वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
घर देता काय हो! घर कोनी ,घर देता काय हो! असा टाहो हरेकाच्या मनात फुटते पन् सोताच्या कानालेही आयकू जात नाह्यी कारनं अथिसा घर घेनं खायाचं कामं नाह्यी. कोनं कितिकही बोंबा मारल्या तरी अथिसा बंबईत घर भेटतं नाह्यी. दोन टायमाले काम न करताही अथिसा पोटं भरते पन् राहाचं म्हतलं की, मोठी पंचाईत.
बंबईत राह्यना-या लोकायचे चार भाग पळतात. तुम्ही म्हनानं कस् त पा … पयला भाग तीस मजली चाळीस मजली ऊच्ची ऊच्ची बिल्डींगाईत राह्यनारे लोकं . ह्या बिल्डींगा कुठसा हायेत त ह्या बिल्डींगा महालक्ष्मी, मरीन लाईनं, दादर, चर्चगेट, कुलाबा,लोअर परेल, हाजीअली, बोरीवली, अंधेरी अन् चर्नी रोड अथसा ऊच्ची ऊच्ची बिल्डींगा पाहाले भेटनं .
दुसरा भाग चाळीत राह्यना-या लोकायचं बस्तानं वरळीची बी.डी.डी.
चाळ, दगळी चाळ (ह्याच दगळी चाळीत अरूण गवळी हे राह्यत . ) तसचं चाळी सा-याच ठिकानी ऊली – ऊली दिसूनं येतात. जस् घाटकोपर, गीरगाव,परेल लालबाग , मलाड….
तिसरा भाग झोपळपट्टीत राह्यनारे लोकं. धारावी हे झोपळपट्टी आशिया खंडातली सा-यात मोठीजात झोपळपट्टी. ह्या झोपळपट्टीतले यरियाचे नावं हायेत संगमगल्ली , कुंभार वाळा,ढोरवाडा, मुकुंद नगर, प्रेमनगर , साईबाबा नगर, पिवळा बंगला, नाईकनगर, लक्ष्मीबाग, संग्रामनगर,राजीव गांधी नगर, माहिम फाटक, कुट्टीवाडी, कुंचीकोरवे नगर,माटुंगा लेबर कॅम्प,वाल्मिकी नगर, धोबीघाट, कोळीवाडा अन् अन्ना नगर हा सारा झाला धारावी झोपडपट्टीतला ईभाग. ह्याच अन्नानगर विभागात आमचे परम मित्र हिंदी लेखक जे मुळचे सोलापूरचे हायेत मा. कृष्णा सज्जन जी इथचं राह्यतात. अखिनं काह्यी झोपळपट्टीचे ठिकानं जस् गोवंडी, मानखुर्द,बांदरा, माहिमची बदनाम बस्ती, अॅन्टाॅप हिल, प्रतिक्षा नगर, कुर्ला ची जरीमरी – बैलबजार , सांताक्रुझ ,गोरेगाव, जोगेश्वरी अंधेरी ,किंग सर्कल ह्याच झोपळपट्टीत जाॅनी लिवर या ईनोदी नटाचं लहानपनं गेलं. तश्या ऊली ऊली झोपळपट्टया ब-याच ठिकानी हायं.
अन् चवथा भाग म्हनजे फुटपाथावर राह्यनारे , पुलाखाली राह्यनारे , लोकलं रेल्वे ठेसनायवर राह्यनारे लोकं. शिवडी अन् वडाळा ह्या ठिकानी हे लोकं जादा परमात दिसूनं येतीनं.
त आयका दोस्तहो गोठ ‘बंबईतलं जगनं’. बाल्याचा जल्म ऊमरावतीच्या रिध्दपूर नामक एका ऊल्शा खेळ्यात झाला. बाल्याचा बा पुंडलिकराव लयच साधा भोळा अन् मयाळू त बाल्याची माय कमला लयचं कष्टाळू. घरी ना वावर ना शिवर. कवा कवा त नापिकीनं हाताले मजूरी ना भेटे. कवा कवा ऊपाशी राहाचा टायम ये. अंबाळीची भाकर त कवा मिलोच्या लाल भाकरीवर भागूनं घ्या लागे. चटनीवर तेल ना भेटे. खेळ्यात पोट भरत नसल्यानं बाल्याच्या मायबापानं आकोल्यात स्थलांतर केलं. बाल्यानं मेहनत करतं शिक्शन आकोल्यातचं पुरं केलं अन् बंबईतूनं सरकारी नवकरीचं बलावनं आलं. बंबई म्हतलं की लोकायची आताही फटारते. तथिसा लय महंग हाय सारचं. घरभाळ महंग, चोरं, लुटारू, डकैत हायेत तथिसा म्हनूनसन्या लोकं बाल्याले म्हनत होते. पन् बाल्याच्या बा नं त्याले म्हतलं….
