नागपूर, : विदर्भातील साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या विदर्भसाहित्य संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत गिरीश गांधी यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. आज झालेल्या मतमोजणीत गिरीश गांधी यांना एकूण २६६१ मते मिळाल्याने ते १४७४ मतांच्या मोठ्या आघाडीने विजयी झाले. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये गिरीश गांधी, प्रदीप दाते, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. रवींद्र शोभणे आणि रंजन दारव्हेकर यांचा समावेश होता.
मतमोजणीला काल सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. दिवसभर सुरू असलेल्या मतमोजणीत अखेर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार श्री. गिरीश गांधी यांना २६६१ मते, श्री. प्रदीप दाते यांना ११८७ मते, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना ७०१ मते, डॉ. रवींद्र शोभणे यांना २०५ मते तर रंजन दारव्हेकर यांना ११४ मते मिळाली. या प्रक्रियेत एकूण ६३ मते अवैध ठरली. या निवडणुकीसाठी एकूण ४९३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

गिरीश गांधी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठी आघाडी घेत १४७४ मतांनी विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात आले. दरम्यान, विदर्भ साहित्य संघाच्या
उर्वरित २२ कार्यकारिणी सदस्य पदांची मतमोजणी अद्याप सुरू असून आतापर्यंत सुमारे ६०० मते मोजण्यात आली आहेत. या सदस्य पदांचे अंतिम निकाल उद्या रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गिरीश गांधी यांच्या विजयानंतर साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ साहित्य संघाच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
