बीजिंग (एजन्सी) : पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई आणि पेट्रोल-डिझेलला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात चीनने मोठी कामगिरी केली आहे. शांडोंग प्रांतातील रिझाओ येथे उभारलेल्या जगातील पहिल्या प्रकल्पाने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी आणि भविष्यातील इंधन — ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात यश मिळवले आहे. हे सर्व फक्त २४ रुपये प्रति घनमीटर या अत्यंत कमी खर्चात होत आहे.
ही यंत्रणा समुद्राच्या पाण्यावर व स्टील-पेट्रोकेमिकल उद्योगांमधील अपशिष्ट उष्णतेवर चालते आणि ‘एक इनपुट–तीन आउटपुट’ या तत्त्वावर आधारित आहे.

प्रमुख उत्पादने :
- अल्ट्रा-शुद्ध गोडे पाणी – दरवर्षी ४५० घनमीटर
- ग्रीन हायड्रोजन – वार्षिक क्षमता १,९२,००० घनमीटर
- खनिजयुक्त ब्राइन – ३५० टन, रसायन उद्योगासाठी उपयुक्त
किमतीतही हा प्रकल्प जगात सर्वात स्वस्त ठरला आहे. सौदी, यूएई आणि अमेरिकेपेक्षा खूप कमी खर्चात पाणी तयार होत आहे.
हायड्रोजनला “पेट्रोलचा जनक” मानले जाते कारण ते पूर्णपणे प्रदूषणमुक्त इंधन आहे. पारंपारिक पद्धतीत लागणारे मोठ्या प्रमाणातील वीज आणि शुद्ध पाणी यांची आवश्यकता या तंत्रज्ञानाने दूर केली आहे. रिझाओ प्रकल्पातून तयार होणारे हायड्रोजन १०० बसेसना वर्षभर ३,८०० किमी पर्यंत ऊर्जा पुरवू शकते.
अभियंत्यांनी समुद्रातील मीठांमुळे होणारी गंज समस्या दूर केली असून प्लांट सलग तीन आठवडे अखंड चालू आहे. समुद्रकिनारी असलेल्या आणि गोड्या पाण्याची कमतरता असलेल्या देशांसाठी ही मोठी दिलासा देणारी तांत्रिक प्रगती ठरत आहे.
