अनुचित बाबींना आळा घालण्यासाठी पुढे येण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे आवाहन..!
अकोला : सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्याला सावरण्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात औषधं मिळावीत अशा शासनाच्याही जाहिराती असतांना अकोला आणि संपूर्ण राज्यातील औषधी विक्रेते मात्र छापिल दरात औषधे विकून रुग्णांना प्रचंड प्रमाणात आर्थिक भुर्दंड देऊन बेसुमार कमाई करीत आहेत. कर्करोगापासून तर अनेक औषधांच्या स्ट्रीप रू.२०० ते २५० अधिक जी. एस. टी अशा दराने औषधी विक्रेत्यांना मिळतात. परंतू ते १२०० ते १४०० च्या छापिल दराने त्याची सर्रास विक्री करीत असतात. परंतू ज्या समाजात आम्ही जन्माला आलो ते ऋण लक्षात घेऊन शक्य त्या थोड्याशा कमी दराने रुग्णांना औषधं दिली पाहिजेत याची उपरती श्रमिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक यातनांमध्ये भर घालणाऱ्या या स्वार्थांध औषधी विक्रेत्यांना कधीच होत नाही. त्यांच्यात ही भावना नाही आणि सेवाभावी वृत्तीच्या ईतर औषधी विक्रेत्यांनाही त्या पध्दतीचा अवलंब संघटना आणि आणि अन्न व औषध प्रशासनाचा आधार घेऊन करू दिला नाही.
याबाबत नागरीकांनी शासन प्रशासनाकडे आता दाद मागितली पाहिजे. आता अकोला शहरातील एक प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉक्टर मात्र ” मानसिक आजावरील औषधे फक्त ५० टक्के सवलतीच्या दरात ” अशी उघड जाहिरात करीत आहेत. मुळात स्वत: डॉक्टर हे औषधं विक्री करू शकत नाहीत. मग आता अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावरही अविलंब कारवाई करावी. परंतू काही अधिकाऱ्यांना निवासापासून तर गाड्यांचीही सुविधा प्रदान करणाऱ्या त्या डॉक्टरांकडे मात्र “सवलतीचे ते बोर्ड उतरवून ठेवा” असा संदेश केमिस्ट संघटनेकडून पोहचविण्यात आल्याचे समजते. परंतू बोर्ड उतरविल्याने हा प्रश्न सुटणारा नाही. इतरांवर कारवाया केल्या तशी त्यांच्यावरही आता झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
आरोग्य क्षेत्रात कार्यरत काही संवेदनशील सेवाभावी वृत्तीचे औषधी विक्रेते सामाजिक बांधिलकी म्हणून १०-२० टक्यांच्या सवलतींमध्ये औषध विक्री योजना राबवून कर्तव्यभावना जोपासण्याचे प्रयत्न करतात. परंतू प्रचंड कमाईचा अतिरेक करणारे काही पैसापिपासू विक्रेत्यांच्या हितसंबंधांना या पध्दतीची अडचण होत असल्याने ते त्याला विरोध करतात. त्यांच्यासाठी अकोला येथील केमिस्ट अँड संघटनेने अन्न व औषध प्रशासनाकडे अशा सवलती देणारांवर कारवाई करण्याची मागणी सुध्दा मागील काळात केली होती.
म्हणजे नागरीकांना कमी पैशात औषधे मिळू द्यायची नाहीत हा या संघटनेचाही पवित्रा आहे. अवाजवी दराने औषधी विक्रीतून रूग्णांची लूट करणाऱ्यांना संरक्षित करीत समाजजीवनाशी खेळ करण्याचा या संघटनेचा हा एक सामाजिक द्रोह आहे.
महात्मा फुले आणि तत्सम उपचार योजनांमध्ये कमित कमी दरात जेनरिक औषधं मिळावीत अशी जाहिरात शासनाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र त्या औषधांवर भरससाठ नफा कमावणाऱ्या किंमती छापल्या जातात. ही विसंगती म्हणजे नफेखोरी आणि काळाबाजार करणारांना मनसोक्त चरण्यासाठी शासनाने सोडलेले मुक्त कुरण आहे का? असा प्रश्न चिंतनशील जबाबदार नागरीकांना आता पडला आहे.
यासाठी समाजातील नागरिकांनी औषधी विक्रेते आणि त्यांच्या संघटनेच्या या समाजविघातक अनैतिक वाटचालीबाबत संवेदनशील होऊन आक्रमक झाले पाहिजे. औषधी विक्रेत्यांसोबतच आरोग्य क्षेत्र, लुबाडणूक करणाऱ्या काही डॉक्टरमंडळींविरूध्द सुध्दा तक्रारींसाठी पुढे येऊन समाजाजीवनाचा खेळ करणाऱ्या या अनैतिक वाटचालीला आळा घालण्यासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून पुढे आले पाहिजे.असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले आहे.
■ अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सवलतीच्या दरात औषधे विकणारांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची आरडाओरड करणाऱ्या काही औषधी विक्रेत्यांच्या मागणीवरून अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार काही कारवाया झाल्या होत्या. त्या आणि कोरोनाच्या काळात आम्ही सुध्दा आमच्या दत्त मेडीकल मधून २० टक्के किंवा समाजसेवा म्हणून देता येतील तेवढ्या कमी दरात रूग्णांना औषधं देण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतू काही नफेखोर व्यापाऱ्यांच्या बेसुमार कमाईला संरक्षित करण्यासाठी या केमिस्ट संघटना आणि अन्न व औषध प्रशासनाला ही समाजसेवा अडचणीची ठरली होती.त्यामुळे कारवायांचे बडगे उगारल्या गेले. परंतू सध्या अकोल्यात मात्र एक डॉक्टर मानसिक आजारांची औषधे ५० टक्के सवलतीने विकण्याची जाहिरात करीत आहेत. मुळात डॉक्टर हे औषधं विकू शकत नाहीत. मग आता त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली पाहिजे..!