महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. साहित्य, वैचारिक लेखन, नाट्यलेखन तसेच समाजकार्याच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत हे पुरस्कार दिले जातात.#Maharashtra_Foundation
यंदाचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक, चित्रपट अभ्यासक आणि दिग्दर्शक अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे. साहित्य, चित्रपट आणि सौंदर्यशास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन आणि मोलाच्या योगदानाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप २ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
तसेच समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागपूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांना जाहीर झाला आहे. त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या दीर्घकालीन कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार असून, याचेही स्वरूप २ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगाल येथील मनीष राय चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
इतर पुरस्कारांमध्ये —
- ललित साहित्य पुरस्कार लेखक निखिलेश चित्रे यांना,
- वैचारिक-अंपारपरिक ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे विनय नारकर यांना,
- रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार पुण्याचे ऋत्विक व्यास यांना जाहीर झाला आहे.
समाजकार्य क्षेत्रातील पुरस्कारांमध्ये —
- सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार गडचिरोलीचे प्राध्यापक जावेद पाषा यांना,
- सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार पुण्याचे दत्ता देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे.
या सर्व पुरस्कारांचे स्वरूप ५० हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
हे सर्व पुरस्कार येत्या १७ जानेवारी रोजी पुण्यात होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास ज्येष्ठ अभ्यासक व आदिवासी भाषांचे संशोधक डॉ. गणेशदेवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कारांमुळे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, तसेच समाजातील परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
