अकोला : कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे असल्यास मतदाराजवळ मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे, परंतु अनेक मतदारांकडील मतदार ओळखपत्र जुने झाले आहे. त्यामुळे त्या ओळखपत्रावरील छायाचित्र, नाव, पत्ता ओळखणे अशक्य होत असल्याने, संबंधित मतदारांनी नव्याने ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
नाव नोंदवायचे असेल तर….
मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता यावे, यासाठी https://voters.eci.gov.in/ ही वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आधारे मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येते.
निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी वोटर हेल्पलाइन’ या नावाने अॅपदेखील तयार केले आहे. या अॅपचा वापर करून वोटर रजिस्ट्रेशन वर क्लिक करून मतदार नोंदणी करता येते.
जुने मतदार ओळखपत्र असलेल्या मतदारांना मतदान करता येते; मात्र जुने ओळखपत्र दाखवायचे असल्यास त्यावरील छायाचित्र, नाव, पत्ता आदी प्रकारची माहिती योग्य प्रकारची दिसत नसल्यास, संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
मतदार यादीत नाव आहे का?
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक विभागामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत नाव आहे की नाही, याबाबत संबंधित प्रत्येक मतदाराने खातरजमा करून घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक मतदाराकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे; मात्र ओळखपत्र जुने झाल्याने, त्यावरील छायाचित्र व माहिती दिसत नसल्यास जिल्ह्यातील संबंधित मतदारांनी नवीन मतदार ओळखपत्र काढून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. – अजित कुंभार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.