” बाबू लोकायच्या बोलन्याकळे ध्यानं नोकू देवू. तू जाय. सरकारी नवकरी नशीबानं भेटली. आपल्या दलिंदरीचा नायनाट थेच करू शकते. तू जाय घायबरू नोको. लागनं त तुह्यासंग तुवा मैतर सुभ्याले घेवूनं जाय मयनाकभर. पन तू जाय. “
बापाचे बोलं आयकूनं बाल्याले ढिवसा आला. थ्यानं जा च मनात पक्क केलं. मायनं आंगावरले भांडे मोळले. पैसा लेकराच्या हाती ठुयला. पैसा तीन अलग अलग ठिकानी ठुवाले लावला. एका ठिकानचे चोरी गेले त बाकी त राह्यतीनं ह्या ईचारानं. सुभ्या अन् बाल्या दोघही अंबा इसपेरसनं बम्बईले आले. राहाचा ठिकाना नाह्यी. पयल्या दिशी लाॅजवर राह्यले तीनशे रूपयात चोवीस घंटे. दुस-या दिवशी कामाच्या हेड हापिसात गेले. बाल्या रूजू झाला. सुभ्या हापिसाच्या बाहेरी दिवसभर बसूनं होता. दुपारच्या जेवनाचा टायम झाला. सारे लोकं आपापले डबे खोलूनं जेवाले लागले. बाल्या दोन वाजता बाहेरी आला. सुभ्याले बिल्डींगच्या एका बाजूनं पेपरावर झपलेला पाहूनं बाल्याले लयच खराब वाटलं. सुभ्याले बाल्यानं ऊठोलं. सुभ्यानं तोंडावर पान्याचा शिपका मारला. दोन वळापाव घेतले. ऊभ्याऊभ्यानचं वळापाव खाल्ले. प्लॅस्टिकच्या बकेटीतलं गटगट पोटभर पानी पेले. ऊच्ची ऊच्ची बिल्डींगा पाहूनं दोघही पार घायबरले होते. तीन वाजले बाल्या हापिसात गेला. सुभ्या संध्याकाय लोग बाहेरी बसूनं येना-या जाना-या गाळ्या पाह्यत होता. सा वाजता हापिस सुटलं. जो थो आपल्या रसत्यानं लागला. बाल्या बाहेरी आला. सुभ्या अन् बाल्याले डबलूनं थोच ईचार पळ्ळा. आता कुठ रहावं. कुठ झपाव. बाल्या अन् त्याचा मैतर सुभ्या दोघही ईचारात पळ्ळे. मंग दोघही बोरीबंदरच्या ठेसनावर गेले. भुयारघरातल्या वदरे अराम हटेलच्या शेजी असलेल्या झुनका भाकर केन्द्रात दोन दोन भाकरी बेसनं हानलं चार रूपये देवूनं. बोरीबंदरच्या लोकल ठेसनावर गेले. पेपर हातरले . ऊश्याले कपळ्याचा झोरा घेतला. मटकेच डोया लागला होता. तितक्यात दंडूके घेवूनं दोन पोलिस आले. दोघायच्या ढुंगनावर रपारप दोन रट्टे देल्ले. दोघही खळकन जागी झाले. पोलिस बोलला… ” काय रे कोठूनं आले आहात तुम्ही. ” बाल्या बोलला. ” साहेब आम्ही आकोल्याचे. मी नवकरी निमित्तानं अथिसा आलो. अन् आजचं नवकरीवर रूजू झालो. पैसाअळका नसल्यानं अतिसा झोपलो. पायटीचं आम्ही निंघू. ” पोलीसाले बाल्याचे बोलने खरे वाटले. पोलिस बोलला…” अरे! मुलांनो तुम्ही गरीब घरचे दिसत आहात इथे झोपू नका. नाही तर रात्री तुमच्या अंगावरच्या कपड्यासह तुम्ही लुटल्या जालं. येथे रात्रीस चोरं फिरतात. चला माझ्या सोबत. ” असे म्हनून पोलिसायनं चौकित नेलं. ” झोपा या बाकड्यावर आणि पहाटे निघा. थंडी वाजली तर तेथे ठेवलेले ब्लँकेट घ्या हो . ” असे म्हनून दोघही पोलिस गस्तीवर निघाले. दोघायले निचंत झोप लागली. पायटीचं दोघं ऊठले. रूपया देवूनं बी. एम.सी. च्या बाथरूमात आंघोयपानी करूनं तयार झाले. दोघही हापिसात पयदल गेले. बाल्या हापिसात त सुभ्या चर्चगेटच्या बाहेरी झू ऽऽ झू ऽऽऽ पयना-या मोटार गाळ्या पाह्यत बसला . धावनारे पयनारे लोकं पाह्यत होता.
