अकोला, दि. २ : उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम यांच्या सहकार्याने ‘व्हाय वेस्ट वाईडब्ल्यूएस’ (यूथ एंगेजमेंट अॅण्ड वॉटर स्टीवर्डशीप) हे ॲप तयार करण्यात आले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याची बचत व पर्यावरण संवर्धन हे त्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्राचा वॉटर स्टुअर्डशीप कार्यक्रम तरुणांच्या सहभागातून आणि शाश्वत पद्धतींद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ७ लाख १० हजार तरुणांना जोडून त्यांना सक्षम करणे, त्यांना साधने पुरवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि एकत्रितपणे पाणी, पर्यावरण आणि शाश्वतता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे असे उद्दिष्ट आहे. लक्षणीय पाणीबचतीसाठी कृती आणि कल्पनांद्वारे हे स्वयंसेवक राज्यातील २.७ दशलक्ष लोकांना प्रेरित आणि प्रभावित करणार आहेत.
हे ॲप तरुणांसाठी एक व्यासपीठ तयार करुन त्या माध्यामातून त्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा यामागील प्रयत्न आहे. हे ॲप दैनंदिन पाणी-बचतीची नोंद ठेवण्यासाठी एक साधन असून पाणी गळती दुरुस्त करणे, नळाचा प्रवाह कमी करणे, शॉवर ऐवजी बादलीने पाणी वापरणे, दात घासताना किंवा दाढी करताना पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे, ग्रामीण भागात शोषखड्डे व पाझरखड्डे बनविण्यास प्रवृत्त करणे, अशा छोट्या – छोट्या सवयींसाठी प्रोत्साहित करते.