नागपूर : विदर्भातील सर्व संपादकांना एकत्र आणणारे, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणारे आणि अभ्यासपूर्ण चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ‘विदर्भ एडिटर्स फोरम’ या संस्थेची औपचारिक स्थापना करण्यात आली आहे. समाजासमोर उभ्या असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना सुचवणे, समस्यांचा अभ्यास करणे आणि प्रबोधनात्मक भूमिका घेणे यासाठी या फोरमची निर्मिती करण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.#VidarbhaEditorsForum

नुकत्याच झालेल्या बैठकीत फोरमची पहिली कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे यांची फोरमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विदर्भातील विविध माध्यमसंस्थांचे वरिष्ठ संपादक उपस्थित असलेल्या या बैठकीत गावंडे यांच्या नेतृत्वावर सर्वांचा एकमताने विश्वास व्यक्त करण्यात आला.
सचिवपदी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांची, तर कोषाध्यक्षपदी पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी यांची निवड झाली. फोरमच्या उपाध्यक्ष म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे आणि लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय, सहसचिवपदी हितवादचे संपादक राहुल दीक्षित आणि दैनिक भास्करचे संपादक मणिकांत सोनी यांची निवड झाली. फोरमच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये नवभारतचे मुख्य संपादक संजय तिवारी, टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक पार्थ मैत्रा, सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे आणि नवराष्ट्रचे संपादक संदीप भारंबे यांचा समावेश आहे.
फोरमची प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे–
• विदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर संपादक स्तरावर मुक्त चर्चा घडवून आणणे
• संशोधनाधारित अहवालांद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधणे
• पत्रकारितेची गुणवत्ता, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी यांची जपणूक करणे
• परस्पर संवादातून माध्यमांमध्ये समन्वय वाढवणे
निवडीनंतर अध्यक्ष देवेंद्र गावंडे यांनी सांगितले की, लवकरच एका औपचारिक सोहळ्यात फोरमच्या कार्याचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. समाजहिताच्या उद्दिष्टांशी निष्ठा ठेवत फोरम प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
