आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित या लोकांनी सावरून धरले.
जोतीराव यांचे संपूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खातगुण, पणजा खादगुणचा वतनदार चौगुला होता. गावातील विशिष्ट जातींनी त्यांना फार त्रास दिला तेव्हा पणजा पुरंदर तालुक्यातील खानवडीस आले. आजोबा शेटीबा हे गरिबीस कंटाळून नशीब काढण्यासाठी पुण्यास आले. शेटीबाला तीन मुले होती. त्यांना शेळ्या-मेंढ्या चारण्याचे काम मिळाले, पण त्यांची हुशारी पाहून मालकाने तिघांना फुलांचे झेल, हार, लोड, वगैरेचे शिक्षण दिले. लवकरच त्यांना पेशव्यांच्या वाड्यात फुले देण्याचे काम मिळाले. पैसाही बरा मिळाला. त्यांचे मूळचे ‘गोहे’ हे नाव जाऊन ‘फुले’ हे नाव पडले. गोविंदराव हा शेटीबाचा सर्वात धाकटा मुलगा होय. हे माळी जातीतील फुलमाळी होते.
१८२७ साली पुण्यास जोतीराव जन्मले. वडिलांचे नाव गोविंदराव आणि मातोश्रीचे नाव चिमणाबाई. जन्मानंतर अवघ्या एका वर्षाने म्हणजे १८२८ साली मातोश्री मरण पावली. सर्व सांभाळ वडिलांनी केला. १८३४ साली त्यांना गावठी शाळेत घातलेले होते, पण विशिष्ट जातीच्या कारकुनांच्या कारवाईमुळे शिक्षण बंद पडले. १८४२ साली म्हणजे १५ व्या वर्षी पुन्हा इंग्रजी शिक्षणास सुरुवात झाली. याचे श्रेय त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या गफार बैग मूनशी यांच्या प्रोत्साहनास आणि मेजर लिजित साहेबांच्या मदतीस आहे. लवकरच इंग्रजी, मराठी गणित विषयात जोतीरावांनी प्राविण्य मिळवले. बौद्धिक शिक्षणाप्रमाणेच शारीरिक शिक्षणही त्यांनी मिळवले. वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणे आपणही नाव कमवावे या हेतूने फडके यांचे गुरू लहुजी बुवा यांच्यापाशी गोळीबार, लाठी, दानपट्टा शिकले. शिक्षणाच्या कामी जसा विशिष्ट जातीचा अडगळा झाला तसाच एकदा एका मित्राच्या लग्नात हे नवरदेवाच्या स्वारीत मिसळले म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला व अशारीतीने विशिष्ट जातीची कृत्ये जोतीरावांच्या ब्रह्मद्वेषाला कारणीभूत झाली.
१८४८ साली म्हणजे २१व्या वर्षी फुले यांनी मुलीची शाळा काढली. ही शाळा बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात भरत असे. त्या शाळेत प्राध्यापिकेचे काम करण्यासाठी स्वतःची पत्नी सावित्रीबाई हिला त्यांनी तीन वर्षे अगोदर शिक्षण दिले. त्या शिक्षिकेचे काम करीत. ज्या पुणे शहरात आज हजारोंनी मुली शिकत आहेत त्याच पुणे शहरात मुलींच्या शिक्षणाबाबत जोतीराव सावित्रीबाई यांना अपमान सहन करावे लागले. वडील गोविंदराव हेही विरुद्ध गेले व त्यांनी जोतीरावांना घराबाहेर काढले. लोकांनी सावित्रीबाईंना खडे मारण्यासही कमी केले नाही, पण त्या साध्वीने तो सर्व छळ सहन केला.
या शाळेस बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सर अर्सकीन पेरी हे दरमहा ५० रुपये देत. दक्षिणा प्राइज कमिटी ही पाऊणशे रुपये देत होती, मेजर केही साहेब शाळा तपासायला येत. या शाळेच्या १८५१ मध्ये रास्ता पेठेत, १८५२ साली वेताळ पेठेत अशा दोन दोन शाखा निघाल्या. १८५३ साली या तिन्ही शाळा मिळून २३७ मुली शिकत होत्या. १२ फेब्रुवारी १८५३ रोजी विश्रामबाग वाड्यात झालेल्या वार्षिक समारंभास ३ हजार लोक हजर होते. यावरून त्यांच्या कार्याचे किती महत्त्व होते हे लक्षात येईल. हे स्त्री शिक्षणाचे कार्य पुढील काळात महर्षी अण्णासाहेब कर्वे व गोपाळराव देवधर यांनी मोठ्या नेटाने चालवले आहे. १८५३ साली महार-मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळ स्थापन केले. या शाळासाठी जागा मिळण्यास कठीण गेले, तेव्हा गोवंडे यांनी आपली जागा दिली. पाणी पिण्यास देईनात, तेव्हा फुले यांनी स्वतःच्या जागेत हौद बांधले, या शाळेला रिव्हिज हॅरिसन, मॅनफिल्ड अधिकारी दरमहा १० ते २५ रुपये पर्यंत मदत करत असत. दक्षिणा प्राइज कमिटी ३५ रुपये देत असत. १८५८ साली अस्पृश्यांच्या शाळा होत्या त्यातून २५८ विद्यार्थी शिकत होते.
