पृथ्वीवरचा सर्वात या छोटा जीव म्हणजे बॅक्टेरिया. हे सजीव सगळीकडे असतात. समुद्र, ढग, डोंगर, निर्जिव वस्तू, पक्षी आणि प्राण्यांचं शरीर अशा सगळ्या ठिकाणी ते आढळतात. तुमच्या घरात असंख्य बॅक्टेरिया असतात. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही अशा प्रत्येक ठिकाणी हे सजीव अगदी आरामात रहातात. म्हणूनच जेवताना हात धुण्याचा सल्ला दिला जातो. काही बॅक्टेरिया आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर काहींमुळे विविध आजार होतात.
बॅक्टेरिया हे एकपेशीय सजीव आहेत. या पेशीमध्ये कॉम्प्युटरमधल्या प्रोग्रामप्रमाणे काम करणारे डीएनए असतात. बॅक्टेरियांना जगवण्यासाठीची सगळी माहिती या डीएनएमध्ये समाविष्ट असते. या पेशीभोवती कठीण भिंत असते. यामुळे बॅक्टेरियांचं रक्षण होतं. काही बॅक्टेरियांना बाहेरच्या बाजूला कवच असतं. त्याला ‘पिली’ असं म्हणतात. हालचालीसाठी त्यांच्या शरीरात लांब धाग्यासारखे अवयव असतात. त्यांना शास्त्रीय भाषेत ‘फ्लॅगेल्ला’ असं म्हणतात. हे सजीव समुहाने रहातात. त्यांची संख्या झटपट वाढते. सध्या पृथ्वीवर दहा हजार प्रजातींचे बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियांची तीन विभागांमध्ये विभागणी केली जाते. ‘कोक्की बॅक्टेरिया’ गोलाकार असतात. ‘बॅसिली’ बॅक्टेरियांचा आकार सरळ असतो. ‘स्पायरल बॅक्टेरिया’ कॉर्कस्क्रू पास्तासारखे दिसतात.