वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
तापमानातील चढ- उतार आणि आर्द्रता यामुळे मुलांमध्ये न्यूमोनियाची प्रकरणे वाढली आहेत. सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे दूर होण्यास सुमारे १५ दिवस लागतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे न्यूमोनिया आणि फ्लूच्या लसी घेणे, हातांची स्वच्छता राखणे, संसर्ग टाळणे, पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अत्यावश्यक आहे. सांधेदुखीप्रमाणेच, त्वचेच्या समस्या, सर्दी, आणि घसा खवखवणे याप्रमाणेच न्यूमोनिया हीदेखील एक सामान्यपणे दिसून येत आहे. न्यूमोनिया म्हणजे जीवाणू, विषाणू तसेच बुरशीमुळे होणारे फुफ्फुसांचे संक्रमण. हे केवळ प्रौढांपुरतेच मर्यादित नाही तर लहान मुले आणि नवजात शिशुंनाही याचा धोका आहे. हिवाळ्याच्या दिवसात श्वसनासंबंधी समस्यांचे प्रमाण वाढते. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात.
एका आठवड्यात सुमारे ७ रुग्ण या समस्या घेऊन रुग्णालयात दाखल होतात. इतर सामान्य लक्षणे म्हणजे खोकला, शिंका येणे आणि श्वसनाचा वेग वाढणे, छातीत दुखणे. हिवाळ्यात घरामध्ये राहिल्याने आणि बुरशी, जिवाणू आणि विषाणू यांच्या संपर्कात आल्याने न्यूमोनिया होतो, यामुळे रुग्णांमध्ये गुंतागुंत होऊन मृत्यूचे प्रमाण जास्त वाढते.
न्यूमोनिया हा शिंकल्याने किंवा खोकल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. दमा, ब्राँकायटिस, जन्मजात हृदयविकार, किडनीचे आजार आणि श्वसनासंबंधीच्या इतर समस्यांसारख्या तीव्र फुफ्फुसाच्या समस्या असलेल्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे प्राणघातक आहे आणि फुफ्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते. कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुलावर वेळेवर उपचार करणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरलवार यांनी सांगितले.
विशेष काळजी घ्या!
न्यूमोनिया हा एक संसर्ग आहे, ज्याला वेळीच व्यवस्थापनाची आवश्यकता असते. न्यूमोनिया टाळण्यासाठी, मुलांनी जास्त गर्दीत नेणे टाळावी, आजारी लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, खोकताना नाक आणि तोंड झाकून घ्यावे, न्यूमोनिया आणि फ्लूच्या लसी घ्याव्यात, हात चांगले धुवावेत, सर्व आवश्यक पोषक घटक असलेले पदार्थ खावेत आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत. हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घाला आणि थंडीपासून संरक्षण करा. मुलांना ताजे अन्न, उकळून थंड केले पाणी, गरम सुप तसेच घरात ह्युमिडिफायर वापरा आणि प्रदूषणापासून दूर रहा, असे डॉक्टर सांगतात.