जोतीरावांचे अनुयायी म्हणविणाऱ्या लोकांनी गेल्या शंभर वर्षात अस्पृश्यांसाठी काही केले नाही. या पवित्र कार्यात महर्षी अण्णासाहेब शिंदे, प्राध्यापक श्रीपाद माटे व भाऊराव पाटील यांनी भाग घेतलेला आहे. शाहू बोर्डिंग सारखी संस्था काढून भाऊराव पाटलांनी मोठेच काम केले आहे. १८५२ साली सर आरस्किन घेरी यांच्या पुढाकाराने जोतीरावांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यांना एक शाल जोडी व २०० रुपये देण्यात आले. १८६३ साली स्वतःच्या घराशेजारीच विधवा व पतित स्त्रिया आणि अनाथ मुले यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. आज या प्रश्नास अखिल भारतीय महत्व प्राप्त झालेले आहे. ख्रिस्ती, मुसलमान धर्माची हजारोंनी याच ठिकाणाहून रोज भरती होत असे. प्रत्येक गावात अशाप्रकारच्या संस्थेची शाखा असेल तर हिंदू समाजातील ही गळती बंद होईल हे आता सर्वांना कळ लागले आहे, पण ही गोष्ट १८६३ सालीच जोतीरावांच्या लक्षात आली, त्यावरून त्यांचे दूरदर्शी धोरण सहज लक्षात येते. १८६४ साली शेणती ( सारस्वत) जातीतील पहिला विधवाविवाह गोखले यांच्या बागेत घडवून आणण्यात जोतीरावांनी पुढाकार घेतला.
१८७३ साली २४ सप्टेंबर रोजी जोतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दलित वर्ग किंवा समाज यासाठी स्वतंत्र चळवळ करण्याची पहिली कल्पना ज्योतीरावांना उमगली. यावरून त्यांची कल्पकता दिसून येते. या समाजातर्फे दर रविवारी सामुदायिक प्रार्थना होत असे. महिन्यातून दोन वेळा निरनिराळ्या विषयावर व्याख्याने होत असत. विवाह प्रसंगी मराठीतून मंगलाष्टके म्हणण्याचा त्यांनी प्रघात पाडला. या समाजाचे त्याचवेळी ३०० सभासद झाले. त्यात सर्व पक्षाचे व जातीचे सभासद होते. पक्षांची किवा स्वतःची मते यांचा प्रचार करावयाचा असल्यास वर्तमानपत्र खेरीज दुसरा उपाय नाही, ही गोष्ट फुले यांच्या लक्षात आली होती. लोकांनी यासाठी १२०० रुपयांचा छापखाना फुल्यांना घेऊन दिला, पण विविध व्यवसायांमुळे ही गोष्ट त्यांच्या हातून झाली नाही, तेव्हा कृष्णाराव पांडुरंग भालेकर यांनी त्यांना याकामी प्रोत्साहन दिले व त्यांनी १८७७ सालच्या जानेवारीत ‘दिनबंधु’ साप्ताहिक काढले. १८०९ साली त्यांनी तेच पत्र लोकांच्या हाती चालवण्यासाठी दिले. ‘दिनबंधु’ नंतर ४ वर्षांनी ‘केसरी’ निघाला, ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. १८८५ सालच्या जूनमध्ये सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी ‘सत्कार’ नावाचे मासिक काढले. पहिल्याच अंकाच्या १०५० प्रती खपल्या यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. दुसरा अंक १८८५ म्हणजे ऑक्टोबरमध्ये निघाला, पण पुढे हे पत्र बंद पडले. वर्तमानपत्र नसल्यामुळे बहुजन समाजाचे काय नुकसान होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महात्मा जोतीराव यांच्या सर्वगामी कल्पना चळवळीची त्याच्या विशाल अंतःकरण, उदार मनाची कल्पना इतर कितीतरी गोष्टींवरून समजण्यासारखे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोडकळीस आलेल्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जोतीरावांनी जोराचा प्रयत्न केला आणि हे कार्य अजूनही शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हातून