नागपूर, राज्य शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपलीकडे जाऊन आगामी निवडणुकांचा विचार करून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मांडल्या गेल्या आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेतील चर्चेत केला. राज्याने आधीच मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा घेतला असूनही सरकार अतिरिक्त खर्चाची तरतूद करत असल्याने अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप त्यांनी उपस्थित केला.
पाटील यांनी सांगितले की चालू वर्षासाठी सादर केलेले मूळ ७.५ लाख कोटी रुपयांचे बजेट आता वाढून ८ लाख ९० हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अर्थसंकल्प तब्बल १७.५३ टक्क्यांनी फुगला असून, ही वाढ वित्तीय शिस्त कोसळल्याचे द्योतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, राज्य सरकारकडे कुठलीही दीर्घकालीन आर्थिक योजना नसल्यामुळे खर्च आणि कर्जाचा भार अनियंत्रितपणे वाढत आहे. पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे एकूण कर्ज आता ९,३२,००० कोटी रुपयांपर्यंत गेले असून, राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सरासरी ८२ हजार रुपये कर्जाचा बोजा आला आहे.
“ही स्थिती निर्माण होण्यामागे सरकारची वित्तीय नियोजनातील बेफिकीरी जबाबदार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
