाकडे कोणत्या तक्रारी करता येत नाहीत?
१) गुन्हेगारी स्वरूपाची कृती ग्राहकाकडून झाली असेल, तर त्या ग्राहकास मंचाकडे दाद मागता येत नाही.
२) सर्वात महत्त्वाचे गाऱ्हाण्याचे कारण (Death of Cause of action) हे ज्या तारखेपासून घडले असेल तेव्हापासून २ वर्षांच्या आत गाऱ्हाणे दाखल झाले नाही, तर अशा परिस्थितीत.
सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे थकबाकीमुळे वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला गेला असेल, तर भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम ५६ प्रमाणे १५ दिवसांच्या लेखी पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा तात्पुरतादेखील खंडित करता येत नाही. तथापि, तुमची नोंदणी ऑनलाईन असेल, तर तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर येणारा मेसेज अथवा पूर्वसूचना हा लिखित पुरावा मानला जाऊ शकतो.
ग्राहकाची कर्तव्ये
१) तक्रारी मांडताना, दाखल करताना सनदशीर मार्गानेच मांडल्या पाहिजेत अथवा सादर केल्या पाहिजेत.
२) तक्रारीचा विषय महत्त्वाचा असेल, तर तक्रार लेखी द्या व पोहोच घ्या.
३) थकबाकीदार होऊ नका. कारण, आपल्या देय रकमेवर ९ ते १५ टक्के दंड किंवा व्याज आकारले जाऊ शकते.
४) नेहमी आयएसआय प्रमाणित उपकरणे जरी ती महाग असली, तरी वापरा. कारण, ती सुरक्षित असतात.
५) १ युनिट वीज बचत म्हणजे १.२५ युनिट वीजनिर्मिती व विजेची बचत. याचाच अर्थ राष्ट्रीय संपत्तीची बचत.
– कमलाकर बुरांडे