डॉ. रवींद्र शोभणे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या पदरी पडणे म्हणजे आपल्या लेखकीय जीवनातला अंतिम सन्मान अशी धारणा बहुतेकांची असते. माझीही ती आहे. कारण या निमित्ताने त्या लेखकाला महाराष्ट्रात, मराठी साहित्य प्रेमींमध्ये कमालीचा आदर, प्रेम मिळते, हा माझा अनुभव मी सांगू शकतो. मी अद्याप लिहिता लेखक आहे. फिरता लेखक आहे, म्हटले तर धावताही लेखक आहे. लोकांमध्ये वावरणे मला आवडते. मी माझ्यापरीने माझी समाजनिष्ठा जपणारा आहे. ही समाजनिष्ठा जपताना मी समाजातील प्रश्नांना भिडणारा, त्या प्रश्नांना आपल्या लेखनातून मांडू पाहणारा लेखक आहे. प्रत्येकाचे संघर्षाचे, सामाजिक वर्तनाचे, निषेध – स्वीकाराचे मार्ग विविध असू शकतात. मी माझ्या मार्गाची माझ्यापरीने आखणी करणारा लेखक आहे. त्यामुळे मी समाजातील प्रश्न माझ्या लेखनातून, माझ्या स्वरातून आत्मीयतेने मांडू पाहतो. बोलणे, अभिव्यक्त होणे, लिहिणे हा प्रत्येक संवेदनशील माणसाचा धर्म असतो. माझाही धर्म हाच आहे. मी लिहितो म्हणजे वाचकांची चार घटका करमणूक व्हावी, असा विचार माझ्या मनात कधीही नसतो. केवळ करमणूक हा सच्चा लेखकाचा धर्म नसतो तर तो अधर्म ठरतो. आणि मी माझ्या लेखनाचा विचार करताना समाजाच्या प्रकृतीचा, संरचनेचा, भवतालाचा आणि समकालीन वास्तवाचा अधिक गंभीरपणे विचार करतो. हा विचार करताना मी इथली परंपरा, धार्मिक संरचना, राजकीय व्यवस्था आणि तळागाळातला सर्वसामान्य माणूस हे आण इतर घटक माझ्या या चिंतनामागे असतात. या घटकांचा पीळ त्या त्या अंगाने विचार करता मला अधिक जाणवतो, अस्वस्थ करतो. हे अस्वस्थ होणे एका सामान्य माणसाचेही असू शकते. पण सर्जनाच्या पातळीवरील हे अस्वस्थपण अधिक ठळक असू शकते. या अस्वस्थतेचा विचार करताना इथली धर्मव्यवस्था, धर्मसत्ता माझ्यासमोर येते. धर्माचा इतिहास फार मोठा आहे. मुळात धर्माची निर्मिती कशासाठी झाली ?