एक एक दिवस थे दोघं कसेतरी ढकलत होते. सुभ्याही दोस्तासाठी सारं काह्यी सह्यनं करत होता. बाल्याचा अकोल्याचा दोस्त आनंद यानं मा. आमदार श्री. हरिदासजी भदे ययच्या कळूनं मनोरा ह्या आमदार निवासाची मयना भराची दोघायचे नाव टाकलेली पास घेतली अन् बंबईत पास घेवूनं आला. बाल्याले लय हरिक झाला. फुटपाथावरला बाल्या अन् सुभ्या ऊच्ची ईस मजली मनोरा आमदार निवासात आले. तथिसा राहाची लयच साजरी सोय. गादी, चादरा, एसी, मोठमोठाले आंघोयीचे शावरचे बाथरूम, इंग्लीस संडास्, जेवाची कॅन्टिन.. पन् मयना भुर्र्कन सरला. तेयले दोघायले बाहेरी निंगा लागलं. हापिसात धारावी झोपडपट्टीतले हिंदी लेखक कृष्णा सज्जन काह्यीतरी कामानिमित्त आले. बाल्या अन् कृष्णा भाऊची मैतरी झाली. दोघही साहित्यिक असल्यानं दोघही साजरेचं मैतर झाले. बाल्यानं ” राहाचा काह्यी ठिकाना असनं त सांगा ब्वा सज्जन जी. ” कृष्णा सज्जन ययनं ” चला ऊद्याच धारावी झोपडपट्टीत तुम्हाला खोली देतो.” असे म्हतले .. बाल्या अन् सुभ्या दोघही धारावीत इतवारी दाखल झाले. गल्ल्या गल्यायनं जातानी ऊली ऊली बोळीत दिवसाही अंधार झुळूक होता. ऊल्शी खोली सज्जन ययनं दाखोली. सामायनं काह्यीचं नोतं फकस्त एक थैली. त्यात दोगायचे दोनं कुरते अन् दोन पॅन्टा अन् टवाल. रातमाय झाली .खोलीत अंधारकिट. मेनबत्ती लावल्या गेली. घरात हवेची एक झुयक येत नोती. घामानं लतपत होवूनं दोघही निझले. दुस-या रोजी दोघही कामावर निंघाले. दररोज एक एक दिवसं कसा तरी ढकलत होते. खोलीत अंधार भुळूक, घराच्या पुळूनचं नाली. नालीतूनं ऊळनारे चिल्ट, सामटीत पळलेला कचरा, नालीवर हागाले बसवलेले लेकरं . कियसवान्या वासानं दोघही भंडावूनं जात. कसतरी काही दिवस काहाळले. मंग पगार झाला. कांजूरमार्गले म्हाडात खोली भाड्यानं केली. आंगाले ऊन लागेना. रातभर आंगातूनं घाम गये. आंग खारट होये. आंगावर मिठ आल्यासारखं वाटे.
एक खोली एक किचन बरं होतं. असे दिवसरात लोटत होते.
बाल्यानं अन् सुभ्यानं चारही परकारचं बंबईचं जगनं पाह्यलं होतं. बाल्या आता ब-या पैकी शेटल झाला होता. सुभ्या बाल्याले बोलला.
” मी जातो मंग गावाले. ऊद्या ईतवारही हायं. “
बाल्या बोलला…
” थाम्बनं बे अखिनं काह्यी दिवस लेका. मले अथिसा एकट्याले सोळूनं चाल्ला. “
दुस-या रोजी ईतवारी सुभ्या तयारी करते. दोघही बोरीबंदर ठेसनावर येतात. सुभ्या गाळीत धसते अन् बाल्या आसवायनं सुभ्याले सारं करते.
– सु.पुं.अढाऊकर, अकोला.
९७६९२०२५९७