घराच्या बाहेर बापाची टुटकी चप्पल जरी दिसली ना काया नजरेच्या मानसाच्या ऊरात धळकी भरते थो म्हनजे बाप असते. लेकराची हौसमौज पुरवनारा खरा कुबेर बाप असते. लेकराच्या बावत्या पासूनं कालेजाच्या फी लोग पै पैसा गोया करून ठेवते थो म्हनजे बाप असते. सोता फाटकी टायवरी घालनं पन् लेकराले बॅन्डेड जोळा घेवूनं देते थो बाप असते. रातीबेराती ऊठूनं चिळीच्या ऊजीळात बापाच्या चड्डी अन् बनयानीचे भोकं मोजूनं पा ईरूनं शिवलेली चड्डी अन् बनयानं तुमाले जरूर दिसनं… अशाच एका बापाची कायनी घेवूनं येतो तुमच्यासाठी.
एक खेळखाव होतं. गावाचं नावं होतं जामगाव. ह्या गावात एक गरीब खटलं राह्यत होतं. माणिकराव अन् चन्द्रकला ले लाळानवसाचं रामेसोर नावाचं लेकरू होतं. एका तपाबाद नवसानं थे झालं होतं. रामेसोर दिसमास वाहळत होता. चन्द्रा लेकराचं हागमूत कराले घरीच राह्ये पन् मानिक कुत-यासारखा धावत पयत होता. आलेल्या कमाईतूनं घरदार चालवत होता. रामेसोर सा सालचा झाला. थ्याले गावच्याच सरकारी शायेत पयलीत टाकलं. थ्याले दप्तर, पुस्तकं,कपळे फुकटच भेटले होते. रामेसोर मन लावूनं शिकत होता. रामेसोर चवथीत गेला. मामाचे पतरं आले की, थो मायले खळखळ वाचूनं दाखवे. मायबापाले दोघायले लै हरिक ये. चवथी पास झाल्यावर गावात पाचवा वर्ग नोता. गावातल्या ब-याच पोट्यायनं गरीबीपायी शाया सोळ्ळी. जो थो काम कराले लागले. कोनी वावरात जाये, कोनी ढोरं चाराले ने त कोनी नदिवरूनं बंडीत पानी आने. पन् मानिक न पोराले मुर्चापूर तालुक्याले पुळचं शिक्शन घेन्यासाठी शायेत दाखल केलं. रामेसोर आता दररोज एसटीनं मुर्चापूरले जा ले लागला. दिस मास साल लोटत चाल्ले मॅटरीक च साल होतं. रामेसोर पिसायल्या सारखा अभ्यास करत होता. चार घंटे झोप अन् फकस्त अभ्यास. मॅटरीकचा निकाल लागला. रामेसोर मेरीट मंदी पास झाला. गावातून पयला मेरीट येन्याचा मान रामेसोरनं मियवला होता. आता पुळचं शिक्शन लय माहागामोलाचं होतं. अकरावी थे पंधरावी पन्
मानिकनं अन् चंद्रानं वटे खोसले होते. एका राती रामेसोर अभ्यास करता करता करता हुमसत लळतानी मानिकले दिसला. मानिक रामेसोर जौळ गेला.
डोक्श्यावरून पाठीवरूनं हात फिरवला.
