रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नेमकं गांडूळ खत कसं तयार करायचं, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
जागा निवडणे : गांडूळ खत निर्मितीसाठी योग्य जागा निवडणे. त्यासाठी सावली असणारी, पाण्याची सोय जवळ असणारी व गांडुळांना लागणारे खाद्य तेथेच उपलब्ध होऊ शकणारी जागा शक्यतो निवडावी.
सुका, ओला कचरा निवडणे : सुका, कोरडा कचरा निवडून घेऊन त्यातील असेंद्रिय पदार्थ उदा. काटे, काचा, कॅरीबॅग, लोखंडी भंगार, प्लास्टिकच्या वस्तू इ. बाजूला काढाव्यात. फक्त कचरा एका वर एक थर लावून त्यात मधोमध, जागोजागी शेणाचा थर द्यावा किंवा शेणाचा सडा टाकावा व पाणी मारून ओला करून ठेवावा.
शेणाचा थर देऊन सहा टाकणे: खतनिर्मितीच्या चारही प्रकारात सारख्याच पद्धतीचा वापर केला जातो. सुरुवातीला अर्धवट कुजलेल्या कचऱ्याचा एक मीटर रुंदीचा, 6 इंच जाडीचा थर लावावा. लांबी आपल्या सोईनुसार ठेवावी, शेणाची स्लरी किंवा पाणी त्यावर मारावे. पुन्हा त्यावर कचरा व नंतर शेणाचा थर अशा प्रकारे दोन ते अडीच फुटापर्यंत उंची घ्यावी व नंतर सर्व बेडवर सर्व बाजूंनी शेणाची स्लरी किंवा शेणाचे पाणी मारावे.
गांडूळ सोडणे : बेडवर सोडावयाची गांडुळे मोकळी करून एकत्र सारख्या प्रमाणात तुटक तुटक सोडावेत. बेडवर गांडुळे सोडल्यानंतर काही क्षणात ते आत शिरतील व नाहीसे होतील. बेडवर मुंग्या, उधी असे दिसल्यास त्यावर हळद पावडर किंवा हळदीचे पाणी मारावे. बेडमध्ये हात घालून तापमान वाढले आहे का ते तपासावे. तापमान जास्त असल्यास त्यावर गार पाणी दोन ते तीन वेळेस मारावे. रोज ईएम पाण्याची फवारणी व शेणसडा करणे : गांडूळ सोडल्यानंतर खतनिर्मिती लवकर होण्यासाठी व गांडुळाचे कार्य सोपे होण्यासाठी बेडवर ईएम (इफेक्टिव्ह मायक्रो ऑरगॅनिझम) ची फवारणी करावी व शेणाचे पाणी करून मारावे. त्यामुळे अर्धवट व न कुजलेले पदार्थ लवकर कुजण्यास मदत होईल व गांडुळाचे कार्य सोपे होईल. तसेच शेणाच्या पाण्यामुळे सेंद्रिय पदार्थ खाण्यायोग्य होईपर्यंत गांडुळांची उपासमार होणार नाही. ते तब्येतीने चांगले राहतील.
खत चाळून गांडुळे वेगळी करणे : गांडुळे 24 तासात अंदाजे 20 वेळा ये-जा करीत असतात व त्यांच्या वजनाच्या पटीत ते खत तयार करीत असतात. त्यामुळे त्यांनी वर येऊन टाकलेली विष्ठा जेवढी जास्त असेल त्यावर त्यांची तब्येत चांगली आहे, असे समजावे. तसेच खत चाळण्या अगोदर 2 ते 4 दिवस पाण्याचा ताण द्यावा व नंतर खत वाळूच्या चाळणीने चाळावे. चाळणीच्या वरील बाजूस गांडुळे जमा होतील, खालील बाजूस चहापत्तीसारखे तयार खत मिळेल. ते जमा करून थंड ठिकाणी ठेवावे व नंतर जमल्यास तयार खतावर रोज पाणी मारून ओले ठेवावे. त्यात अंड्यातून बाहेर येणारी गाडुळे 15 ते 20 दिवसांत मिळू शकतील, ती वेचन घ्यावी व पुन्हा बेडवर सोडावीत.