आणि इतिहासात धर्माने काय केले? या प्रश्नाजवळ येऊन मी थबकतो. मुळात सर्वसामान्य माणसाच्या मानसिक गरजेतून त्याच्या कल्याणार्थ धर्माची निर्मिती झाली आहे. प्राचीन काळी धर्म हा सर्वोच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये त्यातूनच म्हणजे धर्माची वेगळी गरज म्हणून निर्माण झाली. पुढे राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच आपल्या अंकित ठेवले. राजा हा सर्वोच्च समजला जाऊ लागला. तोच धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा संघर्ष किती मूलभूत होता हे ग्रीक किंवा भारतीय इतिहासातून आपल्याला कळून येते. इतिहासाची ही चक्रे आजच्या परिस्थितीत पुन्हा नव्या रूपाने फिरू लागतात तेव्हा सर्वसामान्य माणूस भ्रांतचित्त होतो. पृथ्वीच्या पाठीवर भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे असे मानले जाते. आणि त्याची साक्ष म्हणजे याच संस्कृतीत निर्माण झालेली अतिभव्य महाकाव्ये होत. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन महाकाव्यांनी आपल्या प्रातिभ उंचीने जागतिक वाङमयात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. प्रचंड प्रतिभाबलाने निर्मिलेल्या या महाकाव्याचा मूलधर्म बाजूला सारून आपण त्यातील समाजदर्शन, व्यक्तिदर्शन, मानवी नातेसंबंध या गोष्टींना बाजूला सारून त्यातली धर्मचर्चा प्रधान मानून त्यांना धर्मग्रंथांचे स्वरूप दिले. या ग्रंथांतील धर्मचर्चा हा नेहमीच परिष्कृत भाग राहिलेला आहे. तो त्या ग्रंथाच्या मूळ निर्मितीत कधीही नव्हता. महाभारत हे महाकाव्य तर केवळ काव्य नसून तर तो भारतीय समाजाचा काव्याच्या आकृतिबंधात सांगितलेला मोठा इतिहास आहे. किंबहुना ‘भारतीय इतिहासलेखनाची परंपरा महाभारतापासून सुरू झाली’ (मूळ शीर्षक: हा जय नावाचा इतिहास आहे) असे विधान इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथात करतात, हेही समजून घेणे आवश्यक आहे. आणि या ग्रंथापुढे गटे, होमर, शेक्सपियर यांचे साहित्य सुध्दा कुठे उभे राहू शकत नाही, असे विधान विंदा करंदीकर एके ठिकाणी करतात; पण आपण हे सगळे विसरून उलट्या अंगाने प्रवास करीत गेलो. हा धर्म पुन्हा एकदा तपासून पाहणे अधिक अर्थपूर्ण ठरेल. कारण हा धर्म व्यास किंवा वाल्मीकी यांनीही कधी अपेक्षिला नसावा. ही दोन्ही नावे महाकवी म्हणून मान्यता पावलेली आहेत एवढे जरी लक्षात घेतले तरी यामागील भूमिका समजून येईल.
आजचा एक ज्वलंत प्रश्न आणखी मला भेडसावीत आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या संबंधातला आणि तरुणांच्या एकूणच भवितव्याविषयीचा. आपण मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सार्थपणे आग्रही आहोत. तो आपला हक्कही आहे, हे आपण सिद्ध केले आहेच. पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण धडपडत असताना मराठीच्या भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे ? असा प्रश्न पडतो. मराठी भाषेसंबंधी जवळ जवळ पस्तीस वर्षांपूर्वी बोलताना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले होते- आज मराठी भाषा आपल्या शिरावर राजमुकुट घेऊन आणि अंगावर फाटके वस्त्र पांघरून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. आज ही मराठी मंत्रालयात राजभाषा म्हणून प्रस्थापित झालेली असेल; पण तिला मखरात बंद करून किंवा केवळ कागदावर तिचे गोडवे गाऊन ती समाजात उभी राहू शकेल का ? शासन मराठी विषयाच्या संबंधाने आदेशावर आदेश काढत असताना मराठीची गळचेपी कोण करते, हेही तपासून पाहणे गरजेचे झाले आहे. मराठी माध्यमांच्या शाळा धडाधड बंद पडत आहेत. आजवर जवळ जवळ सोळा हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्याचा आकडा आहे. एकीकडे असे म्हटले जाते की आजच्या समाजाची मराठी भाषेविषयीची अनास्था वाढीस लागलेली आहे. हेही समजू शकतो; पण मराठी भाषेसाठी, शाळांसाठी कोणते वेगळे प्रयत्न आपण करतो ? मध्यंतरी ऐकिवात आले होते- सरकार या मराठी शाळा खासगी संस्थांना चालवायला देणार आहे. आज शिक्षणव्यवस्थेचे