” अभ्यास करूनं डोये दुखते काय बाबू तुह्ये. “
” नाह्यी बाबा. “
” मंग काय झालं लळाले. “
” पुळचं शिक्शन लै महागाचं हाय. आपल्याले झेपनं का नाही थो ईचार करत होतो. “
” अरे हुट लेका! कायी बी ईचार करतं तू. तुह्या बाप जवलोग जिता हाय तदलोक तू बिलकूलं कायजी कराची नाही. मी दिसरात राबनं. रगताचं पानी करनं पन् तुले काहाचीच कमी पळू देयनं नाही. त्वाली माय पाय घसरूनं पळ्ळी अन् तीचा पाय मोळ्ळा पन् मी हाव ना जीता अखिन गोमीचा एक पाय टुटला म्हनजे थे काह्यी लंगळी होत नसते. तू ती भरही कायजी करू नोको. मी हाव ना. थकला असन तू झोप आता आमासा. “
रामेसोरले बापाचे बोलं आयकूनं हायस वाटलं. थो वाकयी आंगावर घेवूनं झोपी गेला. मानिक मातर ईचारात रातभर झोपलाच नाही. पोराले काह्यी कमी पळता कामा नोय म्हनून थो भेटन थे काम करत होता. कोनाच्या मुया फोळूनं दे. कोनाच्या लांगीवर माती टाकूनं दे. दिवसाले दोन दोन तिफना तूर सोंगूनं दे. कोनाची रेव गावूनं दे…भेटन थे काम करत होता. रामेसोर आता पंधरावीत पोचला होता. पंधरावी बाद थ्याले डाक्तर चा कोर्स कराचा होता पन् थ्याले भरमसाठ पैसाअदला लागनार होता. रामेसोर मुर्चापूर वरून घरी आला चंद्रा भाकरी थापत होती. मानिक कामानं थकल्यानं रिकाम्या गोंट्यावर पाय पोटाशी दुमळूनं झपला होता. रामेसोरनं हातपाय धुतले. टवाल कमरीले गुंडायला. मायनं ऊल्यावर चा ची गंजूली ठुयली. थंडीचे दिस होते. रामेसोर हात शेकत चुलीजौळ बसला.
चन्द्रा बोलली…
” काय झालं रे बाबू अस् तोंड ईचकूनं बसाले.”
” कायी नाही व मा असच. थकलो मी अज् लै. “
” मले शिकवू नोको. त्वाली माय हाय मी. काय झालं थे खरं खरं सांग. “
” मा! मी आता यापुळ शिकू शकत नाही. “
” कामूनं रे बापा असा भैताळासारखा बोलूनं दाखोतो. तुया बापानं आतापावतर केलेली मेयनत काय मातीत घालतं. “
” तस नाही व मा मले त लै शिका वाटते पन् आता डाक्टरकीले पाच लाख रूपये लागतेत. डाक्टरकीले दाखल व्हाच्या सा-या परीक्षा म्या पास केल्या पन् आता ड्क्टरकीले दाखल होन्यासाठी पाच लाख लागतेत कुठूनं आनतीनं बाबा. थ्या परीस मी जिल्ह्याले जावूनं काही तरी काम करतो. बाबाही थकले आता. मानिक झपल्या झपल्या सारं आयकत होता. खाळकन ऊठूनं थो सावकाराकळे गेला. वंशपरंपरागत दोन एक्कर वावर होतं त्याचा सौदा केला. दिळ लाखात वावर ईकलं. आता तीन लाख पन्नास हजाराचा सवाल होता. मानिक नं आयकलं होतं की मानसाले दोन किडन्या असतात एक ईकली तरी एकीवर मानूस जीता राह्यते. दिळ लाख सावकाराकडून आनून दायीच्या घळ्ळीत ठुयले. पायटीचं पयल्याच हल्टींगनं ऊमरावतीले एका दवाखान्यात मानिक गेला. किडनीचा अळीच लाखात भाव ठरला. किडनी देवूनं दोन रोजानं मानिक घरी आला. आता चार लाख जमा झाले होते. आता सवाल राह्यला होता लाखभ-याचा. चन्द्रा मानिकले कायजीपोटी बोल्ली.
” बाप्पा दोन रोज कुठ्सा गायब झाले होते. कुठ कुठ पाह्यलं नाही तुम्हाले. “
” काम होतं जरा. गेल्तो ऊमरावतीले. “
रामेसोर सयसंध्याकायी मुर्चापूरवरूनं आला. आता डाक्तर होता येनारचं नाही. असा थो हवालदिल झाला होता. हातपायधुवूनं बाजीवर जावूनं रामेसोरनं आंग टाकलं. मानिक जौळ जावूनं बाजीच्या ठाव्यावर बसला.
