शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय संमेलन
अकोला – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रस्तुत वहाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी व मराठी विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय वहाड लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश चंदनशिवे यांची निवड करण्यात आली आहे. चंदनशिवे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत असून, चंदनशिवे यांनी विपुल अभिनय केला असून, अनेक मराठी, हिंदी नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. महाराष्ट्र शासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी मानद तमाशा लोकनाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत. तमाशा विषयात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले असून, मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
संमेलनामध्ये उद्घाटन (सकाळी १० ते ११.३०), बोलीभाषा, लोककला व लोकसंस्कृती या विषयावर परिसंवाद (११.३० ते १२.३०) यानंतर विदर्भातील विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बंजारा होळी नृत्य, खंजिरी भजन, गोंधळ, भारूड, राम ढोलाचे भजन, मथुरा लभाण लोकनृत्य व चंदनशिवे यांची लोककला सादर होणार आहे. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम होणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र शोभणे, पुष्पराज गावंडे यांचे मार्गदर्शन या संमेलनाला लाभणार आहे.
लोककलेत तरूणांना संधी
या संमेलनाचे मुख्य आकर्षण डॉ. गणेश चंदनशिवे यांचे लोककलेत तरुणांना संधी, चंदनशिवे यांची दुसऱ्या सदरात सादर होणारी लोककला व मथुरा लभाण लोकनृत्य असल्याची माहिती वहाड संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब काळे यांनी दिली आहे.