छत्रपती संभाजीनगर : जन्मजात बहिरेपणा येण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं व्यंग दूर करणं शक्य आहे. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात अशीच एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन वर्षाच्या मुलीला आता ऐकू येणं शक्य होणार आहे. डॉ. भारत देशमुख आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. Children born deaf will now be able to hear या शस्त्रक्रियेबाबात माहिती देताना हेडगेवार रुग्णालयाचे डॉक्टर भारत देशमुख यांनी सांगितलं, नांदेडच्या देगलूर इथं राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन वर्षीय मुलीला जन्मत:च बहिरेपणाची समस्या होती. अनेक ठिकाणी उपचार केले, पण फरक पडला नाही. यानंतर या कुटुंबानं छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात तपासणी केली. इथं यावर एक शस्त्रक्रिया शक्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्या शस्त्रक्रियेचं नाव कॉक्लियर इम्प्लांट असं आहे. स्मार्ट नेव्हिगेशन तंत्रज्ञान वापरून बहिरेपणा दूर होईल, असा विश्वास डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला. अतिशय किचकट अशा या शस्त्रक्रियेला कुटुंबियांनी परवानगी दिली. यानंतर ४ तासांपेक्षा अधिक वेळ शस्त्रक्रिया चालली. त्यात ३ मिनिट २० सेकंद हात स्थिर ठेऊन इलेक्ट्रोड कानाच्या आत बसवण्यात आला, अशी माहिती हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. भारत देशमुख यांनी दिली.#Deafness
महिलांना गर्भधारणेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ९ महिने अतिरिक्त काळजी घेणं अत्यावश्यक असतं. मात्र, अनेकदा महिलांना गर्भधारणेदरम्यान अनेक प्रकारच्या आजारांनाही सामोरं जावं लागतं. अशावेळी दिल्या जाणाऱ्या औषधांच्या रिऍक्शनमुळे पोटातील बाळाला गंभीर समस्या येऊ शकतात. यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं, सिंड्रोम यांच्यामुळे बाळाला जन्मजात बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे आजारणात अशी औषधं घेताना काळजी घ्यावी, असं आवाहनही डॉ. भारत देशमुख यांनी केलं.

गर्भधारणा असताना आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. विशेषतः नियमित औषधी घेत असताना गोवर, काविळ यांसारखे आजार होऊ नये, यासाठी काही लस उपलब्ध असतात, ज्याची माहिती बहुतांश लोकांना आहे. त्या लस वेळीच टोचल्या तर काही आजार टाळणं शक्य होतं. शिवाय पोषक आहार घेणं गरजेचं आहे. आहार जर चांगला असेल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली होते. त्यामुळे बाळ जन्माला आलं की ते निरोगी आणि सुदृढ असतं, असंही डॉ. देशमुखांनी सांगितलं.
आधुनिक युगात उपचार पद्धती अतिशय प्रगत झाली आहे. मात्र, त्या मानाने आजारपणाचं प्रमाणही वाढत आहे. विशेषतः मोठ्या आवाजात गाणी ऐकणं किंवा यंत्राच्या प्रचंड वापरामुळे सर्वसामान्यांमध्ये बहिरेपणाची समस्या वाढतेय.