३,५५३ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी इंडिया पोस्टची भरती
महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्टने देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी सर्वाधिक ३,५५३ पदे उपलब्ध आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी असून, अर्जात दुरुस्ती करण्याची संधी १८ व १९ फेब्रुवारी रोजी दिली जाणार आहे. या भरतीची पहिली गुणवत्ता यादी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

पात्रता काय आहे?
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित व इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुण मिळालेले असावेत.
वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
निवड कशी होणार?
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड १०वीच्या गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या गुणवत्ता यादीतून केली जाईल. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
महाराष्ट्रासाठी मोठी संधी
ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पदे उपलब्ध असल्याने, १०वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
| आंध्र प्रदेश 1,060 आसाम 639 बिहार 1,347 छत्तीसगड 1,155 दिल्ली 42 गुजरात 1,830 हरियाणा 270 हिमाचल प्रदेश 520 जम्मू आणि काश्मीर 267 झारखंड 908 कर्नाटक 1,023 केरळ 1,691 मध्य प्रदेश 2,120 महाराष्ट्र 3,553 ईशान्य 1,014 ओडिशा 1,191 16. पंजाब 262 राजस्थान 634 तामिळनाडू 2,009 तेलंगणा 609 उत्तर प्रदेश 3,169 उत्तराखंड 445 पश्चिम बंगाल 2,982 |