” कारे वाघा कामूनं असा ईरल्या सारखा दिसतं.”
” काह्यी नाही बाबा असच निझलो. “
” काय रे डाक्तरकीले किती खरचं येते. “
” जावू द्या बाबा डाक्तर होनं मावाल्या नशिबात नाही. “
” नशिबात नाही! अस कस नाही. किती खर्च येते थे तरी सांगशीनं का नाही.”
” लै खर्च येते बाबा आपल्या आवाक्यात नाही थे. “
” किती पैसा लागन थे तरी सांग. “
” पाच लाख रूपया. “
” थाम्ब पोरा जुगाळ करतो .तू फकस्त कायजी करू नोको.”
चार लाख रूपये जमा झाले होते. आता फकस्त एका लाखाचा सवाल होता. सावकारच्या वाळ्याच्या दिशेनं मानिकचे पावलं पळाले लागले. एका दाखात राहत्या घराचा सौदा झाला. सा मयन्याच्या मुचल्यावर. मानिक हरकिजानं घरी आला. रामेसोर अन् चन्द्रा दोघही मायलेकं घारघुर निझले होते. मानिक नमस्कार गाळग्यातले चार लाख काहाळले अन् आनलेले एक लाख पाच लाख पालवात बांधूनं ठुयला. पैसा चोरीगीरीले जायनं म्हनूनसन्या मानिक रातभर जागीच होता. पायट झाली तांबळ फुटलं, पाखरं खोपे सोळूनं ऊळाले लागली होती. शेजीच्या झीबा बुडीच्या कोंबळ्यानं डाल्याखालूनं जिवाच्या आकातानं बाग देल्ली. रामेसोर चंद्रा ऊठले. मानिकनं रामेसोरले जौळ बलावलं. ऊसत्याशी ठेवलेलं पैश्याचं गाठोयं रामेसोरच्या हातावर ठिवलं.
” हे घे पैसा आता तूले डाक्तर होण्यापासून कोनीही दूर ठू शकत नाही.”
” बाबा यवळा पैसा आनला कुठूनं. “
” घर गहान ठुयलं, वावर ईकल अन् ऽऽऽऽ ….”
” अन् काय?….”
” काही नाही तू ऊद्याच्या ऊद्या ऊमरावतीले जावूनं अॅडमीशन घे. “
” बाबा मी बंबईले अॅडमीशन घेतो. तिकळे होस्टेल अन् खानपिनं फुकट हाय. “
” बरं! “
पायटीच ऊठून रामेसोर तयारीले लागते. कपळेलत्ते, कागदपत्र, पैसा सार घेऊनं थो ईदर्भ ईसपेरेसनं बंबईले जाते. एम बी बी एस ले अॅडमीशन होते. डाक्तरकीचे तीन साल पुरे होते. किडनी रोपन ईस्पेशालिस्ट थो बनते. एका शिरीमंत मानसाची किडनी रोपन केस रामेसोर कळे येते. जे किडनी लावाची असते थे किडनी रामेसोर जौळ येते. सोबतच थे कोनाची त्याचं नाव अन् पत्ता असते. नाव असते मानिकराव दगडूजी काळे… रामेसोरले नाव वाचूनं चक्कर येते. बाकीचे डाक्तर रामेसोर ले ईचारतात…
” डॉक्टर यू आर नाॅट फिलिंग वेल. “
” यस “
किडनी रोपन करूनं रामेसोर गावाले जा ले लागते अन् थ्याले बापाचे शब्द आठोतात…कायजी करू नोको… ‘थाम्ब पोरा जुगाळ करतो’…. अन् डाॅ. रामेश्वर माणिकराव काळे हुमसू हुमसू रडू लागतो…..
लेखक - सु. पुं. अढाऊकर अकोला. ९७६९२०२५९७