भग्न रूप कुणी उभे केले असेल तर ते या खासगीकरणाने. या खासगीकरणाच्या वर्तुळात सर्वसामान्य, गरीब माणूस कुठे आहे ? प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे, हे भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे कलम आहे. हे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे हा विचार त्या कलमात अध्याहृत आहे, हे पुन्हा सांगायला नको. आणि असे असताना हा विसर आपल्याला का पडला ? श्री. म. माटेंनी जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी एक इशारा देऊन ठेवला होता- ‘देश म्हणजे देशातील दगड धोंडे नव्हेत, तर देशातील माणसे होत.’ आणि या देशातील माणसांचा विसर आपल्याला पडणे यासारखे अक्षम्य असे दुसरे काही नाही. आज राज्यातील प्राथमिक शाळा वाचविणे, त्यासाठी वेगळा कृतिआराखडा निश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचे अध्ययन केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरच राहू नये तर मराठी हा विषय पदवी परीक्षेपर्यंत सर्वच शाखांमधून शिकवणे आवश्यक करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आज मराठी भाषेचे अध्ययन आणि अभ्यासक्रम अतिशय सुमार झालेला आहे आणि याला विद्यापीठीय अभ्यास मंडळे जबाबदार आहेत. सुलभीकरणाच्या प्रयत्नात केवळ वरवरची अशी क्रमिक पुस्तके तयार करून किंवा निवडून आपण मराठीचा उद्धार करतो, अशी धारणा आज झालेली आहे. आणि ती बदलणे गरजेचे आहे. गावखेड्यातील
गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. राजभाषा म्हणून आपण ज्या मराठीचे प्रासंगिक गोडवे गातो, त्या भाषेला अभ्यासक्रमांत दुय्यम तिय्यम स्थान देणे ही आपल्या भाषाविषयक उदासीनतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. आणि यासाठी केवळ शासनाला जवाबदार धरणे यापलीकडे काही सांगता येणार नाही. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे. आणि तिला ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन या व्यासपीठावरून करणे मला गरजेचे वाटते. मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर येथे स्थापन झाले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदन करणेही आमचे कर्तव्य आहेच. या अनुषंगाने आणखी एक गंभीर मुद्दा मी पुढे ठेवतो आणि तो म्हणजे देशातील बेकारीचा. हा राजकीय मुद्दा आहे असे कृपया कुणी समजू नये. तर तो आजच्या पिढीचा, समाजाचा एक ज्वलंत प्रश्न आहे. हा राजकीय विषय आहे आणि तो लेखकाने भाषणात वगैरे घेण्याचे कारण नाही, असेही कुणी म्हणू शकेल; पण लेखक हा शब्दांशी झटत असताना तो या शब्दांमागील वेदना याच समाजातून शब्दबद्ध करीत असतो. सामाजिक भान जपणारा, समाजातील प्रश्न समजून घेत त्यावर लेखनातून चिंतन करणारा, राजकीय समकालाचा अन्वय विविध पातळ्यांवर लावू पाहणारा मी एक लेखक आहे म्हणून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येणार नाही. नव्वदनंतर पहिल्या काही दिवसांतच आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यातील खासगीकरणाने आपल्या शैक्षणिक जीवनात आमूलाग्र क्रांती केली. प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंतच्या सगळ्या पायऱ्यांवरील शिक्षणात गेली तीस वर्षे आपला समाज अधिक सुधारला, आपली प्रगती झाली या समजात आपण होतो. आहोतही. जे सरकार करू शकत नव्हते ते खासगी शिक्षण संस्थांनी करून दाखविले. बहुतेक स्वायत्त विद्यापीठांनी आपले शैक्षणिक धोरण आखून शिक्षणक्षेत्रात प्रगती केली आणि हे सुरू असताना सरकारने मात्र आता आपल्याला शिक्षणक्षेत्रात काहीही करायचे नाही, किंबहुना करण्यासारखे काहीही उरले नाही अशा हेतूने या क्षेत्राकडे पाठ फिरवली. सरकार कालचे असो की आजचे. पक्ष कुठलाही असो; पण आज सरकारी शिक्षणक्षेत्राचे चित्र पाहता प्रचंड निराशा पदरी पडते. प्राथमिक शिक्षणासाठी, कनिष्ठ महाविद्यालयासाठी शिक्षणसेवक म्हणून नवा पायंडा पाडला गेला आणि तीन वर्षे त्या उमेदवाराचे जगणे जणू हातावर आणून पानावर खाणे अशा स्वरूपाचे झाले.
