Ajit Pawar : सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केले आहे.
सध्याच्या स्थितीत राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, हे मान्य करत उपमुख्यमंत्री पवार यांनी, परंतु आता कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही आश्वासन दिले होते, पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना सध्या तर नाहीच; परंतु आणखी किमान तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
