मुंबई : राज्यात गुटखा उत्पादन व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी साखळीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. या निर्णयामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईला मोठी बळकटी मिळणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, परराज्यातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधी सुपारी राज्यात आणली जाते. एफडीएकडून जप्ती व फौजदारी कारवाई करूनही या पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरूच असल्याने या मागे कार्यरत असलेली संघटित गुन्हेगारी साखळी तोडणे आवश्यक होते. त्यासाठी मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव एफडीए स्तरावर तयार करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मकोका लागू करण्याची घोषणा केली, असे त्यांनी सांगितले.
विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुटखा व अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर विशेष कायदा राबवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत, मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

राज्यात गुटखा व सुगंधी पान मसाल्यावर बंदी असतानाही शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात नियमबाह्य विक्री सुरू आहे. ही विक्री रोखण्यासाठी गुटखा व सुगंधी सुपारी उत्पादक-विक्रेत्यांना मकोकाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री झिरवाळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे गुटखा विरोधी कारवाई अधिक कठोर व परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