नीटपणे झालेले नाही. हंटर कमिशनपुढे निर्भीडपणे त्यांनी साक्ष दिली व दलित वर्गाच्या शिक्षणाची बाजू जोराने पुढे मांडली. ड्युक ऑफ यार्क पुण्यास आले असताना भर समारंभात पंचा नेसून व घोंगडी पांघरून जोतीराव फुले हजर राहिले आणि ड्युक साहेबांना हिंदी शेतकरी कसा असतो हे दाखविले. हे त्यांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लेखनाचे कार्य ते करीत होते. लोकजागृतीसाठी त्यांचे लेखन होते. १८६९ साली त्यांनी मुंबईत शिवाजी महाराजांचा पोवाडा प्रसिद्ध केला, याचे आठ भाग आहेत. त्याच वर्षी पुण्यात ‘शेतकल्याचा आसूड’ प्रसिद्ध केला. त्यात ४० पानांचे दोन निबंध आहेत. पाच विषयांवर आणखीही दोन निबंध त्यांनी लिहिलेले आहेत. १८६९ साली ‘ब्राह्मणांचे कसब’ हे अध्यात्मिक पद्यात्मक पुस्तक जोतीरावांनी प्रसिद्ध केले. १८७३ साली पुण्यात ‘गुलामगिरी’ हे संवादात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. हे पुस्तक युनायटेड स्टेटसमधील सदाचारी लोकांना अर्पण केलेल आहे. प्रस्तावना इंग्रजी व मराठी भाषेत आहे. या १२५ पानांच्या पुस्तकात ब्रह्मदेवापासून ते भट-पाड्याच्या यांच्या बंडा पर्यंतचा इतिहास आहे. १८८१ साली एक हिंदू या टोपण नावाखाली ‘जातीभेद विवेकसार’ हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. १८८५ साली जोतीरावांनी एक नाटक लिहिले व दक्षिणा प्राईज कमिटीकडे पाठवले, पण त्यांनी ते नापसंत केले. १८८५ साली कै. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना पुण्याच्या मराठा समाजाने मानपत्र दिले त्यावेळी न्यायमूर्ती महादेव रानडे म्हणाले ‘जातीभेद असला म्हणून आपल्या इष्ट हेतूच तो बिलकुल आडवा येत नाही’ या विधानाचे खंडन करण्यासाठी जोतीरावांनी ‘इशारा’ पुस्तक लिहिले १८९१ साली म्हणजे जोतीरावांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने ‘सार्वजनिक सत्यधर्म प्रकाश’ हे पुस्तक पुण्यास प्रसिद्ध झाले. पक्षाघाताच्या आजारातून उठल्यानंतर अनुयायांसाठी डाव्या हाताने त्यांनी पुस्तक लिहिले होते. त्यांच्या हयातीतच हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे म्हणून मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी पैशांची मदत केली, पण ती इच्छा अपुरी राहून महात्मा जोतीराव फुले यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. महार, मांगांचे व आपले पूर्वज एकच आहेत, असे क्रांतिकारी विचार व आचार पाळणारा इंग्रजी आमदानीतला हा पहिलाच बंडखोर होय. सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखामेळा या संत मंडळीत शोभणारा हाही एक सामाजिक संत होय. मोठ्या पुरुषांच्या पुण्यतिथ्या किंवा जयंत्या या त्यांच्यानंतर झालेल्या कार्याचा आढावा हाच होय आणि तो घेतला तर त्यामुळे एका दृष्टीने वाईटच वाटेल. कारण जोतीरावांनंतर त्यांचे गुणवर्णन करण्यापेक्षा जास्त कार्य आम्ही केलेले नाही. असा हा महापुरुष २८ नोव्हेंबर १८९० रोजी दिवंगत झाला. मृत्यूच्या अगोदर थोडे दिवस पक्षाघाताच्या विकाराने ते आजारी होते, पण डॉक्टर घोले यांचे श्रम व गायकवाड सरकारची मदत यामुळे काही काळ त्यांना बरे वाटले आणि शेवटी त्यातच जोतीरावांचे निधन झाले.
शिवदास जिवन कांबळे