जवळ जवळ बहुतेक उच्च महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. २०१२ पासून कुठेही प्राध्यापकांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. ही कशाची उदासीनता आहे ? आज याच महाराष्ट्रात हजारो तरुण प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहता पाहता पन्नाशीला आलेले आहेत. आपल्या सरकारी उदासीनतेचा हा कळस म्हणावा लागेल. आणि या औदासिन्याला आणखी वेगळी वाळवी लागलेली प्राध्यापक आहे ती डोनेशनची. आज उच्च महाविद्यालयात होण्यासाठी उच्चशिक्षित, संपूर्ण अर्हता असलेल्या उमेदवाराला डोनेशन म्हणून लाखो रुपये द्यावे लागतात. यावर कुणाचा अंकुश आहे? शिक्षणाचा वाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी वसलेली आहेत. जो डोनेशन देऊ शकतो तो प्राध्यापक होतो आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही अशी हुशार, प्रतिभासंपन्न तरुण- तरुणी खासगी महाविद्यालयात दहा हजारांवर नोकऱ्या करीत आहेत. हे चित्र कधी वदलणार आहे? आज आपण शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्खलनावर चर्चासत्रांतून तावातावाने शासन वोलतो. पण पुढे काय ? यावर कोणती उपाययोजना करेल? हा विषय साहित्याचा, कलाकृतीचा शोकात्म विषय आहे. १९६५ साली वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले’ किंवा१९७६ साली आलेले विजय तेंडुलकरांचे ‘पाहिजे जातीचे’ हे नाटक किंवा भालचंद्र नेमाडेंचे कादंबरी चतुष्टय किंवा माझी ‘पांढरे हत्ती’ ही कादंबरी किंवा अशा अनेक स्वरूपाचे मराठीत आलेले लेखन यातून या प्रश्नाची दाहकता वरचेवर मांडली गेली आहे; हा प्रश्न जर निकाली लागला नाही आणि सुशिक्षित तरुण-तरुणी उद्या आत्महत्या करू लागलीत तर त्याचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे ? आणि सुरुवात झालेली आहे. शिक्षणक्षेत्रात पस्तीस वर्षे घालविलेला मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून खेदाने ही भीषणता आपल्यासमोर मांडत आहे. तरुणांची ही ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असते. ती सृजनाची जशी गंगोत्री होऊ शकते तशीच ती प्रलयाचे कारणही होऊ शकते. गुजरातमधील नवनिर्माण चळवळ किंवा जयप्रकाश नारायणांचा संपूर्ण क्रांतीचा नारा हा इतिहास खूप जुना नाही. महाराष्ट्रातली युक्रांद चळवळ किंवा दलित पँथर किंवा अ.भा.वि.प.सारख्या चळवळी या काळाची अपत्ये होत्या. आणि काळ कुठल्याही परिस्थितीत काहीही प्रसवू शकतो. हे विषय मी अत्यंत कळकळीने मांडत आहे. कारण हे आजच्या समाजाचे वास्तव आहे. आणि या वास्तवाने सामाजिक स्वास्थ्याला वाळवी लागणार असेल तर त्याचा विचार तेवढ्याच गंभीरपणे आपण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे. १९६४ साली मडगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य पंचेचाळीसाव्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्व. वि. वा. शिरवाडकर उपाख्य कवी कुसुमाग्रज यांनी जेरोम के जेरोम या पाश्चात्त्य विचारवंताचे एक वचन उद्धृत केले होते. ते वचन असे आहे- ‘सरकार आणि हवा ह्या दोन्हीसंबंधी सहसा कोणीही चांगले वोलत नाही. ‘ आजच्या मितीस दुर्दैवाने हे वाक्य खरे ठरू नये, हीच अपेक्षा आहे.